अकलूज पोलिसांची धडाकेबाज कारवाई; १७ देशी पिस्तुलांसह १८.४७ लाखांचा मुद्देमाल जप्त आंतरराज्यीय शस्त्र तस्करीचे जाळे उघड; सहा आरोपी अटकेत, दोन फरार
अकलूज : बेकायदेशीर अग्निशस्त्रांची विक्री आणि तस्करी करणाऱ्या टोळीविरोधात अकलूज पोलिसांनी मोठी कारवाई करत १७ देशी बनावटीची पिस्तुले, ४७ जिवंत काडतुसे आणि टाटा नेक्सॉन कार असा तब्बल १८ लाख ४७ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.
या कारवाईत सहा आरोपींना अटक करण्यात आली असून, मध्यप्रदेश ते सोलापूर, सांगली आणि कर्नाटकपर्यंत पसरलेले आंतरराज्यीय शस्त्र तस्करीचे जाळे पोलिसांनी उघडकीस आणले आहे.
१४ ऑगस्ट २०२६ रोजी अकलूज पोलीस ठाण्याचे पोलीस हेकॉ श्रीराम पोरे यांना विकास कैलास वजाळे हा टाटा नेक्सॉन कारमधून अकलूज-टेंभुर्णी मार्गावरील पतंगे मटन हॉटेल परिसरात पिस्तुले विक्रीसाठी घेऊन येणार असल्याची खात्रीशीर माहिती मिळाली.
या माहितीच्या आधारे उपविभागीय पोलीस अधिकारी संतोष वाळके आणि पोलीस निरीक्षक निरज उबाळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी सापळा रचला.

पोलिसांनी विकास वजाळे याला ताब्यात घेत त्याच्याकडून दोन पिस्तुले, चार जिवंत काडतुसे आणि टाटा नेक्सॉन कार जप्त केली. त्याची कसून चौकशी केल्यानंतर या प्रकरणाचे धागेदोरे थेट मध्यप्रदेशपर्यंत पोहोचत असल्याचे समोर आले.
मध्यप्रदेशातील मुख्य पुरवठादार जेरबंदतपासादरम्यान मध्यप्रदेशातील अनिल पंचलाल मेहता हा या अवैध शस्त्रांचा प्रमुख पुरवठादार असल्याचे निष्पन्न झाले.
अकलूज पोलिसांच्या विशेष पथकाने धुळे जिल्ह्यातील सोनगीर येथे सापळा रचून मेहता याला चार पिस्तुले आणि २५ जिवंत काडतुसांसह अटक केली.यानंतर तपासाची चक्रे वेगाने फिरवत पोलिसांनी टेंभुर्णी परिसरातून सांगली जिल्ह्यातील उमदी पोलीस ठाण्यातील खुनाच्या गुन्ह्यात फरार असलेला राहुल सतीश माने यालाही जेरबंद केले. त्याच्याकडून सहा पिस्तुले आणि आठ काडतुसे हस्तगत करण्यात आली.
या तपासातून शस्त्रांची खरेदी-विक्री आणि पुरवठा सोलापूर, सांगली तसेच कर्नाटक परिसरात होत असल्याची माहिती पोलिसांच्या हाती लागली आहे.
सहा आरोपी अटकेत; दोघांचा शोध सुरू
या प्रकरणात विकास कैलास वजाळे (३१), राहुल सतीश माने (३४), महादेव बाळासाहेब कोरके (३०), विजय सदाशिव किरणगी (३४), अनिल पंचलाल मेहता (३२) आणि सुमित नाना लवटे (१९) यांना अटक करण्यात आली आहे.तर प्रदीप पांडुरंग माने आणि शनी भारत बनसोडे हे दोन आरोपी फरार असून, त्यांचा पोलिसांकडून शोध सुरू आहे.
१८ लाख ४७ हजारांचा मुद्देमाल जप्त
पोलिसांनी केलेल्या कारवाईत १० लाख रुपये किमतीची १७ देशी बनावटीची पिस्तुले, ४७ हजार रुपये किमतीची ४७ जिवंत काडतुसे आणि आठ लाख रुपये किमतीची टाटा नेक्सॉन कार (MH 45 AE 7002) असा एकूण १८ लाख ४७ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
अटक आरोपींना न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्यांना २१ ऑगस्ट २०२६ पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. या टोळीच्या माध्यमातून आणखी किती शस्त्रांची खरेदी-विक्री झाली आहे आणि या नेटवर्कमध्ये आणखी कोणाचा सहभाग आहे, याचा तपास पोलीस करत आहेत.
पोलिसांच्या कामगिरीचे कौतुक
सोलापूर ग्रामीणचे पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी, अपर पोलीस अधीक्षक विजय कबाडे, अपर पोलीस अधीक्षक (पंढरपूर) प्रेरणा कट्टे आणि उपविभागीय पोलीस अधिकारी संतोष वाळके यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक निरज उबाळे यांच्या नेतृत्वाखाली ही कारवाई करण्यात आली.सहाय्यक पोलीस निरीक्षक विक्रम साळुंखे, पोलीस उपनिरीक्षक अंकुश वाघमोडे, विशाल कदम तसेच श्रीराम पोरे, शिवकुमार मदभावी, राहुल रणनवरे, अमोल बकाल, समीर पठाण, दत्तात्रय खरात, रणजित जगताप, तुकाराम माने देशमुख, विजय तवटे आणि पोलीस अधीक्षक पथकातील शरद कदम, सुरज हेंबाडे, अनिल शिंदे, स्वप्नील गायकवाड, सायबर पथकाचे प्रविण मेटकरी यांच्यासह पथकाने ही कारवाई यशस्वी केली
.अवैध शस्त्रांच्या तस्करीचे आंतरराज्यीय जाळे उघडकीस आणत मोठ्या प्रमाणावर शस्त्रसाठा जप्त केल्याने अकलूज पोलिसांच्या या कारवाईचे परिसरातून कौतुक होत आहे.







