मनोज जरांगे पाटील यांचा 7 ते 12 ऑगस्टदरम्यान पश्चिम महाराष्ट्र दौरा; विविध ठिकाणी ‘प्रत्यक्ष गाठीभेटी’ बैठका
अंतरवाली, (प्रतिनिधी) : मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील हे 7 ते 12 ऑगस्ट 2026 या कालावधीत पश्चिम महाराष्ट्राच्या दौऱ्यावर जाणार असून, या दौऱ्यात धाराशिव, सोलापूर, सांगली, सातारा आणि कोल्हापूर जिल्ह्यात विविध ठिकाणी “प्रत्यक्ष गाठीभेटी” बैठका आयोजित करण्यात आल्या आहेत.
दौऱ्याची सुरुवात शुक्रवार, 7 ऑगस्ट रोजी अंतरवाली येथून होणार असून, तुळजापूर येथे प्रथम गाठीभेट होईल. त्यानंतर तुळजापूर येथे मुक्काम असेल.शनिवार, 8 ऑगस्ट रोजी सकाळी वडाळा (ता. उत्तर सोलापूर), दुपारी माढा आणि सायंकाळी श्री क्षेत्र पंढरपूर येथे बैठका होणार असून, पंढरपूर येथे मुक्काम असेल.रविवार, 9 ऑगस्ट रोजी सरकोली, सांगोला आणि आटपाडी येथे प्रत्यक्ष गाठीभेटी आयोजित करण्यात आल्या आहेत. त्यानंतर आटपाडी येथे मुक्काम राहील.सोमवार, 10 ऑगस्ट रोजी कवठे महांकाळ, बोरगाव (ता. वाळवा) आणि कडेगाव येथे बैठका होणार असून, कडेगाव येथे मुक्काम असेल.मंगळवार, 11 ऑगस्ट रोजी मायणी, मसूर आणि कोल्हापूर शहर येथे बैठका पार पडतील. या दिवशी कोल्हापूर येथे मुक्काम असेल.दौऱ्याच्या अखेरच्या टप्प्यात बुधवार, 12 ऑगस्ट रोजी पाटण आणि सातारा शहर येथे प्रत्यक्ष गाठीभेटी होणार असून, त्यानंतर सोयीनुसार अंतरवालीकडे प्रस्थान करण्यात येणार आहे
.या दौऱ्याच्या माध्यमातून मनोज जरांगे पाटील पश्चिम महाराष्ट्रातील मराठा समाजबांधवांशी थेट संवाद साधणार असून, विविध भागांतील नागरिकांच्या समस्या, सूचना आणि आगामी आंदोलनाच्या भूमिकेबाबत चर्चा करणार असल्याची माहिती दौरा संयोजकांनी दिली आहे.







