एमएमसी नोंदणीला मान्यता ; पुण्यात होमिओपॅथिक डॉक्टरांची पत्रकार परिषद, शासनाचे अभिनंदन

पुणे, दि. ४ : महाराष्ट्र शासनाने सीसीएमपी पात्र होमिओपॅथिक डॉक्टरांना महाराष्ट्र मेडिकल कौन्सिल (MMC) नोंदणी प्रमाणपत्र देण्यास सुरुवात केल्याबद्दल पुणे जिल्ह्यातील होमिओपॅथिक डॉक्टरांच्या वतीने पुणे येथे पत्रकार परिषद घेऊन राज्य शासन, वैद्यकीय शिक्षण विभाग तसेच संबंधित सर्व यंत्रणांचे मनःपूर्वक अभिनंदन व आभार व्यक्त करण्यात आले
.यावेळी उपस्थित डॉक्टरांनी सांगितले की, महाराष्ट्र शासनाने २०१४ च्या कायद्यानुसार पात्र सीसीएमपी डॉक्टरांना न्याय देण्याच्या दिशेने महत्त्वाचे पाऊल उचलले आहे.
अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या या प्रश्नावर सकारात्मक निर्णय झाल्याने हजारो पात्र होमिओपॅथिक डॉक्टरांना दिलासा मिळाला असून राज्याच्या आरोग्य व्यवस्थेलाही त्याचा मोठा लाभ होणार आहे
.पत्रकार परिषदेत काही संघटनांनी या निर्णयाच्या विरोधात बंदची हाक दिल्याबाबतही भूमिका स्पष्ट करण्यात आली.
उपस्थित डॉक्टरांनी सांगितले की, कोणत्याही प्रकारच्या बंद किंवा आंदोलनामुळे सर्वसामान्य रुग्णांची गैरसोय होऊ नये, हीच आमची भूमिका आहे. त्यामुळे पुणे जिल्ह्यातील होमिओपॅथिक डॉक्टर तसेच विविध आयुष शाखांतील डॉक्टर रुग्णसेवा देण्यासाठी पूर्णपणे सज्ज असून, सर्व दवाखाने नियमितपणे सुरू राहतील. रुग्णसेवेत कोणताही अडथळा येऊ दिला जाणार नाही, असा विश्वासही यावेळी व्यक्त करण्यात आला.
यावेळी एनसीपी (शरदचंद्र पवार) वैद्यकीय आघाडीचे प्रदेशाध्यक्ष डॉ. सुनील जगताप, मनसे वैद्यकीय आघाडीचे प्रदेशाध्यक्ष डॉ. अजय तायडे, भाजपाचे पुणे शहर मा.उपाध्यक्ष डॉ. संदीप बुटाला, होमियोपॅथिक संघटनेचे डॉ. राजेश रांजणीकर, डॉ.टाकळकर, डॉ. राहुल काळभोर, डॉ. चंदन लोखंडे,डॉ. संदीप लुणावत, डॉ.सुनील मित्तल,डॉ. पोखरणा, जीपीएचे डॉ. संजय बुटाला आदी मान्यवर व पदाधिकारी उपस्थित होते.
याप्रसंगी सीसीएमपी होमिओपॅथिक डॉक्टर्स असोसिएशन, महाराष्ट्रचे अध्यक्ष डॉ. बाळकृष्ण गायकवाड यांनी सांगितले की, “सीसीएमपी पात्र होमिओपॅथिक डॉक्टरांना एमएमसी नोंदणी देण्याचा निर्णय हा शासनाने कायद्याचा सन्मान करत घेतलेला ऐतिहासिक निर्णय आहे.
या निर्णयामुळे अनेक वर्षांपासून न्यायाच्या प्रतीक्षेत असलेल्या हजारो डॉक्टरांना दिलासा मिळाला आहे. या लढ्यात सहकार्य करणाऱ्या शासन, लोकप्रतिनिधी, विविध संघटना आणि सर्व डॉक्टरांचे आम्ही मनःपूर्वक आभार मानतो. पात्र डॉक्टरांना लवकरात लवकर नोंदणी प्रमाणपत्र देण्यात यावे, अशी आमची अपेक्षा आहे.
आम्ही नेहमीप्रमाणे रुग्णसेवेलाच सर्वोच्च प्राधान्य देत महाराष्ट्रातील नागरिकांच्या आरोग्यसेवेसाठी कटिबद्ध आहोत.”
पत्रकार परिषदेच्या शेवटी उपस्थित सर्व डॉक्टरांनी शासनाच्या निर्णयाचे स्वागत करत, आरोग्यसेवा अखंडित ठेवण्याचा निर्धार व्यक्त केला.







