स्व. डॉ. संजीव मुजुमदार यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ ‘डॉ. संजीव मुजुमदार जीवनगौरव पुरस्कार’ जाहीर…

कोल्हापूर, दि. ३० : वेणूताई चव्हाण होमिओपॅथिक मेडिकल कॉलेज, दसरा चौक, कोल्हापूर येथे महाविद्यालयाचे ज्येष्ठ प्राध्यापक तथा विद्यार्थ्यांचे प्रेरणास्थान स्वर्गीय डॉ. संजीव मुजुमदार यांच्या पवित्र स्मृतीस भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी माजी विद्यार्थी संघटनेच्या वतीने श्रद्धांजली सभेचे आयोजन करण्यात आले.
या सभेला महाविद्यालयातील विविध बॅचचे माजी विद्यार्थी, प्राध्यापक, पदाधिकारी आणि मुजुमदार कुटुंबीय मोठ्या संख्येने उपस्थित होते.

यावेळी स्व. डॉ. संजीव मुजुमदार यांचे चिरंजीव सोहम मुजुमदार तसेच कन्या उपस्थित होत्या. उपस्थित मान्यवरांनी स्व. मुजुमदार सरांचे अध्यापनातील योगदान, विद्यार्थ्यांप्रती असलेले प्रेम, शिस्त, संस्कार आणि होमिओपॅथी क्षेत्रासाठी केलेल्या अमूल्य कार्याचा गौरव करत त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली वाहिली
.कार्यक्रमास माजी प्राचार्य डॉ. मोहन गुणे, डॉ. रमाकांत दगडे, डॉ. शिरीष पाटील, प्राचार्य डॉ. राजेश कागले, प्राध्यापक डॉ. डी. जी. शिंदे, प्रा. डॉ. अनिता कुलकर्णी, मराठा महासंघाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष वसंतराव मुळीक,माजी व्यवस्थापक शशिकांत कसबेकर यांची प्रमुख उपस्थिती होती.

तसेच माजी विद्यार्थी संघटनेचे डॉ. जयवंत पाटील, डॉ. दत्तात्रेय चोपडे पाटील, डॉ. विक्रम आडके, डॉ. गिरीश कोरे, डॉ. संतोष पाटील, रमा जमेनीस ,उद्योजक राजू लिंग्रस,राजेश डाके,सुहास पवार, डॉ.मकसूद पटेल, डॉ.अनिरुद्ध पत्की, डॉ.मिलिंद पोरे , डॉ.गिरीश कोरे ,राजू कसबेकर,महेश निकम, डॉ.अरुणा पाटील यांच्यासह अनेक माजी विद्यार्थी उपस्थित होते. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी श्री शाहू शिक्षण संस्थेचे मानसिंग बोंद्रे यांचे सहकार्य मिळाले तर डॉ. सुधीर पाटील यांनी विशेष परिश्रम घेतले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक माजी विद्यार्थी संघटनेचे सचिव डॉ. संदीप पाटील यांनी केले. आपल्या मनोगतात त्यांनी सांगितले की, “स्व. डॉ. संजीव मुजुमदार सर हे केवळ एक प्राध्यापक नव्हते, तर हजारो विद्यार्थ्यांच्या आयुष्याला दिशा देणारे आदर्श गुरु होते. त्यांनी दिलेले ज्ञान, शिस्त, सेवाभाव, रुग्णांविषयीची संवेदनशीलता आणि होमिओपॅथीविषयीची निष्ठा हीच त्यांची खरी ओळख होती.
आज आपण सर्वजण ज्या ठिकाणी आहोत, त्यामागे सरांचे मार्गदर्शन आणि संस्कार हे मोठे कारण आहे. त्यांच्या स्मृती जपणे आणि त्यांच्या विचारांचा वारसा पुढील पिढीपर्यंत पोहोचविणे, हीच त्यांना खरी श्रद्धांजली ठरेल
.”यावेळी माजी विद्यार्थी संघटनेचे अध्यक्ष डॉ. बाळकृष्ण गायकवाड यांनी महत्त्वपूर्ण घोषणा करत सांगितले की, सीसीएमपी होमिओपॅथिक डॉक्टर्स असोसिएशनच्या वतीने चालू वर्षापासून होमिओपॅथी क्षेत्रात उल्लेखनीय योगदान देणाऱ्या तरुण होमिओपॅथिक डॉक्टरांना स्व. डॉ. संजीव मुजुमदार यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ “डॉ. संजीव मुजुमदार जीवनगौरव पुरस्कार” प्रदान करण्यात येईल
. हा पुरस्कार दरवर्षी प्रदान करण्यात येणार असून, स्व. डॉ. मुजुमदार यांच्या कार्याचा आणि विचारांचा वारसा पुढील पिढीपर्यंत पोहोचविण्याचा हा एक छोटासा प्रयत्न असल्याचे त्यांनी सांगितले.
कार्यक्रमाच्या शेवटी सर्व उपस्थितांनी स्व. डॉ. संजीव मुजुमदार यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून दोन मिनिटे मौन पाळले. त्यांच्या ज्ञानदानाची, विद्यार्थ्यांवरील प्रेमाची आणि सेवाभावी कार्याची परंपरा पुढील पिढीपर्यंत पोहोचविण्याचा संकल्प यावेळी व्यक्त करण्यात आला.







