मुन्नार येथे जल संसाधन विषयक संसदीय स्थायी समितीची बैठक संपन्न

आज केरळ राज्यातील मुन्नार येथे जल संसाधन विषयक संसदीय स्थायी समितीची बैठक समितीचे अध्यक्ष मा. खासदार राजीव प्रताप रूडी यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली.
या बैठकीस समितीचे सदस्य म्हणून खासदार धैर्यशील मोहिते पाटील यांनीही उपस्थिती लावली .बैठकीमध्ये केरळ राज्यातील जलस्रोत व्यवस्थापन, पाणीटंचाई, हवामान बदलाचे जलसंपत्तीवर होणारे परिणाम, भूजल समस्यांचे वाढते स्वरूप तसेच पूर नियंत्रणाच्या उपाययोजनांचा सविस्तर आढावा घेण्यात आला.
हवामान बदलामुळे पर्जन्यमान व तापमानातील होत असलेले बदल, वाढती लोकसंख्या आणि पर्यटन क्षेत्राच्या विस्तारामुळे वाढत चाललेली पाण्याची गरज यामुळे निर्माण होणाऱ्या आव्हानांवरही सखोल चर्चा झाली.
यावेळी इडुक्की धरणाच्या व्यवस्थापन, सुरक्षितता, गाळ साचण्याची (Siltation) समस्या आणि पूर नियंत्रण यंत्रणेचा आढावा घेण्यात आला.
तसेच धरणालगतच्या कमांड एरिया डेव्हलपमेंट अँड वॉटर मॅनेजमेंट (CADWM) कार्यक्रमांतर्गत कालवा विकास, सिंचन कार्यक्षमता आणि जल व्यवस्थापनाच्या विविध उपाययोजनांवर चर्चा करण्यात आली.बैठकीत जलसंपत्तीचे शाश्वत व्यवस्थापन, हवामान बदलाच्या पार्श्वभूमीवर दीर्घकालीन जलनियोजन आणि भविष्यातील पाणी उपलब्धता सुनिश्चित करण्यासाठी केंद्र व राज्य सरकारांनी समन्वयाने काम करण्याची आवश्यकता अधोरेखित करण्यात आली.
जलस्रोतांचे संवर्धन, उपलब्ध पाण्याचा कार्यक्षम व नियोजनबद्ध वापर तसेच भविष्यातील जलसुरक्षा बळकट करण्यासाठी प्रभावी उपाययोजना राबविण्याबाबत विविध सूचना करण्यात आल्या.







