येरमाळा येथे श्री येडेश्वरी देवी यात्रा उत्साहात सुरु
येरमाळा : श्री येडेश्वरी देवी यात्रा गुरुवारपासून मोठ्या उत्साहात सुरू झाली असून, राज्यभरातून भाविक मोठ्या संख्येने यात्रेत सहभागी होत आहेत.
2एप्रिल ते 7एप्रिल या कालावधीत ही यात्रा होणार आहे.यात्रेनिमित्त येडेश्वरी मंदिर परिसरासह आमराई भागात धार्मिक आणि उत्सवी वातावरण निर्माण झाले आहे.चुना वेचण्यासाठी भाविकांची मोठी गर्दी होत आहे.
यात्रा सुरळीत पार पडावी यासाठी जिल्हा प्रशासनाने विशेष नियोजन केले आहे. जिल्हाधिकारी कीर्तीकुमार पुजार यांच्या मार्गदर्शनाखाली उपविभागीय अधिकारी गणेश शिंदे आणि तहसीलदार हेमंत ढोकळे यांनी विविध विभागांच्या समन्वयातून जबाबदाऱ्या पार पाडत आहेत.
दररोज आढावा बैठक घेऊन यात्रेची व्यवस्था सुरळीत ठेवण्यावर भर देण्यात येत आहे.मंदिर परिसरात तसेच आमराई भागात विविध व्यावसायिकांनी दुकाने व स्टॉल्स उभारले आहेत.
यात हॉटेल, कोल्ड्रिंक्स, ज्युस, आइस्क्रीम, प्रसाद, दागिने, खेळणी, फळे तसेच भांड्यांची दुकाने यांचा समावेश आहे. याशिवाय भाविकांच्या मनोरंजनासाठी रहाटपाळणे, “मौत का कुआ”, ब्रेकडान्स, झुले आणि हवेची घसरगुंडी यांसारख्या आकर्षणांची उभारणी करण्यात आली आहे.
यात्रेदरम्यान वाहतूक कोंडी टाळण्यासाठी जिल्हा पोलिस प्रशासनाने २ ते ५ एप्रिल या कालावधीत अवजड वाहनांसाठी बाह्य वळण निश्चित केले आहे. तसेच भाविकांना मार्गदर्शन करण्यासाठी मंदिर परिसर व मुख्य मार्गांवर दिशादर्शक फलक व नकाशे लावण्यात आले आहेत.
यात्रेसाठी राज्यभरातून लाखो भाविक येण्याची अपेक्षा असून, पहिल्या पौर्णिमेला विशेष गर्दी होण्याची शक्यता आहे. सध्या मंदिर परिसरात भाविकांची वाढती उपस्थिती दिसून येत असून, कुटुंबासह आलेले भाविक दर्शन, पूजा आणि विविध मनोरंजनाचा आनंद घेत आहेत. प्रशासन, पोलिस यंत्रणा आणि विविध विभागांच्या समन्वयामुळे यात्रा सुरक्षित, सुव्यवस्थित आणि आनंददायी वातावरणात पार पडत आहे.







