*संघर्ष योद्धा न्यूज वृत्तमालिका* *लग्न जमेना… कळी सुटेना* *कुंडली, गुणमिलन आणि मंगळ; श्रद्धेचा अतिरेक की लग्नातील अडथळा?* *क्रमशः भाग ४*
अकलूज (प्रतिनिधी):विवाह जुळवताना पूर्वी स्वभाव, कुटुंब पार्श्वभूमी आणि परस्पर समज याला प्राधान्य दिले जात होते. मात्र, सध्याच्या आधुनिक युगातही पत्रिका, गुणमिलन आणि ग्रहदोष यांना अतोनात महत्त्व दिले जात असल्याचे चित्र दिसून येत आहे
. मुलगा-मुलगी एकमेकांना पसंत असूनही, केवळ गुण जुळत नाहीत किंवा पत्रिकेत दोष आहे या कारणावरून अनेक योग्य स्थळे नाकारली जात आहेत. त्यामुळे विवाहप्रक्रियेत अनावश्यक अडथळे निर्माण होत असल्याची चर्चा सुरू आहे.
आजकाल विवाहासाठी बायोडाटासोबत पत्रिका पाठवणे जवळपास अनिवार्य झाले आहे. ३६ गुणांच्या पद्धतीनुसार गुण कमी भरल्यास पुढील चर्चाच होत नाही. विशेष म्हणजे, पूर्ण गुण जुळलेल्या जोडप्यांमध्येही वैवाहिक मतभेद आणि विभक्त होण्याच्या घटना समोर येत असल्याने, केवळ गुणांवर अवलंबून राहणे कितपत योग्य आहे, असा प्रश्न उपस्थित होत आहे
.दरम्यान, मंगळ, शनी, कालसर्प यांसारख्या ग्रहदोषांची भीतीही पालकांमध्ये मोठ्या प्रमाणात दिसून येते. “पत्रिकेत मंगळ आहे” असे समजताच अनेक स्थळे थेट नाकारली जातात.
या भीतीमुळे अनेक युवक-युवतींचे विवाह लांबणीवर पडत असून, काही प्रकरणांमध्ये पालकांमध्ये नैराश्यही वाढत असल्याचे दिसते. ज्योतिषांच्या सल्ल्यांवर मोठ्या प्रमाणात खर्च करूनही अपेक्षित परिणाम मिळत नसल्याच्या तक्रारी आहेत
.तज्ञांच्या मते, पत्रिका ही मार्गदर्शक ठरू शकते; मात्र तिच्यावर संपूर्ण अवलंबित्व ठेवणे योग्य नाही. आधुनिक काळात शिक्षण, विचारांची जुळवाजुळव, परस्पर आदर आणि आरोग्य यांसारख्या बाबींना अधिक महत्त्व देण्याची गरज व्यक्त केली जात आहे.
रक्तगट तपासणी किंवा आरोग्य चाचण्या या वैज्ञानिक दृष्टिकोनातून आवश्यक असल्या, तरी केवळ पत्रिकेतील गुणांवरून आयुष्याचे निर्णय घेणे अनेकदा घातक ठरू शकते
.*क्रमशः भाग ४* पुढील भागात : “हुंडा पद्धतीचे नवे स्वरूप आणि भपकेबाज लग्नाचा आर्थिक जाच”
#संघर्षयोद्धा #लग्नजमेना_कळीसुटेना #वृत्तमालिका #भाग४#कुंडली #गुणमेलन #मंगळदोष #अंधश्रद्धा#विवाहप्रक्रिया #समाजप्रबोधन #विचारांचीगरज#वैज्ञानिकदृष्टिकोन #नवीनपिढी #लग्नातीलअडथळे#सामाजिकप्रश्न #महाराष्ट्रन्यूज #अकलूजन्यूस
*संघर्ष योद्धा चे आवाहन :*
विवाह ही दोन व्यक्तींच्या आयुष्याला दिशा देणारी महत्त्वाची संस्था आहे. त्यामुळे केवळ पत्रिका, गुणमेलन किंवा ग्रहदोष यांच्या आधारावर निर्णय घेण्याऐवजी, मुला-मुलींचे विचार, स्वभाव, शिक्षण, आरोग्य आणि परस्पर आदर यांना प्राधान्य द्यावे.अंधश्रद्धेच्या आहारी न जाता वैज्ञानिक दृष्टिकोन स्वीकारणे ही काळाची गरज आहे.
योग्य स्थळ केवळ “गुण जुळले नाहीत” म्हणून नाकारणे टाळा. संवाद आणि समज यांवर आधारित नातीच टिकाऊ ठरतात.पालक आणि समाजातील सर्व घटकांनी पुढाकार घेऊन विवाहप्रक्रियेत सकारात्मक बदल घडवून आणावा, जेणेकरून तरुण पिढीचे आयुष्य अनावश्यक अडथळ्यांमुळे अडकून राहणार नाही.
“विचार जुळले तरच संसार फुलतो” — चला, बदलाची सुरुवात आजच करूया!







