लग्न जमविण्यासाठी युवकांची होतेय अग्निपरीक्षा हुंडा नको मामा फक्त पोरगी द्या मला
अकलूज (प्रतिनिधी) :


पूर्वी युवकांना शाळा शिकणे, नोकरी लागणे किंवा व्यवसाय करणे या आयुष्यातील महत्त्वाच्या परीक्षा द्यावा लागायच्या. या परीक्षांबरोबरच आता युवकांना लग्न जमण्याची अग्निपरीक्षा द्यावी लागत आहे. आयुष्याचा जोडीदार निवडण्यासाठी ग्रामीण भागातील युवकांना अक्षरशः संघर्ष करावा लागत आहे.
विवाह बंधनाच्या परीक्षेतून पास होण्यासाठी तिशी ओलांडलेल्या अनेक युवकांवर भावी सासऱ्याकडे ‘हुंडा नको मामा फक्त पोरगी द्या मला’ असे म्हणण्याची वेळ आली आहे.
२० वर्षांपूर्वी लोकसंख्या कमी असल्यामुळे गावाकडे प्रत्येक कुटुंबाला बऱ्यापैकी शेती असायची. आज लोकसंख्या वाढली आहे, परंतु शेतीचे प्रमाण तेवढेच असल्याने अनेक कुटुंबांमध्ये शेतीचे विभाजन झाले आहे. पूर्वी जास्त शेती असणाऱ्या शेतकरी वराचे लग्न जमण्यात अडचण येत नसायची. वधू पित्याकडून मागेल तेवढा हुंडा मिळवत लग्न केली जायची.
तसेच शेती व्यवसाय असला तरी वराला मागणी असायची. लोकसंख्या वाढत गेली त्या तुलनेतसरासरी स्त्री-पुरुष लिंग गुणोत्तर प्रमाण कमी झाले. प्रत्येक गावामध्ये मुलींची संख्या मुलांच्या तुलनेत कमी झाली. याचा परिणाम म्हणजे लग्नासाठी वधूच्या तुलनेत वरांची संख्या वाढली आहे. आजकाल वधुपिता व वधूच्या अपेक्षा वाढल्याने या अपेक्षांची पूर्ती करण्यासाठी वरबापाच्या अक्षरशः नाकीनऊ येत आहेत. त्यामुळे हुंडा तर लांबच फक्त लग्न करून द्या, या अटीवरती अनेक नवरदेव एका पायावर तयार असतात. यावर पर्याय म्हणून अनेक नवरदेव एखाद्या गरीब कुटुंबातील होतकरू मुलगी असल्यास स्वखर्चाने लग्न करून घेतात.
तसेच अनेक विवाह नोंदणी संस्था यामध्ये व्यवसाय म्हणून उतरल्या आहेत. वरपक्षाकडून वारेमाप कमिशन घेत विवाह जमवून दिले जात आहेत. यापैकी काही विवाह नोंदणी संस्था बोगस असल्याचे यापूर्वी घडलेल्या घटनांवरून निदर्शनास आले आहे.
वधू व वधुपित्याच्या अपेक्षा-(१) नवरदेवास किमान पाच एकर शेती असावी(२) शेती बरोबरच नोकरी/ व्यवसाय पाहिजे.(३) नवऱ्याला शेती पाहिजे, पण स्वतः शेती करण्याची मानसिकता नाही.(४) एकत्र कुटुंब नको, छोटे कुटुंब पाहिजे(५) चार चाकी गाडी, पुण्यामध्ये सदनिका पाहिजे.(६) राहण्यासाठी चांगले घर असावे.
पूर्वीच्या काळात ज्येष्ठांच्या शब्दाला मान असायचा. अनेक विवाह वरिष्ठांच्या शब्दाखातर जमवले जायचे. अलीकडील काळात वधूपक्षाच्या अपेक्षा वाढल्या आहेत.
युवकांनी नोकरी व व्यवसायामध्ये करिअर केल्यास लग्न जमवणे अधिक सोपे होते.पूर्वी वधूपित्याला आपली मुलगी मोठी झाली, की लग्न जमवण्यासाठी धावपळ करावी लागे. गेल्या काही वर्षांपासून ही जबाबदारी वरपित्याकडे आली आहे. ग्रामीण भागातील अनेक वरपिता आपल्या मुलासाठी वधूच्या शोधामध्ये असल्याचे दिसत आहे.
म्हणजेच लग्न जमण्याचे टेन्शन हे अलीकडे वधूपित्याकडून वरपित्याकडे आले आहे.







