शालेय शिक्षण अभ्यासक्रमात मुलींना आत्मसंरक्षणाच्या धड्याचा समावेश करणेबाबत खासदार धैर्यशील मोहिते पाटील यांना अमोल चिकणे यांचे वतीने निवेदन
अकलूज (प्रतिनिधी )शालेय शिक्षण अभ्यासक्रमात मुलींना आत्मसंरक्षणाच्या धड्याचा समावेश करणेबाबत भ्रष्टाचार विरोधी जनआंदोलन, महाराष्ट्र राज्य चे पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष-अमोल नामदेव चिकणे यांनी माढा लोकसभा मतदार संघाचे खासदार धैर्यशील मोहिते पाटील यांना निवेदन दिले.
दिनांक २५/०७/२०२४ रोजी महाराष्ट्र भर जिल्हाधिकारी कार्यालयासमोर करण्यात आलेली जनजागृती आंदोलने व निदर्शने करण्यात आली. या अनुषंगाने हे निवेदन देण्यात आले.निवेदनात असे सांगितले आहे की,शासन महिला सक्षमीकरणाच्या दृष्टीने विविध शासकीय योजना जाहीर करुन उपाययोजना करत आहे. परंतु खरोखरच महिलांचे सक्षमीकरण करण्यासाठी महिला व मुलींच्या बाबतीत होणा-या विनयभंग छेडछाड, अन्याय, अत्याचार व गंभीर गुन्ह्याचे प्रमाण कमी करुन महिलांना आत्मसन्मानाने जगता यावे यासाठी सुरुवातीपासून शालेय अभ्यासक्रमात आत्मसंरक्षणाच्या धड्यांचा समावेश केला तर मुलीचा आत्मविश्वास वाढून अशा पद्धतीच्या घटना व गुन्हे यांचे प्रमाण निश्चितच कमी होईल.त्यामुळे प्रशासनावरील ताणही कमी होवून महिलांच्या बाबतीत घडणा-या गुन्ह्यांची संख्या घटेल.संघटनेने यापूर्वी दिलेल्या निवेदनाच्या अनुषंगाने शासनाने प्रायोगिक तत्वावर एक महिन्याचे काही दिवसांचे प्रशिक्षण शाळा व महाविद्यालयात देवून चाचणी केली आहे. परंतु शारिरीक शिक्षण पाठ्यपुस्तकात सदरचा अभ्यासक्रमाची सक्ती केल्यास निश्चितपणे याचा फायदा सर्वच महिला व मुलींना होईल
त्यामुळे संघटना पुन्हा आपणास विनंती करत आहे याबाबत आपण शासन स्तरावर तात्काळ निर्णय घेवून महिला सक्षमीकरणाच्या दृष्टीने एक मजबूत वाटचाल करावी ही विनंती.आपण जबाबदार लोकप्रतिनिधी या नात्याने संघटनेच्या विनंतीचा स्विकार करुन शासन दरबारी याचा पाठपुरावा करावा अशी विनंती करण्यात आली आहे.









