एक अनोखी श्री गणेश सेवा.लालबाग च्या राजाचा प्रसाद लाखो भाविकांच्या मुखी किशोरसिंह माने पाटील यांचा अनोखा उपक्रम
अकलूज (प्रतिनिधी ): आपल्या परिसरातील लोकांना मुंबईला जाऊन लालबागचे दर्शन अथवा प्रसाद घेता येत नाही.अशांना श्रीं’चा प्रसाद मिळावा यासाठी गेली 36 वर्ष अकलूज चे माजी सरपंच किशोरसिंह माने पाटील गणेशोत्सवात लालबागच्या गणपतीला जातात तेथून प्रसाद आणतात. आणि जिथे जिथे अन्नदान होत आहे येथील अन्नात हा प्रसाद मिसळून अन्नदान करण्यास सांगतात.
अशा प्रकारे हा प्रसाद सुमारे एक लाख लोकांच्या मुखी जाईल अशी व्यवस्था करतात.मुंबईस्थित सुप्रसिद्ध गणपती ‘लालबागचा राजा’चे दर्शनासाठी महाराष्ट्रातून लाखो भावीक गणेशोत्सवात दर्शनासाठी जात असतात. हा गणपती नवसाला पावतो. अशी ही धारणा असल्याने अनेकांची दर्शन घेण्यासाठी ओढ असते. मात्र सर्वांनाच ते शक्य नसते. काहींना नोकरी, व्यवसायामुळे तर काहींना परिस्थिती अभावी तेथे जाणे शक्य नसते.
अशा लोकांसाठी आपण दर्शनाची सोय करू शकत नसलो तरी श्री गणेशाचा प्रसाद मात्र त्यांच्यापर्यंत पोहोचू शकू का या विचाराने अकलूजचे माजी सरपंच किशोरसिंह माने पाटील आणि त्यांचे चिरंजीव क्रांतीसिंह माने पाटील यांनी त्या दृष्टीने प्रयत्न करण्याचे ठरविले.
आता वाहने व रस्त्यांची चांगली सोय झाल्याने मुंबईला जाऊन येणे सहज शक्य आहे. परंतु सुमारे 36 वर्षांपूर्वी मुंबईला जाऊन येणे मोठे दिव्य होते.अशा परिस्थितीत ते अकलूजहून मुंबईला दर्शनासाठी जात. तेथून श्रींचा प्रसाद आणून अकलूज, माळशिरस. मगराचे निमगाव येथील सर्व गणेशोत्सव मंडळाच्या वतीने करण्यात येणाऱ्या अन्नदानात प्रसाद मिसळून वाटायला सांगतात.
आपले स्वकियांबरोबरच प्रत्येक रिक्षास्टॉप वर जाऊन प्रसाद वाटप करतात. त्याचप्रमाणे श्री स्वामी समर्थ अन्नछत्र अक्कलकोट,श्री गोंदवलेकर महाराज अन्नछत्र,गोंदवले येथे जाऊन तेथील अन्नात हा प्रसाद मिसळून सर्व भक्तांना वाढायला सांगतात. अशा प्रकारे सुमारे एक लाख लोकांच्या मुखी हा प्रसाद कसा जाईल यासाठी ते सतत कार्यरत राहतात.
गेली 36 वर्ष दरवर्षी गणपतीला जात असल्याने तेथील मित्र मंडळाची त्यांचा चांगला परिचय झाला असून या मंडळाच्या मित्रांबरोबर ते अक्कलकोट गाणगापूरसह पश्चिम महाराष्ट्रातील सर्व तीर्थक्षेत्रे, अष्टविनायक अशा यात्रेला जात असतात. यामध्ये माजी अध्यक्ष बाळासो खामकर, संकेत खामकर, श्री शिवब्रम्हे, तापेश, गणेश पवार आदींचा समावेश असतो.
अकलूजच्या शिवमृतचा पेढा ‘श्रीं’च्या चरणी
अकलूज हुन मुंबईला जाताना किशोरसिंह माने पाटील अकलूजच्या शिवामृत दूध उत्पादक संघाचा पेढा सोबत घेऊन जातात व श्री गणेश चरणी अर्पण करतात.












