76 व्या स्वातंत्र्यदिनाच्या हार्दिक शुभेच्छा…पुणे कोथरूड येथील श्रीमती रत्नप्रभादेवी मोहिते पाटील विद्यालयात स्वातंत्र्य दिन मोठ्या धुमधडाक्यात साजरा….
दि.15 ऑगस्ट रोजी पुणे कोथरूड येथील श्रीमती रत्नप्रभादेवी मोहिते पाटील विद्यालयांमध्ये डॉ. शशिकांत केकरे (निवृत्त अन्न व प्रशासन अधिकारी, महाराष्ट्र राज्य ) यांच्या हस्ते ध्वजारोहण संपन्न झाले. यावेळी प्रशाला समितीचे सदस्य डॉ. बाळकृष्ण गायकवाड ,मुख्याध्यापिका कुमारी जयश्री जावळे ,कुमारी लाजवंती जाधव उपस्थित होते.
76 व्या स्वातंत्र्यदिनानिमित्त विद्यालयामध्ये विद्यार्थ्यांनी स्काऊट, गाईड संचलन, विद्यार्थी भाषणे, पोवाडे, कवायती त्याचबरोबर गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करत स्वातंत्र्य दिन साजरा करण्यात आला. यावेळी प्रमुख पाहुणे डॉ. शशिकांत केकरे यांनी विद्यार्थ्यांना आहाराबाबत काय खावे व काय खाऊ नये याबाबतीत मार्गदर्शन करत स्वातंत्र्यासाठी ज्यांनी आपल्या प्राणाचे बलिदान केले अशांना स्मरून आपणही देशाचे काहीतरी देणे लागतो या हेतूने काम केले पाहिजे असे सांगत सर्वांना स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा दिल्या .कार्यक्रमाचे अध्यक्ष प्रशाला समितीचे सदस्य डॉ.बाळकृष्ण गायकवाड यांनी देशाला स्वातंत्र्य सहजासहजी मिळाले नसून यासाठी अनेकांनी प्राणांची बलिदान दिले असून 190 वर्ष परकियांनी भारत देशावर राज्य केले असे सांगत औरंगजेबानंतर 1757 ते 1947 पर्यंत “फोडा व राज्य करा” या नियतीने इंग्रजांनी आपल्या देशावर अत्यंत क्रूरपणे राज्य करत सत्ता गाजवली व या गुलामगिरीला हटवण्यासाठी स्वातंत्र्यवीर सावरकर,महात्मा गांधीं,लाला लजपत राय, नेताजी सुभाषचंद्र बोस,सुखदेव ,राजगुरू, भगतसिंग, चाफेकर बंधू इत्यादींनी इंग्रजांच्या विरुद्ध उठाव करत सर्वांना एकत्र करत एकीचे बळ काय असते हे दाखवत स्वातंत्र्य मिळवून दिले, जोपर्यंत चंद्र सूर्य तारे आहेत तोपर्यंत हा स्वातंत्र्याचा तिरंगा असाच फडकत राहावा यासाठी सर्वांनी मेहनत करणे प्रयत्न करणे गरजेचे असल्याचे सांगितले .सुसंस्कारीत तरुण विद्यार्थी हेच या देशाचे भवितव्य आहे त्यामुळे तरुणांनी आपले आचरण चांगले ठेवावे असे सांगत सर्वांना स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा दिल्या. प्रास्ताविकात प्रशालेच्या मुख्याध्यापिका कुमारी जयश्री जावळे यांनी स्वातंत्र्य दिनाचे महत्त्व सांगत विद्यालयांतील विविध उपक्रमाची माहिती सर्वांना दिली.यावेळी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शाळेतील विद्यार्थ्यांनी छानपणे नियोजनबद्ध , हजरजबाबीपणे केले. यावेळी सर्व विद्यार्थी, पालक, शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी व परिसरातील नागरिक उपस्थित होते.















