आयुष्याला अध्यात्माची जोड दिली तर ते सुंदर बनते : एकनाथ महाराज नामदास
जळगाव / प्रतिनिधी – चौं-यांशी लक्ष योनीतून प्रवास करीत असताना मनुष्य जन्म हा एकदाच मिळतो . या जन्माचे सार्थक करायचे असेल व ते सुंदर बनवायचे असेल तर त्याला अध्यात्माची जोड देणे आवश्यक आहे असे मत संत नामदेव महाराजांचे १७ वे वंशज ह भ प श्री एकनाथ महाराज नामदास यांनी व्यक्त केले . जळगाव येथे श्री क्षत्रिय अहिर शिंपी समाज हितवर्धक संस्थेच्या वतीने संत शिरोमणी श्री नामदेव महाराज यांच्या ७५२ व्या जयंती निमित्त भागवत धर्म प्रसारक समिती व पालखी सोहळा पत्रकार संघाच्या वतीने श्री क्षेत्र पंढरपूर ते श्री क्षेत्र घुमान ( पंजाब ) या जगातील पहिल्या महाराष्ट्र , गुजरात , राजस्थान , हरियाणा व पंजाब अशा सुमारे २५०० किलोमीटर आध्यात्मिक सायकल यात्रेचे यशस्वी आयोजन केल्याबद्दल अध्यक्ष सूर्यकांत भिसे यांचा मानपत्र देवून सन्मान करण्यात आला . त्यावेळी आयोजित समारंभात ते बोलत होते . अध्यक्षस्थानी आ सुरेश भोळे हे होते .श्री क्षत्रिय अहिर शिंपी समाज हितवर्धक संस्थेस ७५ वर्षे पूर्ण झाल्याबद्दल या अमृतमहोत्सवी वर्षाचे औचित्य साधून समाजातील पंच्याहत्तरी पूर्ण केलेल्या जेष्ठांचा सन्मान यावेळी संत नामदेव महाराजांच्या १६ व्या वंशज ह भ प विजया नामदास यांच्या हस्ते तर बालकांचा सन्मान संत नामदेव महाराजांचे १८ वे वंशज रत्ननाभ नामदास यांच्या हस्ते करण्यात आला . यानिमित्त आध्यात्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते . जेष्ठ समाजसेवक रामकिसनशेठ सोनवणे नगर मधील बालगंधर्व खुले नाट्यगृहात आयोजित समारंभास अध्यक्ष राजेंद्रकुमार सोनवणे , स्वागताध्यक्ष विवेक जगताप , प्रकल्प प्रमुख मुकुंद मेटकर , कार्याध्यक्ष शरदराव बिरारी , दीपक जगताप , सतीश पवार , चेतन खैरनार , राजेंद्र खैरनार , मनोज भांडारकर आदी मान्यवरांसह समाज बांधव उपस्थित होते .







