अकलूज (प्रतिनिधी )
अस्सल गावरान जेवणाच्या पंगतीत आमटीला अनन्यसाधारण महत्त्व असून त्यातही बाजार आमटीचे एक खास वैशिष्ट्य आहे. गरम भाकरी बरोबर डोळ्यातून पाणी येईपर्यंत फुरके मारत बाजार आमटी खाल्ल्याने तृप्तीची ढेकर येते. अशा चवीने व गुणाने श्रेष्ठ असलेल्या व अनेकांना तृप्तीची ढेकर देण्यास भाग पडणाऱ्या श्री नवले यांची बाजार आमटी आता चांगलीच सुप्रसिद्ध होत आहे.
वेड हे सर्वांनाच असते. कोणाला व्यवसायाचे, खेळाचे तर कोणाला कशाचे, काहीजनांना चमचमीत जेवण करण्याचे देखील वेड असते.सध्या अनेकजण आपल्या जेवणात ‘बाजार आमटी ‘आवर्जून खाताना दिसतात.हा एक अफलातून असा तर्रीबाज रस्स्याचा ग्रामीण पदार्थ.
पंढरपूर, सोलापूर भागात बऱ्याच ठिकाणी सार्वजनिक कार्यक्रमात हा पदार्थ पानात हमखास दिसतो…
पंढरपूर जवळील करकंब हे गाव या बाजार आमटीसाठी खूप प्रसिद्ध आहे…दरवर्षी पायी चालतं आलेल्या हजारो वारकऱ्यांच्यासाठी हे संपूर्ण गाव बाजार आमटी तयार करून या वारकऱ्यांच स्वागत करतं…प्रत्येक घराघरातून ही बाजार आमटी बनवली जाते आणि या वारकऱ्यांना जेवायला घातलं जात.अगदी कमीतकमी खर्चात, कमीतकमी वेळात आणि तरीही अतिशय उत्तम चवीची, भरपूर ऊर्जा देणारी ही आमटी तशी शहरी भागातील लोकांना फारशी माहीत नाही.
माळशिरस तालुक्यातील अकलूज (संग्रामनगर )येथील नवले स्पेशल बाजार आमटी देखील सध्या खूपच प्रसिद्ध आहे.
संग्रामनगर येथील संजय नवले आणि सुवर्णा नवले यांनी 24-01-2021रोजी बाजार आमटी बनवून ती विकायला सुरुवात केली. सुरवातीला थोडा कमी प्रतिसाद मिळाला. परंतु सध्या मात्र ही आमटी केवळ माळशिरस तालुकाच नव्हे तर माण, इंदापूर, पंढरपूर या तालुक्यात देखील प्रसिद्ध आहे. आजमितीला दररोज सुमारे 70ते 80लिटर बाजार आमटी ची 120रुपये प्रति लिटर प्रमाणे विकली जात आहे. शिवाय ऑर्डर दिल्यानंतर ही आमटी होम डिलिव्हरी केली जाते.अस्सल ग्रामीण रसरशीत तर्रीबाज रस्स्याचा हा पदार्थ म्हणजे चवीची एक उत्कृष्ट अनुभूती आहे.
ज्या काही उपलब्ध असतील तेवढ्या सर्व डाळी तूरडाळ, मटकीडाळ, चणाडाळ, उडीद डाळ, इत्यादी डाळी पासून ही आमटी बनविली जाते. ही आमटी शुद्ध शाकाहारी आहे.
ही आमटी खाण्याची पण खास पद्धत आहे.एका छोट्या पराती सारख्या डिशमध्ये ही बाजार आमटी, बाजूला गरमागरम भाकरी आणि हाताच्या बुक्कीने फोडलेला कांदा…सोबतीला जर हिरव्या मिरचीचा ठेचा किंवा खरडा असेल तर मग काय दिवाळीच…भाकरीचा भला मोठा तुकडा असा त्या पराती सारख्या डिश मध्ये मुरगळायचा आणि त्या आमटीबरोबरचा एक भला मोठा घास तोंडात टाकला की कलेजा खल्लास झालाच म्हणून समजा…काटा चमच्याने खाणाऱ्याला या सुखाचं महत्त्व कळणार नाहीचं…फुरक्यावर फुरके मारत रहावे आणि सोबतीला बुक्कीने फोडलेला कांदा. ही बाजार आमटी इतकी चविष्ट असते, की ही आमटी भाकरी वरपुन खाल्ली जाते. काहीजण जेवण झाल्यानंतर सुद्धा उरलेल्या आमटीची डिश अशी थेट तोंडाला लावून ओरपताना दिसतात.
नेहमीपेक्षा वेगळं काहीतरी म्हणून ही आमटी एकदा तरी चाखायलाच हवी.अस्सल ग्रामीण बाजाचा हा गरीबांचा श्रीमंत पदार्थ चवीचं वैभव अधोरेखित करतो.मागे पडत चाललेल्या या आपल्या महाराष्ट्रातील खाद्यपदार्थाला हातभार लावायलाच हवा.महाराष्ट्रभर या बाजार आमटीचं कोतुक होत आहे.
नवले यांच्या कुटूंबात संजय नवले, सुवर्णा नवले, दोन विवाहित मुली, मुलगा निलेश असा परिवार आहे. सुरवातीला नवले यांचे अहमदनगर येथील जावई अतुल दिलीप राऊत यांनी ही आमटी बनविण्यास शिकविले. असे सुवर्णा नवले आवर्जून सांगतात.
आठवड्यातून पाच दिवस दररोज 100लिटर च्या भल्या मोठया पातेल्यात ही बाजार आमटी बनविली जाते. यासाठी मुलगा निलेश नवले याची देखील मोलाची मदत होते. बाजारातून मंडई आणण्यापासून ते ऑर्डर दिलेल्या ना आमटी घरपोच देण्यापर्यंत सर्व छोटी -मोठी कामे तो आवर्जून करतो.मंगळवारी आणि शुक्रवारी मात्र अनेक जण नॉनव्हेज खात असल्यामुळे बाजार आमटी बनविली जात नाही.
नवले स्पेशल बाजार आमटी ही दर्जेदार साहित्य वापरून बनविली जाते. त्यामुळे ती रुचकर आणि स्वादिष्ट अशी आमटी आहे. परिसरातील खवय्ये आठवड्यातून किमान एकदा तरी ही आमटी आवर्जून खातात.
इतर ठिकाणी ही आमटी 150ते 200रुपये प्रति लिटर प्रमाणे विक्री केली जाते. परंतु नवले स्पेशल बाजार आमटी मात्र ना नफा ना तोटा या धर्तीवर अवघ्या 120रुपये प्रति लिटर प्रमाणे घरपोच विक्री केली जाते. त्यामुळे ग्राहक आवर्जून ही आमटी घेतात.
एव्हढेच नव्हे तर तर काहीजण आजही थंडी पडसे यावर जालीम उपाय म्हणून ही आमटी आवर्जून खातात. सध्या आपल्या कडे चायनीज खायचे नवे फॅड आले आहे. परंतु असे असले तरी या बाजार आमटी ला मात्र दिवसेंदिवस मागणी वाढत चालली आहे.
अकलूज आणि परिसरातील अनेक नागरिक आपल्या घरी असलेल्या एखाद्या कार्यक्रमात जेवणासाठी आवर्जून ही बाजार आमटी खाऊ घालतात.
चौकट :-
सदर बाजार आमटी ही प्रामुख्याने मानवी आरोग्याला आवश्यक असलेले सर्व जीवनस्तवे असलेल्या अनेक डाळी पासून बनविली जाते. ही पूर्णपणे शुद्ध शाकाहारी आहे.परंतु काही ग्राहक मात्र ही आमटी मटणाच्या रस्या सारखी लागते. असे म्हणतात. त्यामुळे खूप वाईट वाटते.
सुवर्णा नवले.











