पुणे येथे सहकार महर्षी शंकरराव मोहिते पाटील यांची 105 वी जयंती संपन्न …
15 जानेवारी 2023 रोजी कोथरूड , पुणे येथील शिक्षण प्रसारक मंडळ , अकलूजच्या श्रीमती रत्नप्रभादेवी मोहिते पाटील विद्यालयात संस्थेचे संस्थापक सहकार महर्षी शंकरराव मोहिते पाटील यांची 105 वी जयंती संपन्न झाली. सहकार महर्षी शंकरराव मोहिते पाटील यांच्या प्रतिमेचे पूजन प्रमुख पाहुण्या सौ निनादेवी देसाई, कार्यक्रमाचे अध्यक्ष प्रशाला समितीचे सदस्य डॉ. बाळकृष्ण गायकवाड , प्रशालेचे मुख्याध्यापक श्री. बी. ए. पवार सर प्राथमिक विभागाच्या मुख्याध्यापिका श्रीमती एल. व्ही . जाधव मॅडम, सवंगडी ज्येष्ठ नागरिक संघाचे रानडे सर व विद्यार्थी यांचे हस्ते करण्यात आले. विद्यार्थ्यांनी सर्वांगीण विकास करणे गरजेचे असून गुणवत्तापूर्ण शिक्षणाबरोबरच सर्वगुणसंपन्न विद्यार्थी घडणे ही काळाची गरज असून असेच विद्यार्थी हे देशाची बांधणी चांगल्या पद्धतीने करू शकतात त्यामुळे विद्यार्थ्यांनी सर्वगुणसंपन्न असणे गरजेचे असल्याचे मत प्रमुख पाहुण्या सौ नीनादेवी देसाई यांनी मांडले. कार्यक्रमाचे अध्यक्ष प्रशाला समितीचे सदस्य डॉ. बाळकृष्ण गायकवाड यांनी सहकार महर्षी यांनी कठीण परिस्थितीत निर्माण केलेले कार्य हे नवीन पिढीला प्रेरणादायक असून कठीण काळात सुद्धा हार न मानता कष्ट , जिद्द आणि चिकाटीच्या जोरावर काम केल्यास यश हे निश्चित मिळते. थोरांचे विचार हे आत्मसात करणे गरजेचे आहे असे सांगून सहकार महर्षींच्या पवित्र स्मृतीस विनम्र अभिवादन करत मकरसंक्रांतीच्या शुभेच्छा दिल्या. यावेळी कार्यक्रमाचे प्रास्ताविक मुख्याध्यापक श्री. बी. ए. पवार सर यांनी केले तर सहकार महर्षींच्या जीवनावर पहिलीची कुमारी आराध्या , आठवीचा कुमार शुभम तसेच शिक्षक श्री जाधव सर यांनी विचार मांडले.यावेळी सर्व शिक्षक , शिक्षकेतर कर्मचारी व पालक , विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
















