शिक्षण व सहकारातून ग्रामीण समृद्धी करणारे स. म. शंकरराव मोहिते पाटील
बुरसटलेल्या समाजव्यवस्थे विरुद्ध बंड करून उठणारे सुधारक महाराष्ट्रात अनेक निर्माण झाले. काळाच्या पटलावर त्यांनी आपले कर्तृत्व सिद्धही केले परंतु हा विचार सोलापूर जिल्ह्यत चिरंतन राखण्याची व्यवस्था उभी केली ती स. म. शंकरराव मोहिते पाटील यांनी. कोणताही सुधारक किंवा महापुरुष सहज निर्माण होत नाही. त्यांच्या ठायी विशेष गुण लागतात. समाजाविषयीचे कुतुहूल, रूढी परंपरामागील सत्य- असत्य तपासण्याची दृष्टी, चिकित्सकपणा आणि व्यवस्थेला प्रश्न विचारण्याची धमक या गुणांवर सुधारकांचा पिंड पोसला जातो. असे सुधारक आम्हाला लाभले हे आमचं भाग्यच. सोलापूर जिल्ह्यातील माळशिरस तालुका एकेकाळी अशिक्षित, अविकसीत असलेला परिसर. आज या भागाचा संपूर्ण कायापालट सर्वांगीण विकासातून समृद्ध झाला आहे. शैक्षणिक सुविधा, धवल क्रांती, उत्तम पर्यावरण अशा संपन्नतेचेच्या खुना आपल्या अंगाखांद्यावर मिरवत आहे. या साऱ्याचे श्रेय जाते स. म. शंकरराव मोहिते पाटील यांच्या दूरदृष्टीला, अथक परिश्रमांना आणि जाणत्या नेतृत्वाला… ग्रामीण भागातील साधने आणि ग्रामीण नेतृत्व या दोन कारणांमुळेच ग्रामीण भागाचा विकास होतो. खरेतर संघर्षाशिवाय उत्कर्ष नाही. माझा शेतकरी संपन्न व्हायचा असेल तर त्यांच्यासाठी हक्काचा साखर कारखाना हवा म्हणून प्रतिकूल परिस्थितीशी झगडा देऊन, भांडवलशाहीच्या कुटील कारस्थानांना मूठमाती देऊन शेतकऱ्यांचा विश्वास संपादन केला. जनावरे विकून, दागदागिने गहाण ठेवून, अन्नधान्य विकून सहकारी तत्वावर यशवंत सहकारी साखर कारखाना स्थापन केला. एक कोटी साठ लाख रूपये अंदाजपत्रक तंत्रज्ञांनी तयार केले होते पण मशनरी, इमारती, कामगार वसाहत इत्यादी सर्व कामे केवळ एक कोटी बेचाळीस लाख रूपायात पूर्ण झाले. उभारणीच्या काळातच अठरा लाख बचत करणारा हा एकमेव कारखाना त्याकाळी ठरला. यशवंतमूळे सोलापूर, सातारा व पुणे जिल्ह्यातील काही भागात सहकार चळवळीचे नवे पर्व सुरू झाले. सहकारी चळवळ ही आज सर्वसामान्यांची आशास्थान बनली आहे. या चळवळीला गती देण्याचे काम प्रामाणिक, निस्पृह, ध्येयवेडे आणि सामाजिक बांधिलकी मानणारे सहकारी कार्यकर्ते एकत्र येऊन, एकदिलाने आणि निरंतर कार्य करीत राहिले तर संस्था नेहमीच प्रगती साधतात. त्यांना कधीच अपयश येत नाही. शंकरराव मोहिते पाटील यांनी सहकाराची ऐवढी मोठी शिदोरी महाराष्ट्राला दिली. जिल्ह्यातील सहकारी चळवळीतील नेत्रदीपक कार्य म्हणजे याच वैचारिक आणि संस्थारूप शिदोरीवर, पिढ्यानपिढ्या पुरणारा मौलिक ठेवा आहे.सहकार महर्षीची सहकार क्षेत्रातील एकाधिकार कापूस योजना भारतात गाजली. इतर राज्यातील तज्ञांनी ही योजना आम्हालाही द्यावी म्हणून केंद्राकडे मागणी केली पण केंद्र सरकारने आर्थिक अडचणीमुळे त्याला मान्यता दिली नाही. सहकारातील शक्ती ओळखून त्यांनी जनसंघटना बांधली. सहकारातून समृद्धी हा विकासाचा मूलमंत्र खेड्यापाड्यांत रुजविला. ग्रामीण भागातील सर्वसामान्य शेतकऱ्यांना शेतीची तंत्रशुद्ध व आधुनिक उपयुक्त माहिती देता यावी यासाठी कृषी, पशु व औद्योगिक प्रदर्शन महाशिवरात्रीनिमित्त भरवित होते. यामध्ये पीक स्पर्धा, दूध स्पर्धा, मल्लांच्या जंगी कुस्त्या, विविध अवजारे, खते, औषधे, संकरित गोपैदास अशा अनेक विषयांची माहिती देत होते. आज सहकारी साखर उद्योग, दुग्ध प्रकल्प, विविध शैक्षणिक संस्था, कुकूटपालन, सार्वजनिक विकास ट्रस्ट, महीला गृह उद्योग, नागरी सहकारी बँका, सोसायटी, औद्योगिक संस्था, पाणीपुरवठा संस्था अशा अनेक सहकारी तत्त्वावर चालणाऱ्या संस्था निर्माण केल्या. त्यातील सर्वात महत्त्वाची म्हणजे शैक्षणिक संस्था….गरीब मुलांना विनामूल्य शिक्षण उपलब्ध व्हावे, आर्थिकदृष्ट्या मागासलेल्या पालकांना त्यांच्या पाल्यासाठी आर्थिक ताण पडू नये, हूशार प्रज्ञावंत मुलांना शिक्षणापासून वंचित राहू नये अशा उच्च याबरोबरच वसतीगृह तयार करून शिक्षणाची व राहण्याची मुलांची सोय केली. केवळ आर्थिक सुबत्तेने समाज परिवर्तन होणार नाही हे लक्षात घेऊन विज्ञान-तंत्रज्ञानाच्या मुशीतून बौध्दिक विकासाची नवी पिढी तयार झाली पाहिजे हे जाणून अनेक शैक्षणिक संस्था त्यांनी स्थापन केल्या. तसेच क्रीडा, नाट्य, तमाशा सारखी रांगडी लोककला अनेक क्षेत्रातून व महत्त्वाच्या उपक्रमातून साकार केल्या. समाजातील अज्ञात, अंधश्रद्धा व दारिद्रय घालवण्यासाठी झटत राहणे हीच खरी ईश्वर सेवा आहे असे नेहमी म्हणत. अधुनिक महाराष्ट्राच्या जडणघडणीत सहकार महर्षी चे शिक्षण व सहकार प्रसाराचे कार्य सर्वोच्च ठरले आहे. उत्तम कारभार, सजग मन, सामाजिक जाणीव, निस्वार्थ वृत्ती, माणसं जोडण्याची कला, समाजाभिमुख धोरणे या सर्वांचे मूर्तिमंत प्रतिक असणारे स. म. शंकरराव मोहिते पाटील यांच्या जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन करून त्रिवार मानाचा मुजरा…..
. प्रा. तात्यासाहेब शिवाजी काटकर, 9226144836सदाशिवराव माने विद्यालय अकलूज ता. माळशिरस जि. सोलापूर(लेखक करिअर समुपदेशक असून शिक्षण क्षेत्रात कार्यरत आहेत. शैक्षणिक, सामाजिक विषयावर लेखन करतात)








