छत्रपती संभाजी महाराज आणि ऐतिहासीक दस्तऐवजावर अधारीत वस्तुस्थिती…
महाराष्ट्रातील थोर अभ्यासक, इतीहास संशोधक डॉ जयसिंगराव पवार यांनी लिहलेले छत्रपती संभाजी महाराज चिकित्सक चरीत्र या ग्रंथातील महत्वाची माहीती पाहणे आवश्यक आहे. या ग्रंथाच्या मांडणीत अनंत सभासदाची बखर, मल्हार रामरावाची बखर,अनुपुराण, ग्रँड डफ, न्या महादेव रानडे, सत्यशोधकी साहित्यीक भाऊसाहेब पवार, द वा पोतदार, रियासतकार देसाई, वा सी बेंद्रे, सोनाबाई केरकरीण, राम गणेश गडकरी, औंधकर , वसंत कानेटकर, शिवाजी सांवत , कमल गोखले डॉ सदाशिव शिवदे यांनी लिहलेले, साहित्यातील , नाटकातील, ग्रंथातील, पत्राव्यावहारातील, संशोधनातील संभाजी राजे मांडलेले आहेत. या सर्वांच्या मांडणीचा आढावा घेत असतानाच, साहित्यीक, नाटककार बखरकारांनी केलेल्या आरोपांचे पुराव्यासह खंडण केलेले आहे. मुळातच ग्रंथाच्या सुरवातीलाच धर्मासाठी मृत्यु हि गोष्ट खोडून काढताना. कोणत्याही तात्कालीन कागदपत्रात नमुद नाही हे स्पष्ट करताना त्यावेळी औंरगजेबाच्या छावणीत असलेला साकी मुस्तैदखान व औरंगजेबाचा दुसरा इतिहासकार ईश्वरदास नागर यांंनी लिहलेले संदर्भ दिलेले आहेत. साहित्यीकांचे संभाजी महाराज मांडताना प्रतिभेच्या कल्पनेविश्वातून निर्माण केलेली गोदावरी, तुळसा व थोरांतांच कमळा या कलाकृती कशा पध्दतीने चुकीच्या आहेत हे ऐतिहासीक पुराव्याच्या आधारे द ग गोडसे व मु गो गुळवणी यांनी संशोधनाच्या आधारे मांडलेले आहे त्याचे स्पष्टीकरण केलेले आहे. आदय इतिहासकारांत यामध्ये ग्रँन्ड डफ, न्या रानडे, रियासतकार देसाई यांची केलेल्या मांडणी चिकीत्सा केलेली आहे. अनंत सभासद बखर ही तात्कालीन समजली जाते त्यामधील लिखाण दोष व उगवत्या सुर्याला नमस्कार करण्याची बखरकारांची वृत्ती, मल्हार रामराव बखर संभाजी महाराज यांचे नंतर सव्वाशे वर्षांनी लिहली गेली आहे या दोन्ही बखरीतील पुर्वग्रहदोष व खोटेपणा पुराव्याच्या व त्याच्याच मांडणीतील विरोधी लिखाणातून स्पष्ट केलेला आहे. सत्यशोधकी भाऊसाहेब पवार, वा सी बेंद्रे, डॉ कमल गोखले, डॉ सदाशिव शिवदे यांनी महाराष्टाला खरया अर्थाने संभाजी महाराजांचे वेगळेपण दाखवून दिले व खरे राजे लोकांसमोर पुराव्याच्या आधारे मांडण्यात आलेले स्पष्ट केलेले आहे. अँबे कँरे या फ्रेंच प्रवाश्याचे वर्णन व अनुपुराण यांचा संदर्भ घेत वडिलांच्या धैर्यशिल व किर्तीस साजेसा पराक्रमी रूपवान असे छत्रपती संभाजी महाराज मांडलेले आहेत. छत्रपती संभाजी महाराज यांचेवर झालेले विविध प्रकारचे आरोप त्यामध्ये रायगडावरील विद्रोहाचा आरोप, महाराणी सोयराराणी यांना भिंतीमध्ये चिणऩ्याचा आरोप, शिर्क्यांचे शिरकाण, छत्रपती शिवाजी महाराज यांचेवरील विषप्रयोगाचा आरोप, आण्नाजी दत्तो यांच्या मुलीच्या संदर्भात केलेले आरोप, विशिष्ठ धर्मासाठी काम करणारा राजा, या इतर अशा सर्व आरोपांची चिकित्सक मांडणी करताना त्या आरोपामधील फोलपणा स्पष्ट केलेला आहे. एकंदरीत मराठी मनावर राज्य करणारा पराक्रमी युवराज आवघ्या आठ नऊ वर्षाची कारकिर्द, घरीदारी शत्रू त्या सर्वांशी एकाचवेळी संघर्ष असा संघर्ष योध्दा या ग्रंथामध्ये मांडण्यात आलेला आहे.
इतिहास संशोधक विश्व़नाथ आवड अकलूज







