आपलं माणूस : संग्रामसिंह मोहिते पाटील
श्रेष्ठ अभिव्यक्ती म्हणून काही असते का ? असतेच असते. विचार ही सर्वश्रेष्ठ अभिव्यक्ती आहे पण नुसते विचार नव्हे तर विचार आणि त्यापाठोपाठ विचारानुकूल कृती ही श्रेष्ठ अभिव्यक्ती असते. आणि ही कृती विचारानुकूल कार्य आणि त्या कृती कार्यातील सातत्य ही सर्वश्रेष्ठ अभिव्यक्ती म्हणावी लागते. श्री संग्रामसिंह मोहिते पाटील आपल्या सर्वांचे आण्णासाहेब हे विचार आणि कृती या दोन्ही माध्यमातून व्यक्त होणारे बहुपरिचीत व्यक्तीमत्व. जनतेच्या जीवनात सुखाचे, दुःखाचे, अपयशाचे, आशेचे, निराशेचे असे अनेक प्रसंग येतात पण विचारांचा भक्कम पाया असणारी माणसं कुठल्याही प्रसंगी आपल्या माणसाच्या मागे ठामपणे उभी राहतात. अशा माणसात प्रथम स्थान कुनाचे तर आण्णासाहेबांचे. स्वतः मात्र प्रसिध्दीपासून दूर राहून माळशिरस तालुक्यातील गरजूंना वेगवेगळ्या पध्दतीने निःस्वार्थपणे आजही गाजावाजा न करता मदत करत असतात.सोलापूर जिल्ह्याचे भाग्यविधाते, माळावरच्या नंदनवनाचे स्वप्न अस्तित्वात उतरवणारे, ग्रामीण भागाचा विकास व कल्याणाचा ध्यास घेणारे, सहकाराचा महामेरू स.म. शंकरराव मोहिते पाटील, महाराष्ट्र राज्याचे माजी उपमुख्यमंत्री मा.श्री. विजयसिंह मोहिते पाटील व शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष मा.श्री. जयसिंह मोहिते पाटील अशा या तत्वनिष्ठ, गुणांनी, विचारांनी, समाजाला प्रेरणा देणारे, कार्याने अतिशय उंची गाठलेल्या लोकांचे संस्कार, वारसा लाभलेले व त्यांच्या कामातून घडत गेलेले आण्णासाहेब यानी आपल्या सामाजिक व राजकीय कारकिर्दीत २००५ पासून आशिया खंडातील सर्वात मोठी असलेली अकलूज ग्रामपंचायतीत सदस्य, उपसरपंच आणि सरपंच पद भूषवून अकलूजच्या विकासाला गती देऊन अकलूजचा चेहरामोहराच बदलून टाकला.स्वतः चे घर असावे प्रत्येकाचे स्वप्न असते. अकलूजमधील गरीब, कष्टकरी, कामगारांचे हे स्वप्न घरकुलांच्या माध्यमातून आण्णासाहेबांनी पूर्ण केले. विकासनगर झोपडपट्टीत लाईट, पाणी व रस्ता या सुविधा दिल्या. गावातील लोकांना पिण्यासाठी स्वच्छ पाणी घरपोच म्हणजे वाँटरसप्लाय सुरू केली. सिमेंट रस्ते, भव्य अशी ग्रामपंचायत इमारत उभी केली. तसेच मध्यमवर्गातील लोकांना व्यवसाय करण्यासाठी ग्रामपंचायतीच्या माध्यमातून गाळे बांधून दिले. शिवसृष्टी उद्घाटन सोहळा, गौरव मराठी मातीचा, गौरव भारतीय लोककलेचा, प्रजासत्ताक दिन अशा वेगवेगळ्या सांस्कृतिक कार्यक्रमात आपले मोलाचे योगदान. तसेच ग्रामीण भागातील मुलांना खेळाचे शास्त्रशुद्ध प्रशिक्षण मिळावे म्हणून अद्ययावत इंडोर स्टेडियम उभारले.इनोव्हेशन आणि इन्व्हेन्शन दोन्हीही गोष्टी विद्यार्थ्यांना मारूनमुटकून शिकवून जमत नसतात. त्या चौकसबुद्धी, चुणचुणीतपणा आणि मेहनतीचा परिपाक असतात. प्रश्न शोधण्याची नजर आणि उत्तर शोधण्याची चिकाटी ओळखून केंद्र सरकारच्या मदतीने तीन विद्यालयात “अटल टिंकरिंग लॅबोरेटरीज’ (ATL) सुरू केल्या. शालेय विद्यार्थ्यांमध्ये नवनिर्मितीची संस्कृती (इनोव्हेशन) बिंबवणे हा त्यांचा उद्देश आहे. विद्यार्थ्यांच्या बौद्धिक विकासाबरोबरच शारिरीक विकास व्हावा यासाठी आपले प्रयत्न दिसतात. ६३९० खेळाडूंना सहभागी करून पारंपरिक खेळ लेझीम भव्यदिव्य प्रदर्शन केले. ग्रीनीज वर्ल्ड बुकमध्ये त्याची नोंद झाली.आपली शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष म्हणून निवड झाली आणि सर्वात जास्त आनंद माळशिरस तालुक्यातील सामान्य जनता व शिक्षक शिक्षकेतर सेवकांना झाला. सामाजिक बांधिलकी जपत मित्रमंळाच्या सहाय्याने २००३ पासून सलग सतरा वर्षे रक्तदान शिबिर आयोजित करून हजारो लोकांना संजीवणी दिली. ४५ हजार पेक्षा जास्त खेळाडूंना लेझीम चे प्रशिक्षण दिले. तसेच वृक्षारोपण, ग्रामस्वच्छता अभियान, अस्थिरोग व दंतरोग तपासणी उपचार, अवयवदान नोंदणी शिबीर, व्यसनमुक्ती शिबीरे आयोजित केली. तसेच लेझीम, बँडमिंटन, बुद्धिबळ, लेदर व टेनिस बाँल क्रिकेट स्पर्धा, कबड्डी खुला गट, बालक्रीडा अशा अनेक खेळांचे राज्यस्तरीय स्पर्धांचे यशस्वीपणे आयोजन, नियोजन केले.कोरोना काळात निसर्गालाच माणूस नकोसा झाला असं वाटत होतं. कुटुंबातील कितीजण मृत्यू पावले व किती राहिले काहिच कळू दिले नाही. पेशंटला बेड मिळत नव्हते, औषधे, उपचार मिळत नव्हते. अशा परिस्थितीत अनेक लोकांना आण्णासाहेबांनी मदत केली. पै पै जोडून उभा केलेला संसार अचानक एका रात्रीत महापूराने विसकटू टाकलेल्या कुटुंबातील लोकांना आधार देऊन जिवनावश्यक वस्तूंची मदत केली. माणसांच्या या गर्दीत अनेक चेहरे भेटतात. काही चांगले, काही वाईट काही कधीच लक्षात न राहणारे आणि काही कायमचे मनात घर करणारे. त्यातीलच आपण, कायम आठवणीत सर्वांच्या राहणारे, काम करणारे…… म्हणूनच, या वाढदिवसानिमित्त तुम्हाला आमच्या सर्वांकडून आपुलकीच्या शुभेच्छा !
प्रा. तात्यासाहेब शिवाजी काटकर 9226144836(सदाशिवराव माने विद्यालय, अकलूज)






































