अकलूज येथील बी बियाणे विक्रेते यांचेकडून खरेदी केलेले मकेचे बियाणे सदोष असल्याचा तालुका निविष्ठा विषयक तक्रार निवारण समिती चा निर्वाळा.
अकलूज : (प्रतिनिधी )येथील आझाद चौकात असणाऱ्या सुनील ट्रेडिंग कंपनी या बी बियाणे विक्रेत्याने विकलेल्या हायटेक सीड प्रायव्हेट लिमिटेड कंपनीच्या सोना मकेचे बियाणे सदोष असल्याचा निर्वाळा तालुका निविष्ठा विषयक तक्रार निवारण समितीने दिलेला असून सदर शेतकऱ्यास आता तरी न्याय मिळेल का याबाबत उलट सुलट चर्चा अकलूज परिसरात रंगली आहे.यासंदर्भात अधीक माहिती अशी की,मौजे लवंग ( तालुका माळशिरस ) येथील शेतकरी बापूराव ज्ञानोबा वाघ यांनी आझाद चौक अकलूज येथील सुनील गांधी यांच्या सुनील ट्रेडिंग कंपनी या बी बियाणे विक्री दुकानातून बुधवार (ता. 17 ऑगस्ट 22 ) रोजी मकेचे हायटेक सोना कंपनीचे 5101 हे बी पेरणीसाठी विकत घेतले. सदर मका पेरल्यानंतर चार ते पाच दिवसांनी संपूर्ण मका उगवणे अपेक्षित होते परंतु सलग चौदा दिवस झाले तरी त्याची 50 टक्के सुद्धा उगवण झाली नाही. त्यानंतर सुमारे 90 दिवस झाले तरी या पन्नास टक्के उगवणीतीलही त्याची उंची कमी असून कुठलीही फळधारणा झालेली नाही. अशी तक्रार गुण नियंत्रण निरीक्षक तथा कृषि अधिकारी पं. स. माळशिरस यांचेकडे 27-10-2022रोजी केली होती. त्यानंतर सदर तक्रारीची दखल घेऊन तालुका पीक तक्रार निवारण समिती ने 15-11-2022रोजी भेट दिली असता, हायटेक सीड इंडिया प्रा. लि. हैद्राबाद कंपनीच्या मकेचा 5101सोना या वाणा च्या झाडाची उंची कमी दिसून आली. पीक 80दिवसापूर्वी घेऊन देखील कणसे लागलेली दिसून आली नाहीत. त्यामुळे शेतकऱ्यांचे सरासरी 75%आर्थिक नुकसान होण्याची शक्यता आहे. सदर नुकसानी ची सदोष बियाणे व पीक व्यवस्थापन अशी असल्याचा निर्वाळा दिला आहे.वास्तविक पाहता,बापूराव वाघ यांना केवळ एक एकर जमीन असून कुटुंबाचा उदरनिर्वाह या एक एकर जमिनीवरच अवलंबून आहे. बऱ्याचदा निसर्गाच्या अवकृपेमुळे त्या एकर जमिनीतील उत्पन्न नाहीसे होते व उपासमारीची वेळही त्यांच्यावर येत असते.परंतु या वेळेस निसर्गाने साथ दिली असली तरी निकृष्ट बियाण्यामुळे पुन्हा उपासमारीची वेळ आणली आहे. अनेकदा निसर्गाच्या अवकृपेमुळे हातचे पीक गेल्याने कर्जबाजारी झालेल्या या शेतकऱ्यास पुन्हा कर्ज मागण्याची वेळ आली आहे.सदर शेतकऱ्याने पीक लावण्यापूर्वी नांगरट, रोटरणी, ट्रॅक्टर पेरणी, तणनाशक फवारणी, शेणखत, युरिया साठी सुमारे 25000रुपये खर्च केला आहे.परंतु झाडांना कणसे न लागल्यामुळे शेतकऱ्याचे मोठे नुकसान झाले आहे.अकलूज येथील बियाणे विक्रेत्याकडे गेल्यानंतर बियाणे घेणेपर्यंत ते या बियाण्यामुळे जास्त उत्पन्न येईल जास्त फायदा होईल अशा बड्या बड्या गोष्टी सांगतात.परंतु प्रत्यक्ष तसे होताना काहीच दिसत नाही. सदोष बियाणे निघाल्यावर मात्र ते कंपनीकडे बोट दाखवून रिकामे होतात. मग ही दुकाने फक्त नफा मिळवण्यासाठीच आहेत का ? शेतकऱ्यांच्या होणाऱ्या नुकसानीस ते जबाबदार नाहीत का? शेतकऱ्यांनी नुकसान भरपाई मागितल्यानंतर कोर्टात जावा असा प्रेमळ सल्ला देतात.परंतु शेतकऱ्यांना ते परवडणारे आहे का ?आता बियाणे सदोष असल्याचा अहवाल प्राप्त झाला असून ग्राहक मंचकडे दाद मागणार असल्याचे शेतकरी बापू वाघ यांनी सांगितले.







