*निळवंडे प्रकल्पाच्या उद्घाटनासाठी विखे पिता-पुत्रांचे मोदींना निमंत्रण*
अहमदनगर : अहमदनगर जिल्ह्यात महत्त्वाचे समजले जात असलेल्या निळवंडे धरण प्रकल्पाचे उद्घाटनासह विविध विकास कामांचे लोकार्पण लवकरच होणार आहे. या कार्यक्रमासाठी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी यावे असे निमंत्रण सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील व खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांनी दिले आहे.दिल्ली येथे पंतप्रधान यांची विखे पिता-पुत्रांनी आज भेट घेतली. यावेळी शिर्डी संस्थान द्वारे १०९ कोटी रुपयांच्या निधीतून विकसित करण्यात आलेले दर्शन रांगेचे १२ हॉल, २१८ कोटी रुपयांच्या निधीतून विकसित करण्यात आलेल्या एज्युकेशन कॉम्प्लेक्सचे उद्घाटन, निळवंडे धरण, शिर्डी विमानतळ येथील नवीन टर्मिनल बिल्डिंग आणि शिर्डीतील अंतर्गत रस्त्यांच्या लोकार्पणासाठी त्यांना निमंत्रित केले. हे कार्यक्रम मार्च २०२३ मध्ये होणार आहेत. या कार्यक्रमांना येणार असल्याबाबत पंतप्रधान मोदी यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला, अशी माहिती खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून दिली.









