अकलूज येथील 190शिवभक्त मावळ्यांनी केले धार्मिक , ऐतिहासिक , सांस्कृतिक वारशाचे रायगड देशाटन.

अकलूज (प्रतिनिधी )रायगड हे आपल्या धार्मिक , ऐतिहासिक , सांस्कृतिक वारशाचे संपन्न असे ठिकाण आहे . हे ठिकाण म्हणजे केवळ पर्यटनासाठी नसून देशाटनासाठी म्हणजे देश काल स्थिती जाणण्यासाठी आहे. हा उदात्त हेतू मनी बाळगून अकलूज येथील राष्ट्रीय स्वयंसेवक संघ,शिव प्रतिष्ठान हिंदुस्थान,वारसा परिवार,यांच्या वतीने 3ते 4डिसेंबर रोजी रायगड देशाटन चे आयोजन करण्यात आले होते.3डिसेंबर रोजी संध्याकाळी अकलूज चे ग्रामदैवत आई अकलाई मंदिर येथून देवीचे दर्शन घेऊन 10-30वाजता तीन ट्रॅव्हल्स, एक स्कूल बस मधून 30पती -पत्नी साठी एक ट्रॅव्हल,45महिलांसाठी एक ट्रॅव्हल,115पुरुषांसाठी एक ट्रॅव्हल व बस असे नियोजन करून एकूण 190शिवभक्त मावळ्यांनी रायगड कडे प्रस्थान केले.तत्पूर्वी शिवरत्न शिक्षण संस्थेचे अध्यक्ष धैर्यशील मोहिते पाटील व माजी जि. प. सदस्या तथा डॉटर मॉम्स फौंडेशन च्या अध्यक्षा सौ. शितलदेवी मोहिते पाटील यांनी उपस्थित राहून गडावर गेल्यानंतर पावित्र्य राखा,इतिहासाची माहिती घ्या.महाराजांचे विचार, संस्कार, दूरदृष्टी आठवा,ऐतिहासिक वारसा जतन करा, असे सांगत सर्वांना शुभेच्छा दिल्या.4डिसेंबर रोजी सकाळी 8वाजता सर्वजण रायगड येथे पोहचले.त्यानंतर सकाळी अंघोळ करून मोहिमेतील शिवभक्तांनी प्रेमाने बनवलेली झणझणीत मिसळ -पाव खाऊन सकाळी 10-30च्या सुमारास काहीजण रोप वे मधून तर काहीजणांनी पायऱ्या वरून रायगड चढायला सुरुवात केली. साधारणपणे दुपारी 1वाजता सर्वजण रायगड वर पोहचले.सदर मोहीम फत्ते करण्यासाठी शिवाजी घोडके, रोहित सूर्यवंशी,गणेश इंगळे,सुधीर पवार,राहुल माने,हर्षवर्धन भुतनाळ, लक्ष्मीकांत वाघे,सूरज सूर्यवंशी,सचिन शिंदे,सागर देवकाते,दिपराज माने देशमुख ,दिपक चिंतामनी,प्रतीक्षा ताई माने देशमुख,वर्षाताई गायकवाड यांनी यशस्वी नियोजन करून प्रयत्नांची पराकाष्टा केली.किल्ले रायगड हा महाराष्ट्रातील रायगड जिल्ह्यातील सह्याद्रीच्या पर्वतरांगांत महाड जवळ असून समुद्रसपाटीपासून सुमारे ८२० मीटर (२७०० फूट) उंचीवर आहे. मराठी साम्राज्याच्या इतिहासामध्ये त्याची एक खास ओळख आहे. छत्रपती शिवाजीराजांनी रायगडचे स्थान आणि महत्त्व पाहून १६ व्या शतकात याला आपल्या राज्याची राजधानी बनविली. 6जून 1674साली ऐतिहासिक शिवराज्याभिषेक सोहळा याच ठिकाणी झाला. इंग्रजांनी गड कब्जात घेतल्यानंतर लुटून त्याची नासधूस केली. सदर किल्ला हा महाराष्ट्र शासनाच्या मुंबई येथील पुरातत्त्व विभागाचे संरक्षित स्मारक आहे.हिरोजी इंदुलकर निर्मित हा किल्ला असून किल्ल्याकडे जाण्यासाठी सुमारे १७३७ पायऱ्या आहेत.गड चढून जाण्यासाठी साधारणपणे दोन तास लागतात. तसेच ज्येष्ठ नागरिक आणि अपंग साठी रायगड रोपेवे चा वापर करून 10 मिनिटांत किल्ल्याच्या शिखरावर पोहचण्याची सोय आहे. यासाठी जाऊन येण्यासाठी 310रुपये शुल्क घेतले जाते.१८१८ मध्ये इंग्रजांनी कब्जा केल्यानंतर रायगड किल्याचा काही भाग इंग्रजांनी लुटला आणि नष्ट केला आहे.गडावर अनेक ऐतिहासिक प्रेक्षनीय स्थळे आहेत.पाचाड येथील जिजाबाईंचा वाडा:-गडावर जाण्यापूर्वी खाली जवळच पाचाड येथे राजमाता जिजाबाईंचा वाडा आहे.उतारवयात जिजाबाईंना गडावरची थंड हवा, वारा मानवत नसे, म्हणून महाराजांनी त्यांच्या साठी पाचाडजवळच एक वाडा बांधून दिला. तोच हा मासाहेबांचा राहता वाडा. वाड्याची व्यवस्था ठेवण्यासाठी काही अधिकारी तसेच शिपायांची व्यवस्थाही महाराजांनी केली होती. पायऱ्यांची एक उत्तम विहीर, तसेच जिजाबाईंना बसण्यासाठी केलेले दगडी आसन बघण्यासारखे आहे. यास ‘तक्क्याची विहीर’ असेही म्हणतात.महादरवाजा :-गड चढून गेल्यावर सुरवातीलाच मुख्य प्रवेशद्वार म्हणजेच महादरवाजा लागतो.महादरवाजाच्या बाहेरील अंगास वर दोन्ही बाजूस दोन सुंदर कमळाकृती कोरल्या आहेत दरवाजावर असणाऱ्या या दोन कमळांचा अर्थं म्हणजे किल्ल्याचा आत ‘श्री आणि सरस्वती’ नांदत आहे. ‘श्री आणि सरस्वती’ म्हणजेच ‘विद्या व लक्ष्मी’ होय. महादरवाजाला दोन भव्य बुरूज असून एक ७५ फूट तर दुसरा ६५ फूट उंचं आहे. तटबंदीमध्ये जी उतरती भोके ठेवलेली असतात त्यास ‘जंग्या’ म्हणतात. शत्रूवर मारा करण्यासाठी ही भोके ठेवलेली असतात. बुरुजांमधील दरवाजा हा वायव्य दिशेस तोंड करून उभा आहे.चोरदिंडी:- महादरवाजातून आत आल्यावर पहारेकऱ्यांचा देवड्या दिसतात.तसेच संरक्षकांसाठी केलेल्या राहण्याचा खोल्या दिसतात. महादरवाजापासून उजवीकडे टकमक टोकापर्यंत तर डावीकडे हिरकणी टोकापर्यंत तटबंदी बांधलेली आहे.त्याचप्रमाणे महादरवाजा तुन आत गेल्यानंतर एक तटबंदी लागते. तीच चोरदिंडी .महादरवाजापासून उजवीकडे टकमक टोकापर्यंत जी तटबंदी जाते, त्यावरून चालत गेल्यास जिथे ही तटबंदी संपते, त्याच्या थोडे अलीकडे बुरुजात ही चोरदिंडी बांधलेली आहे. बुरुजाच्या आतून दरवाजापर्यंत येण्यासाठी पायऱ्या आहेत.हत्ती तलाव :-गडावर प्रवेश केल्यावर महादरवाजातून थोडे पुढे आल्यावर जो तलाव दिसतो तो हत्ती तलाव. गजशाळेतून येणाऱ्या हत्तींच्या स्नानासाठी आणि पिण्यासाठी या तलावाचा उपयोग होत होता.गंगासागर तलाव :-हत्तीतलावापासून जवळच रायगड जिल्हा परिषदेच्या धर्मशाळेच्या इमारती दिसतात. धर्मशाळेपासून दक्षिणेकडे अंदाजे ५० -६० पावले चालत गेल्यास जो तलाव लागतो तो गंगासागर तलाव. महाराजांच्या राज्याभिषेकानंतर सप्तसागर व महानदी ची आणलेली तीर्थे याच तलावात टाकली गेली. म्हणूनच याचे गंगीसागर असे नाव पडले. शिवाजी महाराजांचा काळात शिबंदीसाठी याचे पाणी वापरण्यात येई.स्तंभ :- गंगासागराच्या दक्षिणेस दोन उंच मनोरे दिसतात. त्यास स्तंभ म्हणतात. जगदीश्वराच्या शिलालेखामध्ये ज्या स्तंभांचा उल्लेख केला आहे, ते हेच असावेत. ते पूर्वी पाच मजली होते असे म्हणतात. ते द्वादश कोनी असून, बांधकामात नक्षीकाम आढळते.पालखी दरवाजा : -स्तंभांच्या पश्चिमेस भिंत असलेल्या भागातून ३१ पायऱ्या बांधलेल्या दिसतात. त्या चढून गेल्यावर जो दरवाजा लागतो तो पालखी दरवाजा. या दरवाजातून बालेकिल्ल्यात प्रवेश करता येतो.मेणा दरवाजा :- पालखी दरवाजाने वर प्रवेश केला की, चढउतार असलेला एक सरळ मार्ग आपल्याला मेणा दरवाजापर्यंत घेऊन जातो.राणीवसा :-उजव्या हातास जे सात अवशेष दिसतात. ते आहेत राण्यांचे महाल. मेणा दरवाजातून बालेकिल्ल्यावर प्रवेश करता येतो. राजभवन : -राणीवशाच्या समोर डाव्या हातास दासदासींच्या मकानांचे अवशेष दिसतात. या अवशेषांच्या मागे दुसरी जी समांतर भिंत आहे त्या भिंतीचा मध्यभागी जो दरवाजा आहे तेथून बालेकिल्ल्याच्या अंतर्भागात प्रवेश केला की जो प्रशस्त चौथरा लागतो तेच हे महाराजांचे राजभवन. राजभवनाचा चौथरा ८६ फूट लांब व ३३ फूट रुंद आहे.रत्नशाळा : -राजप्रासादाजवळील स्तंभांच्या पूर्वेकडे असलेल्या मोकळ्या जागेत एक तळघर आहे, तीच ही रत्नशाळा. हा खलबतखाना म्हणजेच गुप्त बोलणी करण्यासाठी केलेली खोली असावी असेही म्हणतात.राजसभा : -महाराजांचा राज्याभिषेक जेथे झ़ाला, तीच ही राजसभा. राजसभा २२० फूट लांब व १२४ फूट रुंद आहे. येथेच पूर्वेकडे तोंड केलेली सिंहासनाची जागा आहे. येथे बत्तीस मणांचे सोन्याचे सिंहासन होते.याठिकाणी आता प्रतिकृती आहे.सभासद बखर म्हणते, ‘तख्त सुवर्णाचे बत्तीस मणांचे सिद्ध करवले. नवरत्ने अमोलिक जितकी कोशात होती, त्यामध्ये शोध करून मोठी मोलाची रत्ने जडाव केली.’ नगारखाना : -सिंहासनाच्या समोर जे भव्य प्रवेशद्वार दिसते तोच हा नगारखाना. हे बालेकिल्ल्याचे मुख्य प्रवेशद्वार आहे. नगारखान्यातून पायऱ्या चढून वर गेले की माणूस किल्ल्यावरील सर्वाधिक उंचीवर असतो. बाजारपेठ : -नगारखान्याकडून डावीकडे उतरून आले की, समोर जी मोकळी जागा दिसते तो ‘होळीचा माळ’. तेथेच आता शिवछत्रपतींचा भव्य पुतळा बसवलेला आहे. पुतळ्यासमोर जे दोन रांगांमध्ये भव्य अवशेष दिसतात तीच शिवाजी महाराजांच्या काळातील बाजारपेठ. पेठेच्या दोन रांगात प्रत्येकी २२ दुकाने आहेत. दोन रांगांमधून जवळजवळ चाळीस फूट रुंदीचा रस्ता आहे.ही बाजार पेठ आजही हुबेहुब जसेच्या तशीच आहे.शिरकाई देऊळ : -महाराजांच्या पुतळ्याच्या डाव्या बाजूस जे छोटे देऊळ दिसते ते शिरकाईचे देऊळ. शिरकाई ही गडावरील मुख्य देवता. शिर्के पाचव्या शतकापासून रायगडाचे स्वामी होते. याची आठवण देणारी गडस्वमिनी शिरकाई हिचे मंदिर गडावर आहे. लोकमान्य टिळकांच्या काळात मावळकर नावाच्या इंजिनिअरने हे मंदिर बांधले आहे. ते शिरकाईचे मूळ मंदिर नाही. मूर्ती मात्र प्राचीन आहे. मूळ शिरकाई मंदिर राजवाड्यास लागून डावीकडे होळी माळावर होते. तेथे मूळ देवळाचा चबुतरा अजूनही आहे. ब्रिटिश काळात तेथे शिरकाईचा घरटा हा नामफलक होता.जगदीश्वर मंदिर :- बाजारपेठेच्या खालच्या बाजूस पूर्वेकडील उतारावर ब्राह्मणवस्ती, ब्राह्मणतळे वगैरे अवशेष दिसतात. तेथूनच समोर जे भव्य मंदिर दिसते तेच महादेवाचे म्हणजे जगदीश्वराचे मंदिर. मंदिरासमोर नंदीची भव्य आणि सुबक मूर्ती आहे. पण सध्या ही मूर्ती भग्रावस्थेत आहे. मंदिरात प्रवेश केला की भव्य सभामंडप लागतो. मंडपाच्या मध्यभागी भव्य कासव आहे. गाभाऱ्याच्या भिंतीस हनुमंताची भव्य मूर्ती दिसते. मंदिराच्या प्रवेशद्वाराच्या पायऱ्यांच्या खाली एक लहानसा शिलालेख दिसतो. तो पुढीलप्रमाणे, ‘सेवेचे ठायी तत्पर हिरोजी इटळकर’ या दरवाजाच्या उजव्या बाजूस भिंतीवर एक सुंदर शिलालेख दिसतो तो पुढीलप्रमाणे – श्री गणपतये नमः। प्रासादो जगदीश्वरस्य जगतामानंददोनुज्ञया श्रीमच्छत्रपतेः शिवस्यनृपतेः सिंहासने तिष्ठतः। शके षण्णवबाणभूमिगणनादानन्दसंवत्सरे ज्योतीराजमुहूर्तकिर्तीमहिते शुक्लेशसापै तिथौ ॥१॥ वापीकूपडागराजिरुचिरं रम्यं वनं वीतिकौ स्तभेः कुंभिगृहे नरेन्द्रसदनैरभ्रंलिहे मीहिते । श्रीमद्रायगिरौ गिरामविषये हीराजिना निर्मितो यावच्चन्द्रदिवाकरौ विलसतस्तावत्समुज्जृंभते ॥२॥ याचा थोडक्यात अर्थ पुढीलप्रमाणे -’सर्व जगाला आनंददायी असा हा जगदीश्वराचा प्रसाद श्रीमद् छत्रपती शिवाजी राजांच्या आज्ञेने शके १५९६ मध्ये आनंदनाम संवत्सर चालू असताना सुमुहुर्तावर निर्माण केला. या रायगडावर हिरोजी नावाच्या शिल्पकाराने विहिरी, तळी, बागा, रस्ते, स्तंभ, गजशाळा, राजगृहे अशांची उभारणी केली आहे. ती चंद्रसूर्य असेतोवर खुशाल नांदो.’महाराजांची समाधी : -मंदिराच्या पूर्वदरवाजापासून थोडया अंतरावर जो अष्टकोनी चौथरा दिसतो तीच महाराजांची समाधी. सभासद बखर म्हणते, ‘क्षत्रियकुलावतंस श्रीमन्महाराजाधिराज शिवाजी महाराज छत्रपती यांचा काल शके १६०२चैत्र (शुद्ध १५ (इसवी1680)या दिवशी रायगड येथे झ़ाला. देहाचे सार्थक त्याणी बांधिलेला जगदीश्वराचा जो प्रासाद त्याच्या महाद्वाराच्या बाहेर दक्षणभागी केले. तेथे काळ्या दगडाच्या चिऱ्याचे सुमारे छातीभर उंचीचे अष्टकोनी जोते बांधिले असून वरून फरसबंदी केलेली आहे. फरसबंदिच्या खाली पोकळी आहे, तेथे महाराजांच्या अवशिष्टांश रक्षामिश्र मृत्तिकारूपाने सापडतो.’ दहनभूमी पलीकडे भग्न इमारतींच्या अवशेषांची एक रांग आहे, ते शिबंदीचे निवासस्थान असावे. त्याच्या पलीकडे सदर वस्तीपासून विलग असा एक घराचा चौथरा दिसतो. हे घर इ.स. १६७४ मध्ये इंग्रज वकील हेनरी ऑक्झेंडन यास राहावयास दिले होते. महाराजांच्या समाधीच्या पूर्वेकडे भवानी टोक आहे तर उजवीकडे दारूची कोठारे, बारा टाकी दिसतात.कुशावर्त तलाव : -होळीचा माळ डाव्या हातास सोडून उजवीकडील वाट कुशावर्त तलावाकडे जाते. तलावाजवळ महादेवाचे छोटेसे देऊळ दिसते. देवळासमोर फुटलेल्या अवस्थेतला नंदी दिसतो.वाघदरवाजा : -कुशावर्त तलावाजवळून घळीने उतरत वाघ दरवाजाकडे जाता येते. आज्ञापत्रात लिहिले आहे की, ‘किल्ल्यास एक दरवाजा थोर आयब आहे, यांकरीता गड पाहून एक दोन – तीन दरवाजे, तशाच चोरदिंडा करून ठेवाव्या. त्यामध्ये हमेशा राबत्यास पाहिजे तितक्या ठेवून वरकड दरवाजे व दिंडा चिणून टाकाव्या.’ हे दूरदृष्टी पणाचे धोरण ठेवूनच महाराजांनी महादरवाजाशिवाय हा दरवाजा बांधून घेतला. या दरवाजाने वर येणे जवळजवळ अशक्यच असले तरी दोर लावून खाली उतरू शकतो. पुढे राजाराम महाराज व त्यांची मंडळी झुल्फिरखानाचा वेढा फोडून याच दरवाजाने निसटली होती.टकमक टोक : -बाजारपेठेच्या समोरील टेपावरून खाली उतरून टकमक टोकाकडे जाता येते. तेथेच एका दारूच्या कोठाराचे अवशेष दिसतात. जसजसे टोकाकडे जावे तसतसा रस्ता निमुळता होत जातो. उजव्या हाताला सरळ तुटलेला २६०० फूट खोल कडा आहे. टोकावर वारा प्रचंड असतो व जागाही कमी असल्यामुळे गोंधळ न करता सावधानता बाळगावी लागते.आधीपासुनच शिवराज्यकाळात या ठिकाणावरून गुन्हेगारांचा कडेलोट केला जाई.आता या ठिकाणी सुरक्षित्तता आहे.हिरकणी टोक : -गंगासागराच्या उजवीकडे पश्चिमेस जी चिंचोळी वाट जाते ती हिरकणी टोकाकडे जाते. हिरकणी टोकाशी संबंधित हिरकणी गवळणीची एक कथा सांगितली जाते. या बुरुजावर काही तोफाही ठेवलेल्या दिसतात. बुरुजावर उभे राहिले तर डाव्या हाताला गांधारीचे खोरे, उजव्या बाजूला काळ नदीचे खोरे दिसते. तसेच इथून पाचाड, खुबलढा बुरूज, मशीद मोर्चा ही ठिकाणे तोफेच्या माऱ्यात आहेत. त्यामुळे युद्धशास्त्राचा तसेच लढाऊ दृष्टीने ही खूप महत्त्वाची आणि मोक्याची जागा आहे.वाघ्या कुत्र्याची समाधी : -इतिहासात असे म्हटले जाते की शिवाजी महाराजांंचा अत्यसंस्कार चालू होता.तेव्हा शिवाजी महाराजांचा वाघ्या नावाच्या कुत्र्याने त्या आगीत उडी घेतली.गडावर असणारी सर्व ऐतिहासिक स्थळे याची देही याची डोळा पाहून आपल्या मनात वारसा जपत सर्वांनी संध्याकाळी महाराजांच्या समाधी स्थळी नतमस्तक होऊन शिववंदना गाऊन, आरती करून गडाच्या पायऱ्या उतरण्यास सुरुवात केली. पायथ्याला आल्यानंतर महाड येथे ढाबा चालवून आपल्या कुटूंबाचा उदरनिर्वाह करीत असलेल्या शिवभक्ता चे काही महिन्यापूर्वी निधन झाले आहे. हे लक्षात आल्यानंतर त्या कुटूंबाला थोडा आधार मिळावा या उदात्त हेतूने 190मावळ्यांनी संध्याकाळ चे अप्रतिम, चविष्ट भोजन करून सर्वजण अकलूज कडे मार्गस्थ झाले.
चौकट :-
वास्तविक पाहता 190मावळ्यांना सोबत घेऊन व्यवस्थित नियोजन करून दुर्गे दुर्गेश्वर रायगड दर्शन सुखरूपपणे घडवून आणण्याचे हे शिवधनुष्य पेलण्याचे काम सोपे नव्हते.परंतु साक्षात छत्रपती शिवाजी महाराज हे कार्य घडवून घेत आहेत. असा भाव आयोजकांच्या मनात होता.नवीन माणसांना रायगड दर्शन घडवले म्हणजे पुण्याचं काम आहे. आणि ते पुण्य आम्ही आपल्या माध्यमातून मिळवलं आहे.रायगड पाहणे ही माझी ६ वी वेळ होती.पहिल्यांदा रायगड पाहिला त्यावेळेस ठरवले होते. प्रत्येक वेळी नवीन माणूस हा रायगड बघण्यासाठी नक्की घेऊन यायचा. जीवनात जर रायगड बघितला नाही तर काही उपयोग नाही असे मला वाटते. *आयुष्यात एकदा तरी रायगडची वारी प्रत्येकाने केली पाहिजे* भविष्यात पुन्हा एकदा नियोजन करून नव्याने *रायगड वारी* घडवून आणणार आपली साथ आवश्यक आहे … एकी शिवाय हे शक्य नाही. आपल्या शिवभक्तांनी केलेली मिसळ अप्रतिम होती
.शिवभक्त,शिवाजी घोडके.
चौकट :-
मी यापूर्वी अनेक गड पाहिले आहेत. ऐतिहासिक पुस्तके वाचली आहेत. रायगड विषयी अनेक पुस्तकात वाचले आहे. चित्रपट पाहिले आहेत.परंतु प्रत्यक्ष रायगड पाहिला नव्हता.गेल्या काही वर्षापासून रायगड ला जाण्याचे मनात होते. परंतु सुमारे 1737पायऱ्या चढून रायगडला जाता येईल का? ही भिती मनात सलत होती.आपल्याला शुगर आणि बी. पी. चा त्रास आहे. मग कसे जमणार. अवघ्या एक आठवड्यापुर्वी आयोजक शिवाजी घोडके यांचा व्हाट्सअप वर मेसेज आला. रायगड देशाटन चे नियोजन चालू आहे. 190मावळे जाणार आहेत.आपण यावे. अशी माझी इच्छा आहे.हा मेसेज वाचल्यानंतर साक्षात छत्रपती शिवाजी महाराज यांनीच आपल्याला बोलावणे धाडले आहे. असे वाटले. यासंदर्भात पत्नीशी बोललो. तिनेही तुम्हाला शुगर, बी. पी. चा त्रास आहे. जमेल का? असे विचारत फारसे आढे -वेढे न घेता पटकन मला परवानगी दिली. एव्हढेच नव्हे, तर मी देखील तुमच्या बरोबर येणार. असे सांगितले.हे ऐकल्यानंतर माझा आनंद गगनात मावेनासा झाला. मी तात्काळ आयोजकांना दोन सीट बुक करण्यास सांगितले.आयोजकांनी उत्तम प्रकारे पृथ्वी वरचा स्वर्ग असलेले रायगड दर्शन आम्हा पती -पत्नी ला घडवून आणले.धन्यवाद.
शिवभक्त गणेश जाधव.पत्रकार, अकलूज.































