गिरझणी ते संग्रामनगर रस्त्याची दुरावस्था चार महिन्यातच खडी उचकटली.
अकलूज (प्रतिनिधी )माळशिरस तालुक्यातील गिरझणी ते संग्रामनगर या चार किलोमीटर रस्त्याचे 28-12-2021रोजी लोकप्रतिनिधी व स्थानिक नेतेमंडळी यांच्या हस्ते झाले होते.तसेच या रस्त्याचे एकूण इस्टीमेट 17.41लक्ष इतके असून नियोजित काम 27-12-2022पर्यंत पूर्ण करायचे होते. परंतु प्रत्यक्षात मात्र उदघाटन झाल्यानंतर हे काम ऑगस्ट, सप्टेंबर मध्ये सुरु करण्यात आले.सदर काम हे ग्रामीण विकास मंत्रालय, भारत सरकार यांच्या अर्थसहाय्याने कार्यकारी अभियंता प्रधानमंत्री ग्राम सडक योजना, महाराष्ट्र ग्रामीण रस्ते विकास संस्था, सोलापूर यांचे वतीने मे. शिवमल्हार कॅन्स्ट्रक्शन कंपनी सातारा यांनी केले आहे.परंतु अवघ्या तीन ते चार महिन्यापूर्वी केलेल्या या रस्त्याची अतिशय दयनीय अवस्था झाली असून, ठिकठिकाणी खडी उचकटून रस्त्यावर आली आहे. त्यामुळे रस्त्यावरून ये -जा करणाऱ्या टू व्हीलर, फोर व्हीलर वाहनांना याचा नाहक त्रास सहन करावा लागत आहे. तसेच शाळा, महाविद्यालयात जाणारे लहान मुले, मुली यांना याच रस्त्यावरून सायकल वर प्रवास करावा लागतो. तसेच अनेक मुले, वयोवृद्ध नागरिक या रस्त्यावरून पायी ये -जा करीत असतात.या रस्त्यावरून एखादी टू व्हीलर अथवा फोर व्हीलर जात असताना रस्त्यावर उचकटून वर आलेली खडी उडून रस्त्यावरून ये जा करणाऱ्या इतर नागरिकांच्या अंगावर उडून लागत आहे. त्यामुळे या खडी मुळे एखाद्याला डोळ्याला अथवा अंगाला खडी लागल्यामुळे गंभीर दुखापत होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.याच रस्त्यावर अकलूज क्रिटिकल केअर हॉस्पिटल असून, या रस्त्याने उपचारासाठी अनेक रुग्ण येत असतात. तसेच सध्या ऊस कारखाने सुरु असून, या रस्त्याने ऊस वाहतूक करणारी वाहने, बैलगाडी देखील ये -जा करीत असतात.त्याचप्रमाणे या रस्त्यावर सकाळी आणि संध्याकाळी अनेक नागरिक मुले व्यायाम करण्यासाठी ये -जा करीत असतात.या रस्त्यावरील मोठ -मोठी खडी उचकटून वर आल्यामुळे ही खडी अंगावर उडून नागरिकांना दुखापत होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.तसेच हा रस्ता मुदतीत पूर्ण करण्यासाठी संबंधित ठेकेदाराने घाईगडबडीत काम उरकल्याने सदर काम अतिशय निकृष्ट दर्जाचे झाले असून, त्यामुळे खडी उचकटून वर आली आहे. त्याचा त्रास मात्र नागरिकांना सहन करावा लागत आहे.या रस्त्याच्या कामाची वरिष्ठ पातळीवरून चौकशी व्हावी. अशी मागणी जोर धरू लागली आहे.








