*कोडोली येथील यशवंत शिक्षणशास्त्र महाविद्यालयाने पर्यावरणाचा संदेश देत गावातील वैभव नगर बेघर वसाहतीत कापडी पिशव्यांचे केले वाटप.* स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त प्लास्टिकचा वापर टाळण्याबाबत महाविद्यालयाने ग्रामस्थांमध्ये केले उद्बोधन______________________
कोल्हापूर दि.११ (केदार लोहकरे यांजकडून)”पर्यावरण वाचवा,भारत वाचवा,प्लास्टिकचा वापर टाळा,कापडी पिशव्या वापरा” असा घोषणांचा जागर करत कोडोली (ता.पन्हाळा) येथील यशवंत शिक्षणशास्त्र महाविद्यालयाच्या प्राध्यापक, प्रशासकीय कर्मचारी आणि विद्यार्थी-शिक्षकांनी आज वैभवनगर बेघर वसाहतीत कापडी पिशव्यांचे मोफत वाटप केले.स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त प्लास्टिकचे समूळ उच्चाटन करण्याचा संदेश महाविद्यालयाने ग्रामस्थांना दिला. महाविद्यालयाच्या आवारात प्राचार्य डॉ.विश्वनाथ पाटील यांच्या अध्यक्षतेखाली पर्यावरण रक्षणाचे महत्व स्पष्ट करणारी विद्यार्थी-शिक्षक वेद प्रकाश विंचू यांच्यासह अन्य विद्यार्थी-शिक्षकांची भाषणे झाली.त्यानंतर लगेचच या सर्वांनी पर्यावरण रक्षणाच्या घोषणा देत फेरी काढली.विद्यार्थी-शिक्षक नवरंग प्रभाकर कुलकर्णी व इतर विद्यार्थी – शिक्षकांनी घोषणांचे सारथ्य केले. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.विश्वनाथ पाटील यांच्या संकल्पनेतून राबविलेल्या या उपक्रमाचे संयोजन प्रा.संजय गणपती जाधव,प्राध्यापिका गुलनास मुजावर,कार्यालयीन अधीक्षक एस.के.पाटील,वरीष्ठ लिपिक अनिल इंदुलकर आणि सेवक तानाजी मोहिते यांनी केले. विद्यार्थी-शिक्षकांच्या पर्यावरणविषयक तळमळीबद्दल ग्रामस्थ भारावून गेले.इतकेच नव्हे तर आम्ही प्लास्टिकचा वापर करणार नाही,अशी ग्वाही ग्रामस्थांनी विद्यार्थ्यांशी बोलताना दिली.











