*ज्येष्ठ पत्रकार भारत (तात्या )मगर -पाटील यांना एकसष्ठी निमित्त हार्दिक शुभेच्छा.
*”हॅलो तात्या, कामात आहात का?मला थोडे बातमीबद्दल थोडं मार्गदर्शन पाहिजे” असे म्हणताच कामात व्यस्त असूनही काही काम नाही.विचार तुला काय विचारायचे ते असं म्हणत संपूर्ण बातमी बद्दल मार्गदर्शन करणारी एकमेव व्यक्ती म्हणजे तात्या म्हणजेच भारत मगर.राजकीय, सामाजिक, सांस्कृतिक, महसुली, शेती अशा कोणत्याही प्रकारची बातमी असो त्यातही विशेषत: गुन्हेवृत्त असल्यास त्यात कोणता उल्लेख केल्यास कोणत्या कायदेशीर अडचणी येतील याचं चालतबोलत ग्रंथालय म्हणजेच भारत मगर. दैनिक लोकसत्ता, इंडियन एक्स्प्रेस, सामना, प्रभात, पुढारी, संचार, तरुण भारत व सध्या दिव्य मराठी यासारख्या दैनिका बरोबरच एकेकाळी गाजलेल्या साप्ताहिक श्री,सह्याद्री, पोलीस टाइम्स व सध्याचे साप्ताहिक चित्रलेखा आदी नियतकालिकात 1986 पासून आजतागायत कार्यरत असणारे वयाची साठी ओलांडलेले चीरतरूण व्यक्तीमत्व आपल्या समवयस्क पत्रकाराबरोबरच मुलांच्या वयापेक्षाही लहान वयाच्या पत्रकारासही तेवढ्याच सन्मानाची वागणूक देत प्रामाणिकपणे मार्गदर्शन करतात. तालुक्यातील सर्व पत्रकारांना आपले हक्काचे वाटणारे व्यक्तिमत्व,कोणताही लहानथोर,गरीब श्रीमंत,असा अगर जाती धर्माचा कसलाही भेदभाव न करता सर्वांच्या सुख दुःख प्रसंगी सर्वात अगोदर धाऊन जाणारे सर्वांचे लाडके व आपलेसे वाटणारे व्यक्तिमत्व,त्यामुळेच आमचे पत्रकार क्षेत्रात सर्वजण आदराने तात्या म्हणतात.तात्यांचे शिक्षण केवळ दहावी पर्यंत च झाले आहे,मात्र लहानपणापासून लिखाणाची आवड होती.मराठी निबंध स्पर्धेत हमखास बक्षीस मिळत असायचे, शिक्षकाकडून वाहवा मिळायची.लहानपणी कविता करायचे,त्या शाळेच्या विविध गुनदर्शन कार्यक्रमात गाजायच्या. पुढे कोर्टात क्लार्क म्हणून काम करत असताना पेपरमध्ये काम करायचे वेध लागले, व सोलापूर केसरी या दैनिकातून प्रथम निमगाव वार्ताहर म्हणून काम सुरू केले. ज्येष्ठ पत्रकार स्व.अरुण रामतीर्थकर यांचे फार मोलाचे मार्गदर्शन लाभले,त्यांनी पत्रकारिता कशी करावी,कुणा कडून लाच घेऊ नये,पत्रकारितेचा गैरवापर करू नये,गैरफायदा घेऊ नये अशी शिकवण दिली.ती आत्तापर्यंत जपली.तात्या माळशिरस तालुका पत्रकार संघाचे अध्यक्ष होते. तेव्हा आपल्या कार्यकाळात त्यांनी अनेक उपक्रम राबविले. पत्रकारितेत नवीन आलेल्या पत्रकारांना मार्गदर्शन करण्यासाठी त्यांनी कार्यशाळेचे आयोजन देखील केले होते. तसेच पत्रकारांच्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी आरोग्य शिबिराचे देखील आयोजन केले होते. घरची वाडवडिलार्जित जमीन नव्हती,मात्र इतरांकडून प्रेरणा घेऊन व शेती करण्याचा छंद असल्याने सुमारे 30 वर्षापूर्वी माळरान जमीन विकत घेऊन त्यातील दगड गोटे स्वतः वेचून जमीन तयार केली,त्यामध्ये अनेकदा आर्थिक अडचणी असूनही वेगवेगळे प्रयोग करत राहिले ,त्यांनी आत्तापर्यंत ऊस, केळी,पपई,मिरची,कोबी,फ्लॉवर,टोमॅटो,काकडी,कलिंगड आदी अनेक प्रकारची शेती केली आहे.त्यांना प्रगतशील शेतकरी म्हणून ओळखले जाते.त्यांना पत्रकारिता क्षेत्रात व सामाजिक कार्यात केलेल्या उल्लेखनीय कार्याबद्दल आत्तापर्यंत रोटरी क्लब अकलूज,मराठा सेवा संघ सोलापूर जिल्हा,आद्य क्रांती गुरू लहुजी वस्ताद प्रतिष्ठान,रमेश दादा बागवे प्रतिष्ठान पुणे,संत गाडगे बाबा विद्यापीठ अमरावती आदी ठिकाणाहून वेगवेगळे पुरस्कार मिळाले आहेत.त्यांनी आज 11ऑक्टोबर रोजी वयाची 61 वर्षे पूर्ण करून 62 व्या वर्षात पदार्पण केले आहे.
त्यांना एकसष्ठी निमित्त व पुढील कार्यासाठी “संघर्ष योद्धा “न्यूज पोर्टल च्या वतीने हृदयापासून हृदयापर्यंत आभाळभर शुभेच्छा.
गणेश लक्ष्मण जाधव.पत्रकार, अकलूज.










