जि. प.प्रा.शाळा, मुली नं.१ व अकलाई विद्यालय अकलूज मध्ये भोंडला उत्साहात साजरा
अकलूज: भोंडला हा महाराष्ट्रातील एक सांस्कृतिक खेळ आहे. महाराष्ट्रात विविध प्रातांत त्याला वेगवेगळ्या नावाने ओळखलं जातं. कुणी या खेळाला भोंडला म्हणतं तर कुणी भुलाबाई. काही ठिकाणी या खेळाला हादगा असंही म्हटलं जातं. नावं वेगवेगळी असली हा या खेळ खेळण्याचा आनंद मात्र सारखाच असतो. अश्विन शुद्ध प्रतिपदेपासून सुरू झालेल्या शारदीय नवरात्र उत्सवाच्या निमित्ताने अकलूज येथील जि. प. प्रा. शाळा मुली,नं. १ व अकलाई विद्यालययांचा संयुक्त महाभोंडल्याचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.यावेळी सौ. गीता धोत्रे या ज्येष्ठ महिला पालकांच्या हस्ते हत्तीच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. पदवीधर शिक्षक कैलास गायकवाड यांनी भोंडला कार्यक्रमाची पार्श्वभूमी व साजरा करण्याचे महत्व सांगितले. सुरुवात उपक्रमशील शिक्षिका सीमा सुरवसे व संगीता ननवरे यांनी गायलेल्या ‘ऐलमा पैलमा गणेश देवा’ या गीताने करण्यात आली. भोंडल्याच्या इतर गाण्यांचे समूह गायन करण्यात आले.यावेळी पारंपरिक खेळ घेण्यात आले. दोन्ही शाळांतील मुलींनी घागरा ड्रेस परिधान करून केलेल्या दांडिया नृत्याने कार्यक्रमात अधिकच रंगत आणली. खिरापत (झाकलेला पदार्थ) ओळखण्याचा मनोरंजक खेळ घेण्यात आला. खिरापत वाटप करण्यात आली.’आड बाई अडोनी’ या गीताने भोंडल्याची सांगता झाली.हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी बाळू कुंभार, उमेश फलटणकर व संतोष यादव या शिक्षकांनी परिश्रम घेतले.या कार्यक्रमाच्या वेळी समूह साधन केंद्र अकलूजचे केंद्रप्रमुख राजेंद्र जाधव, मुली नं.१चे मुख्याध्यापक मोहन इंगोले, अकलाई विद्यालयाचे मुख्याध्यापक लहु बाबर व दोन्ही शाळांचे सर्व शिक्षक शिक्षिका उपस्थित होते.












