*कै. उदय इनामदार ची अकस्मित एक्झिट मनाला वेदना देऊन गेली.*
माणूस अथवा कोणताही जीव जन्माला आला की, त्याचे जाणे हे अटळ आहे. परंतु, उदय इनामदार ची अकाली एक्झिट मात्र मनाला खूपच वेदना देऊन गेली.29सप्टेंबर रोजी सकाळी 9च्या दरम्यान मान आणि पाठ दुखतेय असे म्हणत उदय ने आपल्या आईला पाठ शेकून देण्यास सांगितले. पाठ शेकत असतानाच उदय अचानक कोसळला. चक्कर आली. त्याला लगोलग अकलूज येथील अकलाई आय. सी. यु ला नेले. परंतु डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले.29सप्टेंबर हा जागतिक हृदय दिन. या दिवशीच त्याला हृदयविकारा चा तीव्र झटका आला. हे केव्हढे मोठे दुर्दैव.उदय चे वडील काही वर्षांपूर्वी देवाघरी गेले. त्यानंतर आपल्या कुटूंबातील आई, पत्नी, बहीण, मोठा मुलगा, लहान मुलगी यांचा उदरनिर्वाह करण्याची जबाबदारी आली. मुलगा मिरज येथे इंजिनियर चे शिक्षण घेतोय.26-27तारखेला तो अकलूजलाच होता.27तारखेला तो पुन्हा शिक्षणासाठी गेला. परंतु त्याला पुन्हा 29तारखेला यावे लागले. तो संध्याकाळी आल्यावर आपल्या पप्पाला पहिल्यानंतर त्याने केलेला आक्रोश पाहून उपस्थितांचे डोळे पाणावले.काही वर्षांपूर्वी उदय ने आपले मेहुणे संतोष (पप्पू )मुदगल यांना सोबत घेऊन क्लासिक प्रिंटिंग या फर्म च्या माध्यमातून आपल्या प्रिंटिंग व्यवसायाची सुरुवात केली. सुरवातीला व्हिजिटिंग कार्ड, लग्नपत्रिका, जाहिरात क्षेत्रात कार्यरत राहिला. कालांतराने त्याने अकलूज आणि परिसरातील साप्ताहिक, विशेषांक,छोटे -मोठे अंक, दिवाळी अंक, शैक्षणिक कामे,पुस्तके याचे डी. टी. पी करण्यास सुरुवात केली. त्यानंतर तो पत्रकारिते कडे वळला. काही वर्षांपूर्वी आपल्या सहकारी मित्रांना सोबत घेऊन अकलूज ई लाईव्ह नावाचे न्यूज पोर्टल देखील सुरु केले. त्यानंतर ब्रम्हविचार नावाचे मासिक देखील सुरु केले.त्यानंतर काही वर्ष अकलूज येथील दैनिक महापर्व मध्ये देखील डी. टी. पी. ऑपरेटर म्हणून काम केले.त्यानंतर पुन्हा त्याने आपल्या व्यवसायात लक्ष दिले. ब्रम्हविचार चे कॅलेंडर देखील प्रकाशित केले. अनेक सामाजिक कार्यात देखील त्याचा सक्रिय सहभाग असायचा.त्याच्या मनमिळाऊ व हसतमुख स्वभावामुळे त्याचा मित्र मंडळी चा गोतावळा देखील खूप मोठा होता.त्याच्याकडे आलेले कोणतेही काम तो प्रसंगी रात्रभर जागरण करून वेळेत पूर्ण करून देत होता.त्याच्याकडे वृत्तपत्राचे डी. टी. पी करीत असताना आपण सांगायच्या अगोदर आपल्या मनातले शब्द टायपिंग करायचा. आपले समाधान होत नाही तोपर्यंत डिजाईन करायचा.एवढे सगळे करीत त्याने काही वर्षांपूर्वी स्वतःचे घर देखील बांधले होते. परंतु दुर्देवाने काही अडचणी मुळे त्याला ते घर विकावे लागले. दोन वर्षांपूर्वी त्याने पुन्हा घर बांधण्यासाठी जागा बघण्यास सुरुवात केली होती. गेल्या काही दिवसापासून त्याने परिसरातील दिवाळी अंकाच्या कामास देखील सुरुवात केली होती. परंतु दुर्देवाने ते काम अपुरे राहिले.उदय ने अनेकांना मदत केली , अगदी मध्यस्थी होऊन अनेक मित्रांना फायनान्स देखील काढून दिले.तो सतत आपल्या कामात मग्न असायचा. काम वेळेत पूर्ण करण्यासाठी प्रसंगी तो दिवसभर जेवण देखील करीत नसायचा. आपल्या कामाचा व्याप सांभाळून जवळच्या मित्र मंडळींना देखील पुरेसा वेळ द्यायचा.असा हा अवलिया आज आपल्यात नाही. या गोष्टीवर खरे तर अजूनही विश्वास बसत नाही. परंतु दुर्देवाने हेच सत्य आहे. त्याच्या अकाली जाण्यामुळे त्याच्या कुटूंबावर मोठा आघात झाला आहे.आता खरी गरज आहे ती त्याच्या कुटूंबाला सावरण्याची. तो कुटूंबाचा आधारवड होता.स्वतःचे घर बांधण्याचे स्वप्न अपूर्ण राहिले याचे खूप वाईट वाटते. सर्वांशी प्रेमाने वागणारा आणि बोलणारा उदय आज आपल्यात नाही. अवघ्या 45व्या वर्षी उदय चे जाणे मनाला खूप वेदना देऊन गेले.एक चांगला मित्र आज गमावला याचे खूप वाईट वाटते.आहे, माझ्या या जिवलग मित्रा साठी मला अशा पद्धतीने लेख लिहावा लागतोय याची कल्पना करवत नाही.उदय च्या अकस्मित जाण्यामुळे त्याच्या कुटूंबावर देखील दुःखाचा मोठा डोंगर कोसळला आहे.त्याच्या पाठीमागे वृद्ध आई ,बहीण,पत्नी,एक मुलगा, मुलगी असा परिवार आहे. या कुटूंबाला सावरण्याची गरज आहे.आपण सर्वांनी मिळून त्याच्या कुटूंबाच्या पाठीमागे उभे राहण्याची नितांत गरज आहे.
उदय चे कुटुंब या दुःखातून लवकर सावरो.कै. उदय इनामदार याला भावपूर्ण श्रद्धांजली.







