*आशा पारेख यांना दादासाहेब फाळके पुरस्कार जाहीर*
मुंबई : यंदाच्या दादासाहेब फाळके पुरस्काराची घोषणा करण्यात आलीय. हा पुरस्कार यावर्षी दिग्गज अभिनेत्री आशा पारेख यांना देण्यात येणार आहे. केंद्रीय मंत्री अनुराग ठाकुर यांनी याबद्दलची माहिती दिली. नवी दिल्लीत 30 सप्टेंबरला होणाऱ्या राष्ट्रीय पुरस्कार सोहळ्यात अभिनेत्री आशा पारेख यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे. दादासाहेब फाळके पुरस्कार हा कलाविश्वातील अत्यंत प्रतिष्ठित पुरस्कार मानला जातो. हा अत्यंत प्रतिष्ठित पुरस्कार प्राप्त करणाऱ्या दिग्गज अभिनेत्री आशा पारेख यांच्याबद्दल सांगायचे झाले तर आशा पारेख यांनी त्यांच्या काळात प्रेक्षकांच्या मनावर राज्य केलं. त्यांनी जवळपास 80 चित्रपटांमध्ये काम केलंय. ‘जब प्यार किसी से होता है’, ‘घराना’, ‘भरोसा’, ‘मेरे सनम’, ‘तिसरी मंजिल’, ‘उपकार’, ‘शिकार’, ‘साजन’, ‘आन मिलो सजना’ हे त्यांचे चित्रपट विशेष गाजले आहेत.







