“ऑपरेशन परिवर्तन “चा उडाला बोजवारा
पोलिसांच्या हफ्तेखोरीमुळे माळशिरस तालुक्यात अवैध धंदे जोमात
अकलूज (प्रतिनिधी ) : सोलापूर जिल्ह्यातील माळशिरस तालुक्यात अकलूज येथे उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालय,माळशिरस,अकलूज, नातेपुते,वेळापूर येथे पोलीस ठाणे आहे.तर श्रीपूर, पिलीव, माळीनगर येथे औट पोस्ट आहे.या सर्व पोलीस ठाण्याच्या कार्यक्षेत्रात अनेक अवैध व्यवसाय जोमात सुरु आहेत.गेल्या वर्षी सोलापूर च्या पोलीस अधीक्षक तेजस्विनी सातपुते यांनी ऑपरेशन परिवर्तन सुरु केले. त्या अनुषंगाने माळशिरस तालुक्यात देखील त्याची अंमलबजावणी करण्यात आली. गुन्हेगारी कडे वळलेल्या अनेकांना वेगवेगळे व्यवसाय सुरु करून दिले. प्रसारमाध्यमानी देखील त्याचे मोठे कौतुक केले. परंतु दुर्देवाने एक वर्षानंतर मात्र चित्र बदललेले दिसून येत आहे. परिवर्तन झालेल्या व्यावसायिक यांनी पुन्हा आपले काळे धंदे सुरु केले आहेत. त्यामुळे नेमके कोणाचे परिवर्तन झाले? हाच मोठा प्रश्न निर्माण झाला आहे.त्यामुळे या योजनेचा पुरता बोजवारा उडाला असल्याचे चित्र माळशिरस तालुक्यात दिसून येत आहे.कायद्याने बंदी असलेला गुटखा, मावा,अनेकांचे संसार देशोधडीला लावणारा मटका, जुगार, अवैध दारूविक्री, गांजा,वाळू,मुरुम,ताडी (शिंदी )गोमांस वहातूक, खाजगी सावकारकी, अवैध भिशी,अवैध प्रवासी वाहतूक,ठिकठिकाणी असलेल्या लॉजवर वेश्या व्यवसाय यासह अनेक अवैध व्यवसाय जोमात सुरु आहेत.माळशिरस तालुक्यात अवैध व्यवसायाने अक्षरश: धुमाकुळ घातला आहे. ठिकठिकाणी मटक्याचे एजंट आहेत. त्यांनी या भागातील गावोगावी मटका बुकींसाठी जाळे पसरले आहे. परिसरातील अनेक तरुण, आबाल वृद्ध मोठ्या संख्येने अवैध धंद्याकडे वळत आहेत. कमीत कमी भांडवलात अल्पावधीत अधिकाधिक पैसे मिळविण्याकडे त्यांचा कल वाढत आहे.विशेष म्हणजे काही पोलीस ठाणेतील कर्मचारी यांचेच आशीर्वादाने हे धंदे चालू आहेत.परिणामी गुटखा विक्री, मटका, जुगार,गांजा, मुरुम, बेकायदा दारुविक्री, वाळू तस्करी, खाजगी सावकारकी अशा अनेक काळ्या धंद्यात तरुण गुरफटले आहेत. दररोज हजारों रुपयांचा मटका खेळुन काहींजण कंगाल झाले आहेत . तर काहीजण उसणवारी,कर्ज काढुन मटका खेळत आहेत.तालुक्यात अनेक मटका बुकी चालक आहेत. तसेच अनेक टपरी वर, गल्ली बोळात मटका घेतला जातं आहे.तर काहीजण मोबाईल वरती मटका घेत आहेत.मटका बुकी चालकाकडून तसेच गुटखा विक्रेते पोलीस प्रशासनासोबत मोठ्या प्रमाणात आर्थिक हित संबंध ठेऊन हाताशी धरत असल्याने अशा अवैध धंदे करणाऱ्या कडे डोळेझाक केली जात असल्याने त्यांच्या विरोधात कोणी तक्रार करीत नाहीत .पोलिसांच्या आशीर्वादाशिवाय अवैद्य धंदे खुलेआम कोणीही करू शकत नाही.कोणत्या धंद्यातून पोलिसांना महिन्याला किती हफ्ता मिळतो. हे आता लपून राहिलेले नाही.त्याचप्रमाणे पोलीस ठाणेत तक्रार घेऊन आलेल्या नागरिकांची चिरीमिरी घेतल्याशिवाय तक्रार घेतली जात नाही. घेतलीच तर तपास केला जात नाही. क्रॉस तक्रार असेल तर दोन्ही तक्रारदार यांचेकडून मोबदला घेतला जातो. असा अनुभव अनेक तक्रारदार यांना आला आहे. दाखल केलेल्या तक्रारीतून नाव कमी करण्यासाठी देखील तोडपाणी केली जाते. ही वस्तुस्थिती आहे.खेड्यापाड्यातुन अनेकजण कामाला जातो म्हणुन सांगुन येथे दिवसभर मटका जुगार खेळत असतात. त्यांचे संसार उध्वस्त होत आहेत.अवैध धंद्यांची पोलिसांना माहितीअसताना अर्थपुर्ण संबंधामुळे कारवाई करण्यास ते धजावत नसल्याचे नागरिकांमधून बोलले जात आहे.. अवैध व्यावसायांना जास्त विरोध झाल्यास मोठ्या धेंडाना वाचवण्यासाठी मग किरकोळ व लहान विक्रेत्यावर कारवाई करण्याचे काम पोलिस करीत असल्याचे बोलले जात आहे. त्यामुळे दिवसेंदिवस काळ्या धंद्यात वाढच होत आहे.दरम्यान, आरोग्यास घातक असलेल्या गुटख्यावर तर शासनाने बंदी घातली असतानाही पोलीसांच्या व अन्न व भेसळ औषध प्रशासन यांच्या आशिर्वादाने खुलेआम गुटखा विकला जात आहे. मटका व गुटखा विक्रेते, एजंटना वरदहस्त असल्यामुळे कोणालाही न जुमानता ते व्यवसाय करीत आहेत. मटका व गुटख्याचा व्यवसाय येथे जोमात सुरू असुन, बेकायदा दारू विक्रीतही वाढ झाली आहे. परिसरातील गावोगावचे लोक येथील विविध हॉटेल ढाब्यांवर मद्यपानासाठी येत आहेत. परिणामी काळ्या धंद्यात दररोज लाखोंची कमाई होत आहे. त्या पैशांचा गैरवापर होऊन सामाजिक वातावरण कलुशीत होत आहे.वरिष्ठ पोलीसांनी तालुक्यात व परिसरातील मोठ्या प्रमाणावर चालणारे अवैध व्यवसाय बंद करावेत.लोकांचे उध्वस्त होणारे संसार वाचवावेत.तालुक्यातील अनेक शालेय, महाविद्यालयीन विद्यार्थी व्यसनाच्या आहारी गेले आहेत. व्यसन करण्यासाठी पैसे कमी पडले की ते गुन्हेगारी कडे वळत आहेत. शाळा, महाविद्यालय परिसरात राजरोस पणे गुटखा, मावा विकला जातं आहे. गल्ली -बोळात दारू विकली जात आहे.अर्थात एकाच नाण्याला दोन बाजू असतात. या अनुषंगाने सर्वच पोलीस भ्रष्ट नाहीत. काही पोलीस ठाणेतील पोलीस प्रामाणिकपणे आपली सेवा बजावत आहेत. सर्वसामान्य नागरिकांचे सदरक्षणाय खलनिग्रहणय प्रमाणे अनेक प्रश्न सोडवित आहेत. परंतु काही भ्रष्ट पोलिसांमुळे मात्र नागरिकांचा पोलिसांवरील विश्वास उडत चालला आहे. एव्हडे मात्र निश्चित.ज्या पोलिसांनी जनतेचे रक्षण करायचे. तेच पोलीस आता भक्षक बनले आहेत.तालुक्यात गुन्हेगारी चे प्रमाण वाढले आहे. चोऱ्यांचे प्रमाण देखील वाढले आहे.अवैध धंदे करणारे राजरोस पणे आपले काळे धंदे करीत आहेत. पोलीस मात्र केवळ बघ्याची भूमिका घेत आहेत.एखाद्याने हफ्ता दिला नाही. तर त्याच्यावर कारवाई केली जाते.माळशिरस तालुक्यात चालणारे अवैध धंदे ताबडतोब बंद करावेत.अशी मागणी तालुक्यातील नागरिक करीत आहेत. सोलापूर जिल्ह्याच्या कर्तव्यदक्ष पोलीस अधीक्षक तेजस्विनी सातपुते या गोष्टीकडे लक्ष देतील काय?असा प्रश्न नागरिकांमधून विचारला जात आहे. पोलीसांचे अवैध व्यावसायीकांबरोबर असलेले अर्थपुर्ण संबंध तपासण्यासाठी सोलापूरच्या डॅशिंग लेडी सिंघम तेजस्विनी सातपुते यांनी सायबर वरुन त्यांचे गेल्या सहा महिन्याचे मोबाईल कॉल डिटेल व पोलीस ठाण्यातील सिसिटीव्ही फुटेज तपासावेत.अशी मागणी केली जात आहे.







