*महर्षी करंडक शालेय व खुल्या राष्ट्रीय वक्तृत्व स्पर्धेचे अकलूज येथे आयोजन*
संग्रामनगर दि.३० (केदार लोहकरे अकलूज)अकलूज येथील शिक्षण प्रसारक मंडळ संचालित शंकराव मोहिते महाविद्यालयाच्या वतीने घेण्यात येणाऱ्या महर्षी करंडक शालेय व खुल्या राष्ट्रीय ऑनलाईन वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती महाविद्यालय विकास समितीचे अध्यक्ष संग्रामसिंह मोहिते पाटील यांनी दिली. श्री.मोहिते पाटील पुढे म्हणाले की,वक्तृत्व कलेच्या आकाशात विहार करणाऱ्या कला विहंग पंखाच्या समृद्धीसाठी,अभिव्यक्तिच्या माध्यमातून मनामनाच्या भिंती पाडून एक मानवतावादी स्नेहबंध निर्माण करण्याच्या उद्देशाने रविवार दि.११ सप्टेंबर रोजी या राष्ट्रीय वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.स्पर्धेचे हे ७ वे वर्ष आहे.ही स्पर्धा मराठी भाषेमध्ये असून खुल्या गटासाठी काय झाडी काय डोंगार काय हाटील…समद ओक्केच, भारतीय स्वातंत्र्याची 75 वर्ष, छत्रपती शिवाजी महाराज दुर्ग व्यवस्थापन,एक तरी ओवी अनुभवावी,वेळीच सावरायला हवं अस्ताव्यस्त पडलेले आवरायला हवं तर शालेय गटासाठी सहकार महर्षी शंकरराव मोहिते पाटील यांचे चरित्रातून आम्ही काय शिकावे, अकलूजमध्ये संपन्न झालेला स्वातंत्र्याचा अमृत महोत्सवी सोहळा, छत्रपती शिवाजी महाराज,माझा आवडता वैज्ञानीक,मला आवडलेले पुस्तक असे विषय देण्यात आले आहेत. स्पर्धेच्या सादरीकरणासाठी ५ मिनिटे व जास्तीत जास्त 5.30 मिनिटांचा कालावधी देण्यात आला आहे.सदर स्पर्धेच्या शालेय गटासाठी रू.७५ तर खुल्या गटासाठी रू.१५० प्रवेश फी ठेवण्यात आली आहे.शालेय गटासाठी प्रथम क्रमांक रू.२५००,द्वितीय क्रमांक रू.२०००,तृतीय क्रमांक रू.१५०० तर खुल्या गटासाठी प्रथम क्रमांक रू. ५०००,द्वितीय क्रमांकासाठी रू.४०००,तृतीय क्रमांकासाठी रू.३००० व प्रमाणपत्र अशी पारितोषिकेही देण्यात येणार आहेत.या स्पर्धेकरीता डॉ.विश्वनाथ आवड 9422028838, डॉ.अपर्णा कुचेकर 9156070894, डॉ.चंकेश्वर लोंढे 9970328096 यांच्याशी संपर्क साधावा असे आवाहन प्र.प्राचार्य डॉ.दत्तात्रय बागडे यांनी केले आहे.







