अन्न व औषध प्रशासनाकडून माळशिरस तालुक्यातील अकलूज, नातेपुते येथील तीन दुकानाचा परवाना रद्द.मात्र त्याला स्थगिती मिळवली. दुकाने अद्याप सुरूच.
अकलूज (प्रतिनिधी )बनावट औषध विक्री प्रकरणी माळशिरस तालुक्यातील नातेपुते येथील दोन होलसेल विक्रेते व अकलूज येथील एका होलसेल विक्रेत्यावर कारवाई केल्याची माहिती अन्न व औषध प्रशासनाचे सहाय्यक आयुक्त धनंजय जाधव यांनी दिली.मात्र या प्रकरणाचा तपास लावण्यात नातेपुते पोलिसांना अद्याप यश आलेले नाही. बनावट जीपी 200 या अँटिबायोटिक औषध विक्री प्रकरणी नातेपुते येथील दोन होलसेल विक्रेते व अकलूज येथील एक होलसेल पुरवठादार यांचा अन्न व औषध प्रशासनाने परवाना रद्द केला.परंतु या तिन्ही दुकानदारांनी मंत्रालयातून संबंधित प्रकरणाला स्थगिती मिळवून व्यवसाय चालू ठेवले आहेत.कोरोना काळात जीपी 200 या अँटी बायोटिक औषधाला खूप मागणी होती. हे औषध कोणत्याही आजारातील ताप कमी होण्यासाठी वापरले जाते. याचाच फायदा घेऊन होलसेल दुकानदाराकडून विना बिल औषध खरेदी करून नागरिकांच्या आरोग्याशी खेळून विक्री करण्यात आली.औषध ज्या कंपनीचे आहे त्या कंपनीच्या विक्री प्रतिनिधीला याचा संशय आल्याने त्याने औषध निरीक्षक सचिन कांबळे यांना माहिती दिली.विक्री करणाऱ्या दुकानावर ऑक्टोबर 2021 मध्ये छापे मारण्यात आले. त्यावेळी या सर्व बनावट गोळ्यांचा साठा जप्त करण्यात आला होता.औषधाचे सॅम्पल घेऊन परीक्षणासाठी मुंबई येथील प्रयोगशाळेत पाठविण्यात आले असता, त्यामध्ये शुगर व दुसऱ्यामध्ये डायक्लोफिनॅक हे घटक आढळले.मात्र औषधांचा मूळ घटक आढळला नाही. जानेवारी 2022 मध्ये या बनावट औषधाचा अहवाल मिळाल्यानंतर एप्रिल 2022 मध्ये नातेपुते पोलीस स्टेशन मध्ये या विक्रेत्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.हे औषध कोठून आले. अजून काही विक्रेत्यांना विकले का? याचा तपास नातेपुते पोलीस करीत आहेत. या बनावट गोळ्यांचा पुरवठा परराज्यातून झाल्याचा संशय आहे अशी माहिती सहाय्यक आयुक्त धनंजय जाधव यांनी दिली. याप्रकरणी अकलूज येथील संतोष एजन्सी (ताम्हाणे नगर) संतोष नरहरी इंगळे. (अकलूज )दोशी मेडिकल स्टोअर- जयकुमार मोतीलाल दोशी, (नातेपुते) व पलंगे फार्म एजन्सी उमेश बबन पलंगे (नातेपुते )यांच्या विरोधात औषध निरीक्षक सचिन अशोक कांबळे यांनी 179,275, 276,420,34 या कलमानुसार गुन्हा दाखल केला आहे. याबाबत अद्याप तपास सुरू आहे असे नातेपुते तपास पोलीस अधिकारी यांनी सांगितले.यातील एकाला उच्च न्यायालयातून तात्पुरता जामीन मिळाला असून, एकाला अर्धांग वायू झाला आहे.अन्य एक आरोपी पोलिसांना कसा सापडत नाही हा प्रश्न निर्माण झाला आहे.माळशिरस तालुका हा मेडिकल हब म्हणून ओळखला जातो. माळशिरस तालुक्यातील अनेक डॉक्टर आपल्या जीवाची पर्वा न करता आलेल्या रुग्णावार उपचार करीत आहेत. त्यांनी विश्वासार्हता निर्माण केल्यामुळे केवळ माळशिरस तालुक्यातीलच नव्हे तर पुणे, सांगली, सातारा जिल्ह्यातील सुद्धा अनेक रुग्ण उपचारासाठी माळशिरस तालुक्यात येत असतात. परंतु केवळ आपल्या आर्थिक फायद्यासाठी रुग्णांच्या आरोग्याशी खेळून बनावट औषध विक्री करणाऱ्या काही दुकानदारामुळे आता माळशिरस तालुक्याचे नाव बदनाम होऊ लागले आहे. त्यामुळे अशा मेडिकल चा परवाना कायम स्वरूपी रद्द करण्यात यावा. अशी मागणी जोर धरू लागली आहे.







