*बाळदादा सांस्कृतिक मंत्री असते तर…*
सोलापूर जिल्ह्याची राजकीय राजधानी म्हणून ओळखले जाणारे अकलूज शहर सांस्कृतिक कार्यक्रमाच्या बाबतीत देशभरात अव्वल ठरले आहे. केंद्र शासनाच्या वतीने स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त देशभरात ‘हर घर झेंडा’ अभियान राबविले जात असतानाच त्याचे औचित्य साधून जयसिंह मोहिते पाटील ऊर्फ बाळदादांनी १४ ऑगस्टच्या रात्री जो १३ प्रकारचे चित्ररथ काढून कार्यक्रम घेतला तो कार्यक्रम अकलूजसह परिसरातील लोकांच्या डोळ्याचे पारणे फेडणारा ठरला आहे. बाळदादांच्या मार्गदर्शनाखाली मोहिते पाटील कुटुंबासह अकलूजकरांनी १३ चित्ररथ काढून स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करण्यासाठी दिवसरात्र कष्ट घेतल्यामुळेच अकलूजने देशात दुसरा क्रमांक पटकावला असून देशभरात अकलूजचा डंका वाजत असल्याने अकलूजकरांची छाती अभिमानाने फुलताना दिसत आहे. यावेळी बाळदादा सांस्कृतिक मंत्री असते तर महाराष्ट्राचा कायापालटच झाला असता असा अकलूजसह परिसरांतून सूर निघत असल्याचे दिसून आले.जयसिंह मोहिते पाटील ऊर्फ बाळदादा ज्या कार्यक्रमाचे नियोजन करतात, तो कार्यक्रम एका भव्य उंचीवर नेऊन ठेवतात हे यापूर्वी त्यांनी अनेकदा दाखवून दिले आहे. बाळदादांचे योग्य नियोजन व सर्व मोहिते पाटील कुटुंबाच्या पूर्णपणे झोकून देऊन काम करण्याच्या पध्दतीमुळे यापूर्वीही त्यांनी राबविलेल्या अनेक कार्यक्रमांना संपूर्ण महाराष्ट्राने डोक्यावर घेतले आहे. आनंदयात्रा, शंभर वर्षांपूर्वीचे गाव, विज्ञानयात्रा, प्रजासत्ताकदिनी चित्ररथांचे संचलन, रयतेचा राजा शिवछत्रपती, भारतीय लोककला, मराठी बाणा, गौरव मराठी मातीचा असे वेगवेगळे भव्य उपक्रम राबवून आपला जन्मच सांस्कृतिक वारसा जतन करण्यासाठी झालेला आहे हे ते दाखवून देतात. वास्तविक पाहता अकलूजमध्ये भव्य उपक्रम राबवित असताना त्यांना कधीकधी अकलूजकरांशी कठोर भूमिका घ्यावी लागते. कारण शिस्त व योग्य नियोजन असल्याशिवाय यश मिळतच नाही. त्यांची कठोर भूमिका ही एखाद्या आईने आपल्या बाळाला मारल्यासारखी असते. आई बाळाला शिस्त लागावी म्हणूनच मारत असते. ती त्याची वैरीण मुळीच नसते. तशीच भूमिका बाळदादांचीही आहे. बाळदादा हे नेहमी शिस्तीचे भोक्ते राहिलेले आहेत. एखादी गोष्ट त्यांच्या मनासारखी झाल्याशिवाय ती पूर्णत्वास नेली जात नाही इतके ते दक्ष असतात. अमृत महोत्सवाच्या कार्यक्रमात काही ठिकाणी लावलेले फ्लेक्सबोर्ड बाळदादांच्या मनासारखे न झाल्याने त्यांनी कार्यकर्त्यांना ते तात्काळ काढण्याचे आदेश दिले. अमृत महोत्सवाच्या नियोजनासाठी बाळदादांनी सहकार महर्षि कारखान्याच्या गेस्ट हाऊसवर पत्रकार परिषद घेतली होती. तेव्हा त्यांनी बनविलेला एक व्हिडीओ पाहून पत्रकार अभिराज उबाळे यांनी या व्हिडीओमध्ये स्वराज्याचे उद्गाते छत्रपती शिवाजी महाराज यांचा फोटो का घेतला नाही? असे बाळदादांना विचारताच त्यांनी ‘आमचे छत्रपतींवरील प्रेम ६ जूनलाच दाखविले, सहकार महर्षि आमचे दैवत असूनही त्यांचा फोटो या व्हिडीओमध्ये घेतला नाही, कारण १५ ऑगस्टला ज्यांचे महत्व आहे तेच आम्ही व्हिडीओमध्ये घेतले आहे’ असे सांगितले. यावरूनच ते एखाद्या विषयात किती बारकाईने लक्ष घालतात हे दिसून येते. स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त काढण्यात येणाऱ्या चित्ररथांची तयारी त्यांनी एक महिन्यांपूर्वीच केली होती. यासाठी धैर्यशील मोहिते पाटील व संग्रामसिंह मोहिते पाटील स्वरूपा राणीदिदि मोहिते पाटील यांच्यासह संपूर्ण मोहिते पाटील परिवाराने खूप परिश्रम घेतले. सर्व परिवार बाळदादांच्या मार्गदर्शनाखाली रात्र-रात्र जागून काढत होते. संपूर्ण मोहिते पाटील परिवाराच्या अविरत कष्टामुळेच हा सोहळा देशपातळीवर अव्वल दर्जाचा ठरला. दूरदृष्टी, शिस्तबध्दपणा, योग्य नियोजन या त्रिसूत्रींमुळेच हाती घेतलेल्या कार्यक्रमाला एका भव्य उंचीवर नेण्याची किमया बाळदादा करू शकतात. जर बाळदादा सांस्कृतिक मंत्री असते तर पारंपारिक कलेसह आधुनिक कलेलाही प्रोत्साहन देऊन त्यांनी महाराष्ट्राला एका भव्य उंचीवर नेऊन ठेवले असते हे मात्र निश्चित!
संपादक -गौतम भंडारे. साप्ताहिक बंडखोर.







