*आयबीपीएसमध्ये बंपर भरती, कोणत्या बँकेत किती भरती?*
नवी दिल्ली : इन्स्टिट्यूट ऑफ बॅंकिंग पर्सोनेल अर्थात आयबीपीएसने प्रोबेशनरी ऑफिसर्सच्या भरतीसाठी अधिसूचना जारी केली आहे. आयबीपीएसच्या अधिकृत साईट ibps.in वर अर्जाची प्रक्रिया सुरू झाली आहे. तर अर्ज करण्याची मुदत 22 ऑगस्ट 2022 पर्यंत आहे. यावेळी एकूण 6 हजार 432 पदांची भरती होणार आहे. ज्यात सर्वसाधारण गटातील उमेदवारांसाठी 2 हजार 596 जागा आहेत. ओबीसीसाठी 1 हजार 741, एससीसाठी 996, एसटीसाठी 483 आणि ईडब्ल्यूएस प्रवर्गासाठी 2 हजार 596 जागा राखीव आहेत. वरील पदांसाठा शैक्षणिक पात्रता कोणत्याही मान्यताप्राप्त विद्यापीठ किंवा संस्थेतून पदवी अशी आहे. अर्जदाराचे वय 20 ते 30 वर्षे दरम्यान असावे. उमेदवाराचा जन्म दोन ऑगस्ट 1992 पूर्वी झालेला नसावा. एक ऑगस्ट 2002 नंतर झालेला असावा. ओबीसी प्रवर्गातील उमेदवारांसाठी वयात तीन वर्षे आणि एससी/एसटी प्रवर्गासाठी पाच वर्षांची सूट असेल. सामान्य, ओबीसी आणि ईडब्ल्यूएस श्रेणीसाठी 850 रुपये, एससी, एसटी आणि दिव्यांगांसाठी 175 रुपये फी असेल. जी तुम्ही डेबिट कार्ड, क्रेडिट कार्ड, इंटरनेट बँकिंग, मोबाईल वॉलेटद्वारे भरू शकता. या अधिसूचनेद्वारे, बँक ऑफ बडोदा, बँक ऑफ इंडिया, बँक ऑफ महाराष्ट्र, कॅनरा बँक, सेंट्रल बँक ऑफ इंडिया, इंडियन बँक, इंडियन ओव्हरसीज, पंजाब नॅशनल बँक, पंजाब आणि सिंध बँक, यूको बँक आणि युनियन बँक ऑफ इंडिया मधील प्रोबेशनरी ऑफिसर/ व्यवस्थापन प्रशिक्षणार्थी पदासाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत.उमेदवारांची निवड प्रिलिम्स, मुख्य आणि मुलाखत पद्धतीने होईल. प्रिलिम्समधील कामगिरीच्या आधारे मेनसाठी बोलावले जाईल. मेन्समध्ये उत्तीर्ण झालेल्या उमेदवारांना तिसऱ्या टप्प्यातील मुलाखतीसाठी बोलावले जाईल. इंग्रजी, क्वांटिटेटिव्ह अॅप्टिट्यूड आणि रिझनिंगचे प्रश्न असतील. इंग्रजीमध्ये 30 गुणांचे 30 प्रश्न असतील जे 20 मिनिटांत सोडवण्याचा प्रयत्न करावा लागेल. क्वांटिटेटिव्ह अॅप्टिट्यूडमध्ये 20 मिनिटांत 35 गुणांचे 35 प्रश्न असतील. रिझनिंगमध्येही 35 गुणांचे 35 प्रश्न असतील जे 20 मिनिटांत सोडवावे लागतील. म्हणजेच 100 गुणांचे 100 प्रश्न असतील. मेन्समध्ये रिझनिंग आणि कॉम्प्युटर अॅप्टिट्यूड, जनरल/ इकॉनॉमी/ बँकिंग अवेअरनेस, इंग्लिश लँग्वेज आणि डेटा अॅनालिसिस आणि इंटरप्रिटेशन या विषयांवर प्रश्न असतील.अर्ज करण्यापूर्वी, तुमचा पासपोर्ट आकाराचा फोटो (4.5cm × 3.5cm), स्वाक्षरी, डाव्या अंगठ्याचा ठसा, स्कॅन केलेली हाताने लिहिलेली स्वयंघोषणापत्र ठेवा. आता www.ibps.in ला भेट देऊन अर्ज करा. “CRP-PO/MTs-XII साठी सामान्य भरती प्रक्रियेसाठी ऑनलाईन अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा” या लिंकवर क्लिक करा आणि अर्ज करा. अर्ज करताना तुम्हाला स्कॅन केलेला फोटो, स्वाक्षरी, अंगठ्याचा ठसा आणि स्वयंघोषणापत्र अपलोड करावे लागेल







