हळदी समारंभामध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची गाणी लावली म्हणून होलार समाजावर हल्ला करणाऱ्या समाजकंटकांना त्वरित अटक करावी- संजय गोरवे
अकलूज (प्रतिनिधी )हळदी समारंभामध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची गाणी लावली म्हणून यवतमाळ जिल्ह्यातील पुसद येथील सरपंच व त्यांच्या सहकाऱ्यांनी दलित कुटुंबातील (होलार समाजातील) लोकांना जातिवाचक शिवीगाळ करून कुटुंबांना काठीने बेदम मारहाण केली आहे. दरम्यान याचे पडसाद संपूर्ण राज्यभर उमटले आहे. संबंधित जातीवाद्यांना तात्काळ अटक करुन कडक शिक्षा करावी अशी मागणी स्वाभिमानी होलार संघटनेचे पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष संजय गोरवे यांनी अकलूज विभागाचे उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ. बसवराज शिवपुजे यांना निवेदन देऊन केली आहे.दलित मागासवर्गीय समाजातील होलार समाजाच्या प्रकाश ताळीकुटे यांच्या घरी २४जुलै रोजी त्यांच्या मुलीच्या लग्नाच्या हळदीचा कार्यक्रम होता. सदर कार्यक्रमात परमपूज्य डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची गाणी लावली होती. त्यावरून सरपंच रमेश राठोड यांनी गावगुंडांना गोळा करून ताळीकुटे कुटुंबीयांना शिवीगाळ करत दांडक्यानी बेदम मारहाण केली. यामध्ये अनेकजण जखमी असून त्यांच्यावर जिल्हा रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत. याप्रकरणी सरपंच रमेश राठोड व त्याच्या साथीदारांवर पुसद ग्रामीण पोलीस ठाण्यात अ ट्रोसिटी सह अनेक कलमान्वये गुन्हा दाखल आहे. मात्र अद्याप अटक झालेली नाही.घटनेचा निषेध करत आरोपींना तात्काळ अटक करुन कठोर शिक्षा व्हावी यासाठी स्वाभिमानी होलार संघटनेचे पश्चिम महाराष्ट्र अध्यक्षसंजय गोरवे यांनी निवेदन दिले आहे.यावेळी मनोहर जावीर महाराज, नाना जावीर, प्रशांत जाधव,स्वाभिमानी होलार समाज संघटना तालुका अध्यक्ष किशोर आयवळे, युवा नेते दीपक खंडागळे, संदीप खंडागळे, पत्रकार शेंडगे,तातोबा जावीर व समाज बांधव उपस्थित होते.आरोपींना तात्काळ अटक करुन कठोर शिक्षा करावी, अन्यथा होलार समाज महाराष्ट्रभर तीव्र व उग्र स्वरूपात आंदोलन करेल असा इशारा संजय गोरवे यांनी दिला आहे..







