साहित्याचा बादशहा : अण्णाभाऊ साठे
आज आपण २१ व्या शतकाला ओलांडून नव्या दिशेला बुरसटेले तेच विचार घेऊन जात असल्याने वैज्ञानिक युगात सुध्दा अधोगतीला जात आहोत. त्याला कारणही तसेच आहे महापुरुषांचे विचार आपण आत्मसात करुन प्रत्यक्षात जिवनात उतरविण्या ऐवजी महापुरुषांनाच चाकोरीबध्द करुन जातीयतेच्या गाठोठ्यात बांधून ठेवलय. फुले,शाहु, आंबेडकर यांना अभिप्रेत असलेला समाज घडावा त्याऐवजी फुटीरवादी धोरणाने बहुजनाचा घात केला. आपल्या साहित्याच्या जोरावर समाजव्यवस्था परीवत॔नाची साहित्याच्या माध्यमातून आग ओकणार दुर्लक्षीत थोर व्यक्तीमत्व अण्णाभाऊ साठे. दुर्लक्षीत शब्द यासाठी वापरला की, छत्रपती शिवाजी महाराज यांना पोवाड्याच्या माध्यमातून सातासमुद्रापार पोहचवणारे परीवत॔नवादी अण्णाभाऊ साठे केवळ मातंग समाजाचे असल्याने दुर्लक्षीत तर नाहीत ना? हा प्रश्न जयंतीच्या निमित्ताने पडतो. अण्णाभाऊ साठे जर उच्चवर्णीय असते तर अनेक पदव्या, पुरस्कार, स्मारक, पुतळे यांनी बहरलेले नक्कीच असते.
अण्णा भाऊंच्या लेखनाचे महत्त्वाचे वैशिष्ट्य म्हणजे त्यांच्या लेखनातून वाहणारा निखळ नैतिकतेचा झरा. त्यामुळे अण्णा भाऊ आपल्या एकूण साहित्यातून एक संपूर्ण बंडखोर, परिवर्तनवादी, नास्तिक आणि मानववादी तत्त्वज्ञान समाजामध्ये प्रवर्तित करण्याचा प्रयत्न करणारे लेखणीचे बादशहा म्हणावे लागतील.
अण्णा भाऊंनी ३५ कादंबऱ्या लिहिल्या. तेथेही त्यांच्या कादंबऱ्यांच्यामध्ये ग्रामसंस्कृतीचा संपूर्ण पट दिसून येतो. ते कोणत्याही जातीला गुण किंवा अवगुण चिकटवत नाहीत हे त्यांच्या साहित्याचे वैशिष्ट्य आहे. विद्रोही असला तरी त्यांचा नायक हा न-नायक किंवा खलनायक नसतो. त्यांची पात्रे जातीप्रमाणे न वागता माणसाप्रमाणे वागतात. त्यात सत्त्वशील पाटील, रंगेल पाटील, क्रूर पाटील हे सारेच असतात. चांगले ब्राह्मण, वाईट ब्राह्मण, चांगले दलित, वाईट दलित यांचे चित्रण अण्णा भाऊ कोणत्याही अभिनिवेशाशिवाय आपल्या साहित्यातून करतात. त्यांच्या लेखणीच्या आवाक्यामध्ये केवळ गावगाडाच नाही तर त्या बाहेरचेही माकडवाले, गोसावी, गारुडी, कंजारभाट हे आपआपल्या संस्कृतीसह येतात व संस्कृतीचे जतन करण्यासह विज्ञानवाद शिकवतात.
अण्णा भाऊंच्या लेखनाचे महत्त्वाचे वैशिष्ट्य म्हणजे त्यांच्या लेखनातून वाहणारा निखळ नैतिकतेचा झरा. त्यामुळे अण्णा भाऊ आपल्या एकूण साहित्यातून एक संपूर्ण बंडखोर, परिवर्तनवादी, नास्तिक आणि मानववादी तत्त्वज्ञान समाजामध्ये प्रवर्तित करण्याचा प्रयत्न करतात. आपल्या देशामध्ये माणसांना चौकटीत कोंडण्याचा अट्टाहास असल्याने अण्णा भाऊंच्या मोठेपणाचे मूल्यमापन अद्याप झाले नाही. ते झाले तर भारताला नव्या मानववादी क्रांतीचा मार्ग सापडेल यात शंका नाही. अण्णा भाऊना केवळ मातंगापुरते न बांधता त्यांच्या साहित्याचे सर्वानी वाचन करणे आवश्यक वाटते. लोकशाहीर अण्णा भाऊ साठे प्रतिभावंत लेखक होते. वंचितांच्या हक्कासाठी लढणारे लोकनायक आणि क्रांतिकारी वादळ अशी त्यांची ख्याती आहे. दीड दिवस शाळेत गेलेल्या अण्णा भाऊ साठे यांनी ३५ कादंबऱ्या, १९ कथासंग्रह, १४ लोकनाट्य, ११ पोवाडे, एक प्रवासवर्णन आणि शेकडो लावण्या, छकडी, गाणी लिहिली आहे. मराठी साहित्याला क्रांतीचा उर्जास्त्रोत देणारे लोकशाहीर म्हणून ते सुपरिचित आहेत. ‘माणूस’ हा त्यांच्या साहित्याचा केंद्रबिंदू आहे. त्यांचे साहित्य हे तत्कालीन काळातील वास्तव जीवनाचे अपत्य आहे. अण्णाभाऊच्या साहित्यातून त्यांनी वंचित आणि उपेक्षित समाजाच्या तळागाळातील जातीजमाती, सवर्ण आणि दलित माणसांचे जीवन मांडले आहे. त्याला वास्तवतेची धार आहे. त्यांचे साहित्य बंड, क्रांती आणि विद्रोहाची विचारशलाका आहे. त्यांच्या साहित्यात स्वातंत्र्याचे पंख लावून भरारी मारावयाच्या जगण्याचे तत्त्वज्ञान आहे. ‘ही पृथ्वी शेषाच्या मस्तकावर तरलेली नसून, ती दलितांच्या तळहातावर तरलेली आहे,’ अशी विज्ञानवादी भूमिका त्यांनी मांडली आहे. मात्र, तरीही अण्णाभाऊच्या साहित्याची नेहमीच उपेक्षा झाली आहे. भांडवलशाही, मुंबईतील विषमता यांच्या विरोधात त्यांनी रणशिंग फुंकले आहे. साम्यवादी विचाराने अण्णा भाऊ भारावलेले होते. पुरोगामी विचारांचा अखंड महाराष्ट्र घडवून जगात महाराष्ट्राचे नाव कोरले जावे, अशी अपेक्षा भाऊनी व्यक्त केली. दलितांच्या गुलामगिरीच्या विरोधात आवाज उठवला. माणसाचं माणूसपण जपणारा साहित्यिक, सतत चळवळीत असणारा असा चळवळ जगलेला शाहीर म्हणून त्यांचे नावलौकिक आहे. त्यांच्या साहित्यात विद्रोहाची आग, धग आहे. जनतेची कदर करणारा कलावंत आहे. त्यांचे साहित्य वैचारिक असून, त्याला परंपरेच्या विरोधात परिवर्तनाची आणि सत्यशोधकी विचारांची धार आहे. बहुजन चळवळीचे नायक आहेत. अण्णा भाऊ ‘दलित कथेचे शिल्पकार’ आणि ‘जय भीम, लाल सलाम’ संकल्पनेचे पुरस्कर्ते आहेत. ‘माझा रशियाचा प्रवास’मधून त्यांनी समाजवादाची भूमिका मांडली.
अण्णा भाऊंची व्यापक विचारधारा स्वीकारून समाजोपयोगी कामे केली पाहिजेत. जयंतीच्या निमित्ताने जमवलेले वग॔णीतील पैसे समाजाच्या कल्याणासाठी खर्च केले पाहिजे. त्यांचे विचार मराठी माणसात रुजवून त्यांच्या विचारांचा जागर केला पाहिजे. समाजाला विधायक वळण देण्याच्या कामासाठी पुढे पाऊल टाकले पाहिजे. हीच त्यांच्या विचारांची फलश्रुती ठरेल. अण्णा भाऊंच्या संघर्षाची जीवनगाथा हृदयस्पर्शी आहे. दु:ख, दैन्य आणि दारिद्र्याच्या साखळदंडात सापडूनही अण्णांनी विपुल अशी साहित्यसंपदा निर्माण केली खरी परंतु त्याला जातीयतेच्या चाकोरीत बांधून ठेवल्याने पाहिजे त्या प्रमाणात व्यापलेली नाही. त्यांचे साहित्य भारतासह रशिया, झेक, पोलंड, जर्मन अशा २७ भाषेत भाषांतरित झाले आहे. या साहित्यप्रतिभेच्या महामेरूला सरकारने ‘भारतरत्न’ घोषित करावे आणि ज्ञानपीठ पुरस्कारही द्यावा हीच जयंती निमित्ताने शासनाकडून अपेक्षा करण्यासह अण्णाभाऊचे साहित्य मोठ्या प्रमाणात लोकांपर्यंत पोहचविण्यासाठी प्रयत्न झाल्यास अण्णाभाऊचे विचार प्रत्येकापय॔त पोहचतील व यातूनच नवक्रांतीची ठिणगी पडून निश्चीत परीवत॔न घडेल यात शंका नाही. जयंतीनिमित्त अण्णांना कोटी कोटी अभिवादन….💐💐💐💐💐🙏🙏🙏🙏







