*मतदार ओळखपत्र बनवण्याच्या वयोमर्यादेत बदल; जाणून घ्या*
नवी दिल्ली : मतदानासाठी सर्वात महत्वाचे कागदपत्र म्हणजे मतदान ओळखपत्र होय. वयाची 18 वर्षे पूर्ण झाली की मतदानाचा अधिकार प्राप्त होतो. आता मतदारांसाठी एक महत्वाची माहिती समोर आली आहे. मतदार यादीत नाव नोंदवण्यासाठी आता तुम्हाला वयाची 18 वर्षे पूर्ण होईपर्यंत प्रतीक्षा करावी लागणार नाही. निवडणूक आयोगाने जारी केलेल्या सूचनांनुसार, 17 वर्षांपेक्षा जास्त वयाचे तरुण यासाठी आगाऊ अर्ज करू शकतात. मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार आणि निवडणूक आयुक्त अनुपचंद्र पांडे यांनी सर्व राज्यांच्या सीईओ/ईआरओ/एईआरओना याबाबत सूचना दिल्या आहेत. ज्यामुळे तरुणांना मतदार ओळखपत्र बनवण्यासाठी आगाऊ अर्ज करता येईल. निवडणूक आयोगाने जारी केलेल्या सूचनांनुसार, आता मतदार यादीत नाव समाविष्ट करण्यासाठी तरुणांना 1 जानेवारी रोजी 18 वर्षे वयोमर्यादा पूर्ण होण्याची वाट पाहण्याची गरज नाही, तरी ते त्यांचे नाव मतदार यादीत समाविष्ट करू शकतात. तरूण 17 वर्षांपेक्षा अधिक असतील तर त्यांना मतदार यादीत नाव नोंदवण्यासाठी अर्ज भरावा लागेल. आता नव्या मतदारांना 1 एप्रिल, 1 जुलै आणि 1 ऑक्टोबरपासून मतदार यादीत नाव नोंदवण्यासाठी अर्ज भरता येऊ शकतो. प्रत्येक तिमाहीला मतदार यादी अपडेट केली जाईल. यातील पात्र मतदारांना पुढच्या तिमाहीत वयाची 18 वर्ष पूर्ण झाल्यावर मतदान करता येईल. तसेच नोंदणी झाल्यानंतर नव मतदारांना निवडणूक आयोगाचं ओळखपत्र जारी केले जाईल. मतदार यादीत 2023 मध्ये त्यात बदल केले जातील.








*