*नान्नज अभयारण्यात ‘माळढोक’ दिसला; पक्षीप्रेमींमध्ये आनंदोत्सव*
सोलापूर : नामशेष होण्याच्या उंबरठ्यावर असलेला माळढोक पक्षाची नान्नज अभयारण्यामध्ये पुन्हा घर वापसी झाली आहे. गत दोन दिवसांपासून अभयारण्यात मादी ‘माळढोक’चा वावर दिसत आहे. दरवर्षी ठराविक काळापुरता परतणारा माळढोक त्यासाठी राखीव असणाऱ्या अभयारण्यात स्थिरवात का नाही? तो इतरवेळी कुठे जातो? असे प्रश्न काही दिवसांपासून निर्माण झाले होते. जुलै ते डिसेंबर महिन्यात हा पक्षी नान्नज अभयारण्यात दिसून येतो, मागच्या काही वर्षांपासून हे चित्र दिसून येत नव्हतं. सध्या देशात फक्त 150 माळढोक पक्षी शिल्लक आहेत. राजस्थानमध्ये यांची संख्या सर्वाधिक आहे. त्यानंतर मध्यप्रदेश, महाराष्ट्र, कर्नाटकमध्ये या पक्षाचा अधिवास आढळतो. राज्यातील अमरावती, नाशिक आणि सोलापूर जिल्ह्यात या पक्षाचा वावर आहे. मागच्या काही वर्षात सोलापूर जिल्हा वगळता इतर ठिकाणी माळढोकचा वावर आढळला नाही, त्यामुळे चिंता व्यक्त केली जात होती. आता पक्षीप्रेमींमधून आनंद व्यक्त केला जात आहे.







