*कोल्हापूर येथे मुंबई उच्च न्यायालयाचे खंडपीठ/सर्किट बेंच स्थापन करण्याकरिता केंद्रीय कायदा मंत्री यांच्याकडे सकारात्मक पाठपुरावा करू* . *केंद्रीय मंत्री ना.श्रीमती दर्शना जरदोष*
कोल्हापूर दि.१५ (केदार लोहकरे याजकडून)आज कोल्हापूर येथील दौऱ्यावरती केंद्रीय मंत्री ना.श्रीमती दर्शना जरदोष (राज्य रेल्वे व टेक्सटाईल्स मंत्री भारत सरकार )आल्या होत्या यावेळेस मुंबई उच्च न्यायालय कोल्हापूर खंडपीठ कृती समिती यांच्यामार्फत कोल्हापूर येथे मुंबई उच्च न्यायालयाचे सर्किट बेंच स्थापन करणेबाबत निवेदन देण्यात आले.यावेळी राज्यसभेचे नूतन खासदार धनंजय महाडिक उपस्थित होते. हे निवेदन देते वेळेस खंडपीठ कृती समितीचे अध्यक्ष अॅड गिरीश खडके व सचिव अॅड विजयकुमार ताटे-देशमुख यांनी सांगितले की, कोल्हापूर,सांगली,सातारा,सिंधुदुर्ग, रत्नागिरी आणि सोलापूर या सहा जिल्हाकरिता कोल्हापूर येथे मुंबई उच्च न्यायालयाचे खंडपीठ/ सर्किट बेंच स्थापन व्हावे याकरिता गेली 35 वर्षे इतका प्रदीर्घ लढा सुरु आहे.कोल्हापुर हे 6 जिल्ह्याकरिता मध्यवर्ती ठिकाण आहे.मुंबई उच्च न्यायालयाचे सर्किट बेंच स्थापन करणेबाबत मंत्रिमंडळाने मान्यता दिलेली आहे तरी देखील खंडपीठ स्थापनेचा विषय प्रदीर्घ काळापासून प्रलंबित आहे.नुकतेच वेस्ट बंगाल येथील जलपाईगुडी (Jalpaiguri) येथे सर्किट बेंच स्थापन झाले आहे. त्यामुळे कोल्हापूर येथे देखील सहा जिल्ह्याकरिता खंडपीठ स्थापन होणे आवश्यक आहे असे ना.श्रीमती दर्शना जरदोष यांना सांगण्यात आले.तसेच यावेळी नूतन खासदार धनंजय महाडिक म्हणाले की महाराष्ट्र राज्य मंत्रिमंडळाने सर्किट स्थापन करणे बाबत ठराव केलेला आहे,खंडपीठ स्थापने करीता जागा उपलब्ध आहे. सहा जिल्यातील सर्व सामान्य जनतेला मुंबई येथे न्याय हक्काकरीता जाणे येणे खूप खर्चीक आहे ते आर्थिक दृष्ट्या सर्व सामान्यांना न परवडणारे आहे.सहा जिल्ह्याकरीता कोल्हापूर येथे सर्किट बेंच स्थापन झालेस जलदगतीने सर्व सामान्य जनतेस न्याय मिळणार आहे.तरी आपण केंद्रीय मंत्री या नात्याने कोल्हापूर खंडपीठ /सर्किट बेंच स्थापने बाबत केंद्रीय कायदा मंत्री यांचेकडे पाठपुरावा करावा असे अव्हान केले. यावेळी ना.दर्शना जरदोष यांच्याकडून सांगण्यात आले की,मी स्वतः केंद्रीय कायदा मंत्री किरेन रिजीजू यांच्याशी कोल्हापूर खंडपीठ /सर्किट बेंच स्थापने बाबत पाठपुरावा करीन.तसेच सर्व सामान्य व्यक्तीला जलद व कमी खर्चात न्याय मिळणे गरजेचे आहे हे सुध्दा निदर्शनास आणून देऊ असे आश्वासन दिले. हे निवेदन देतेवेळी कोल्हापूर जिल्हा बार असोसिएशनचे अध्यक्ष अॅड.गिरीश खडके,सचिव अॅड.विजयकुमार ताटे-देशमुख कोल्हापूर जिल्हा बार असोसिएशनचे माजी अध्यक्ष अॅड. संपतराव पवार,अॅड.व्ही.आर.पाटील,अॅड.संदिप चौगले,अॅड.संकेत सावर्डेकर, महिला प्रतिनिधी अॅड.तृप्ती नलवडे, कौटुंबिक न्यायालयाचे अध्यक्ष अॅड.राजेंद्र पाटील,अॅड.महांतेश कोल्हे हजर होते.







