*दीड लाख किमतीचे 540किलो प्लास्टिक जप्त.*
अकलूज नगरपरिषद ची गांधी चौक येथील प्लास्टिक पिशवी विक्रेत्यावर कारवाई.
दीड लाख किमतीचे 540किलो प्लास्टिक जप्त.
अकलूज (प्रतिनिधी )महाराष्ट्र राज्य सरकारने पर्यावरणाला बाधा पोहचवीणाऱ्या प्लास्टीक वर बंदी घातली असून त्याची सर्वत्र काटेकोर पणे अंमलबजावणी होत आहे. असे असताना सुध्दा अनेक ठिकाणी राजरोसपणे कमी मायक्रोन जाडीच्या प्लास्टिक चा वापर व विक्री होत आहे.अकलूज ग्रामपंचायत चे नगर परिषद मध्ये रूपांतर झाल्यानंतर तत्कालिन मुख्याधिकारी धैर्यशील जाधव यांनी अकलूज परिसरात प्लास्टीक बंदी केली होती. त्या अनुषंगाने अकलूज नगर परिषद हद्दीतील काही व्यापाऱ्यांनी कायद्याचा मान राखत 81मायक्रोन पेक्षा कमी जाडीच्या प्लास्टिक ची विक्री करणे बंद केले. त्यानंतर ज्या व्यापाऱ्यांनी प्लास्टिक विक्री बंद केली आहे. अशा व्यापाऱ्यांचा नगर परिषद च्या वतीने सन्मान देखील केला होता. परंतु तरीही काही व्यापारी प्लास्टिक पिशवी विकत आहेत. हे निदर्शनास आल्यानंतर काही विक्रेत्यांवर कारवाई देखील करण्यात आली होती.त्यामुळे अनेक व्यापाऱ्यांनी कमी जाडीच्या प्लास्टिक पिशवी ची विक्री बंद करून ग्राहकांना 81मायक्रोन जाडीची पिशवी उपलब्ध करून दिली होती.परंतु काही महिन्यापूर्वी धैर्यशील जाधव यांची पदोन्नती ने कल्याण -डोंबिवली येथे उपायुक्त म्हणून बदली झाल्यानंतर परिसरातील अनेक व्यापाऱ्यांनी पुन्हा कमी जाडीच्या प्लास्टिक पिशवी ची राजरोस पणे विक्री सुरु केली आहे.दि. 2 जून रोजी अकलूज नगरपरिषद चे कर्मचारी गांधी चौक ते माळशिरस रस्ता येथून जात असताना गांधी चौक येथील नवजीवन रतनचंद दोशी यांच्या किराणा व भुसार मालाच्या दुकानासमोर एक पिवळ्या रंगाची गाडी दिसल्यानंतर त्यांनी चौकशी केल्यानंतर त्या गाडीत 30किलो वजनाच्या 18प्लास्टिक बॅग आढळून आल्यानंतर या बॅगा जप्त करून दुकानातील इतर प्लास्टिक पिशव्या असे मिळून तब्बल 540किलो प्लास्टिक जप्त करण्यात आले.त्याची किंमत अंदाजे एक लाख ते दीड लाख रुपये आहे. यासंदर्भात कर्मचाऱ्यांनी त्या गाडीच्या चालकाला विचारले असता त्याने सदर गाडी बारामती येथून आल्याचे सांगितले.सदर कारवाई अकलूज नगरपरिषद चे मुख्याधिकारी दयानंद गोरे यांच्या मार्गदर्शनाखाली अकलूज नगपरिषद चे कार्यालयीन अधिक्षक सुनिल काशिद, अतिक्रमण विभाग प्रमुख शिवरत्न लोंढे, सागर बनसोडे, राहुल शिंदे, किसन खंडागळे, लखन साळवे, पिंटू लोखंडे, मनोज बाबर यांनी केली.







