माढा मतदारसंघातील रेल्वे प्रश्नांवर खासदार धैर्यशील मोहिते पाटील यांचा आक्रमक पाठपुरावा

पुणे : (प्रतिनिधी )पुणे व सोलापूर विभाग रेल्वे समितीची बैठक आज विभागीय रेल्वे व्यवस्थापक कार्यालय, पुणे येथे पार पडली.
या बैठकीत खासदार धैर्यशील मोहिते पाटील यांनी माढा लोकसभा मतदारसंघासह सोलापूर जिल्ह्यातील विविध प्रलंबित रेल्वे प्रश्नांवर आक्रमकपणे पाठपुरावा केला
.दादर-पंढरपूर-दादर दैनिक रेल्वे सुरू करणे, पंढरपूर-देहू मेमू सेवा सुरू करणे तसेच पंढरपूर-फलटण-लोणंद रेल्वेमार्गाच्या भूसंपादनाबाबत तातडीने बैठक घेऊन प्रकल्पाला गती देण्याची मागणी खासदार मोहिते पाटील यांनी केली.
माढा तालुक्यातील मोडनिंब येथे GCT कार्गो टर्मिनल सुरू करणे आणि बंद असलेली किसान रेल्वे सेवा पुन्हा सुरू करण्याची मागणीही त्यांनी केली.
लातूर-कुर्डूवाडी-सोलापूर तसेच मिरज-कुर्डूवाडी-दौंड कॉर्ड लाईन प्रकल्पांना गती देण्याबरोबरच मिरज-कुर्डूवाडी-लातूर रोड रेल्वेमार्गाच्या दुहेरीकरणाचे काम आणि त्यासाठी आवश्यक भूसंपादन प्रक्रियेला वेग देण्याची मागणी करण्यात आली.
माढा व जेऊर रेल्वे स्थानकांवर हुतात्मा, उद्यान, कोईमतूर-मुंबई तसेच पनवेल-नांदेड एक्स्प्रेसला थांबा देण्याची मागणीही बैठकीत करण्यात आली.
माढा, सांगोला आणि पंढरपूर तालुक्यातील जवळा, बामणी, बाभुळगाव, म्हैसगाव व लऊळ येथे नवीन रेल्वे स्थानके सुरू करण्याबाबतही खासदारांनी पाठपुरावा केला.
रेल्वे मार्गाच्या चौपदरीकरणामुळे शेतकऱ्यांच्या सिंचन पाइपलाइनच्या क्रॉसिंगचा प्रश्न निर्माण होऊ नये, यासाठी योग्य नियोजन व आवश्यक उपाययोजना करण्याची मागणी करण्यात आली.
तसेच कुर्डूवाडी-पंढरपूर जुन्या मीटरगेज मार्गालगतची रिक्त जमीन विकासकामांसाठी वापरण्याच्या प्रस्तावावरही चर्चा झाली
.फलटण-लोणंद-पुणे रेल्वेमार्गादरम्यान सिग्नलिंग यंत्रणा अद्ययावत करून रेल्वे वाहतूक अधिक सुरक्षित आणि गतिमान करण्याची मागणीही खासदार मोहिते पाटील यांनी केली.
माढा लोकसभा मतदारसंघातील रेल्वे सुविधांचा विस्तार, प्रवाशांच्या सोयी-सुविधा आणि प्रलंबित रेल्वे प्रकल्पांना गती देण्यासाठी बैठकीत विविध मुद्दे मांडण्यात आले.
यावेळी खासदार धैर्यशील मोहिते पाटील यांच्यासह मध्य रेल्वेचे महाव्यवस्थापक राजीव श्रीवास्तव, उपमहाव्यवस्थापक कुश किशोर मिश्रा, पुणे मंडल व्यवस्थापक राजेश कुमार वर्मा, सोलापूर मंडल व्यवस्थापक सुनील मिश्रा यांच्यासह रेल्वेच्या विविध विभागांचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.







