मनोज जरांगे पाटील यांचा सरकारला इशारा; 29 ऑगस्टपासून निर्णायक आंदोलनाची घोषणा
प्रतिनिधी :-
अंतरवाली सराटी येथे 29 जुलै रोजी झालेल्या बैठकीत मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी पुन्हा एकदा सरकारला इशारा देत 29 ऑगस्टपासून निर्णायक आंदोलन छेडण्याची घोषणा केली.
मराठा समाजाला वारंवार आश्वासने देऊन वेड्यात काढण्याचे काम सुरू असल्याचा आरोप त्यांनी केला. जरांगे पाटील म्हणाले की, मराठा आरक्षणाच्या लढ्याला तीन वर्षे पूर्ण होत असून, समाजाच्या न्यायासाठी आता अंतिम टप्प्यातील आंदोलन करावे लागणार आहे.
राज्यात 58 लाख मराठा नोंदी सापडूनही संबंधितांना प्रमाणपत्रे दिली जात नसल्याचा आरोप त्यांनी केला. ज्यांच्या नोंदी उपलब्ध आहेत त्यांनी तात्काळ अर्ज दाखल करावेत, असे आवाहनही त्यांनी केले.
हैदराबाद गॅझेटीयरचा आधार सरकारने मान्य केला असेल, तर त्यानुसार प्रमाणपत्रे का दिली जात नाहीत, असा सवाल त्यांनी उपस्थित केला.
28 ऑगस्टपर्यंत हैदराबाद गॅझेटीयरच्या आधारे प्रमाणपत्रे द्यावीत, अन्यथा 29 ऑगस्टपासून आंदोलन सुरू होईल, असा अल्टिमेटम त्यांनी सरकारला दिला.
जरांगे पाटील यांनी सांगितले की, मराठा समाजातील युवक-युवतींचे मोठे नुकसान होत असून, तीन वर्षांपासून समाजाच्या हक्कासाठी संघर्ष सुरू आहे.
58 लाख नोंदींच्या आधारे प्रमाणपत्रे मिळेपर्यंत आंदोलन मागे घेतले जाणार नाही, असे त्यांनी स्पष्ट केले. यावेळी त्यांनी सरकारवर विविध योजनांची अंमलबजावणी न केल्याचा आरोप केला.
ओबीसींप्रमाणे मराठा समाजाला सवलती देण्याचा शासन निर्णय काढण्यात आला असला, तरी प्रत्यक्षात त्या सुविधा सुरू झालेल्या नाहीत, असा दावा त्यांनी केला.
अण्णासाहेब पाटील महामंडळाच्या कर्ज परताव्याचा प्रश्न, सारथी संस्थेच्या योजनांची अंमलबजावणी आणि स्वतंत्र मराठा मंत्रालयाच्या मागणीवरही त्यांनी सरकारला लक्ष्य केले.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका करताना त्यांनी मराठा समाजावर अन्याय होत असल्याचा आरोप केला.
एसीबीसी आरक्षण, नियुक्त्या आणि शैक्षणिक प्रवेशांबाबतही मराठा विद्यार्थ्यांना अडचणी येत असल्याचे त्यांनी म्हटले.29 ऑगस्टपासून सुरू होणाऱ्या आंदोलनात समाजातील प्रत्येकाने सहभागी व्हावे, असे आवाहन करत त्यांनी कोणीही घरी थांबू नये, असे सांगितले. सर्व प्रलंबित मागण्या पूर्ण होईपर्यंत आणि आंदोलनादरम्यान दाखल करण्यात आलेले गुन्हे मागे घेतले जाईपर्यंत आंदोलन सुरू राहील, असा निर्धारही त्यांनी व्यक्त केला.
तसेच सातारा, कोल्हापूर, औंध आणि पुणे संस्थानांच्या गॅझेटीयरचा आधारही प्रमाणपत्रांसाठी लागू करण्याची मागणी त्यांनी केली. सरकारने मराठा समाजाच्या प्रश्नांवर तातडीने निर्णय घ्यावा, अन्यथा 29 ऑगस्टपासून मोठ्या प्रमाणावर आंदोलन उभारले जाईल, असा इशारा मनोज जरांगे पाटील यांनी दिला.







