ज्येष्ठ इतिहास संशोधक डॉ. जयसिंगराव पवार यांचे निधन, महाराष्ट्राच्या इतिहास संशोधन क्षेत्राला मोठा धक्का
कोल्हापूर: महाराष्ट्राच्या इतिहास संशोधन क्षेत्रातील प्रतिष्ठित व्यक्तिमत्व, ज्येष्ठ इतिहास संशोधक डॉ. जयसिंगराव पवार यांचे गुरुवारी पहाटे निधन झाले. ते 85 वर्षांचे होते.
काही दिवसांपासून त्यांच्यावर कोल्हापूर येथील खासगी रुग्णालयात उपचार सुरू होते, पण अखेर त्यांची प्राणज्योत मालवली.
डॉ. पवार यांच्या निधनाने मराठा साम्राज्याच्या इतिहासाचा एक अनमोल संशोधक हरवल्याची भावना व्यक्त होत आहे.
राजकीय, सामाजिक आणि शैक्षणिक क्षेत्रातून हळहळ व्यक्त केली जात आहे.डॉ. जयसिंगराव पवार यांचा जन्म 30 डिसेंबर 1941 रोजी सांगली जिल्ह्यातील तडसर येथे झाला. त्यांनी कोल्हापूरच्या शिवाजी विद्यापीठातून एम.ए. आणि पीएच.डी. पदवी संपादन केली.
तीन दशकांहून अधिक काळ महाविद्यालयीन क्षेत्रात अध्यापन केले. डॉ. अप्पासाहेब पवार यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांनी इतिहास संशोधनाची सुरुवात केली
.त्यांनी महाराणी ताराबाई, सेनापती संताजी घोरपडे, मराठेशाहीचा मागोवा, राजर्षी शाहू स्मारक ग्रंथ यांसह 25 पेक्षा अधिक इतिहासविषयक ग्रंथ लिहिले.
डॉ. पवारांचे 45 हून अधिक शोधनिबंध प्रकाशित झाले आहेत.डॉ. पवार यांनी अनेक इतिहास परिषदांचे अध्यक्षपद भूषवले.
ते अखिल महाराष्ट्र इतिहास परिषदेचे संस्थापक-सदस्य आणि नंतर अध्यक्ष होते.
1992 मध्ये त्यांनी महाराष्ट्र इतिहास प्रबोधिनी संस्थेची स्थापना केली आणि संस्थापक-संचालक म्हणून कार्यरत राहिले.
यावर्षीचा सहकार महर्षी शंकरराव मोहिते पाटील साहित्यिक पुरस्कार देखील त्यांना मिळाला होता.







