जयघोषापेक्षा विचारांचा जागर!…..
.एकविसाव्या शतकात लोकांना महाराजांबद्दल काय वाटते याकडे न पाहता सतराव्या शतकात वर्तमानात लोकांना महाराजांबद्दल काय वाटत होते? हे आज जाणून घेणं जास्त महत्त्वाचं वाटते.
हिंदी रिंग्वेंटन राजापूरम वरून महाराजांना लिहितोय तुमच्या शत्रुविरुद्ध तुम्हाला मदत करीन, तसेच महाराजांना The General of Hindu Forces असे म्हणतो.
फ्रेंच प्रवासी ऍबे कॅरीया शिवाजी महाराजांच्या अडचणी जेव्हा वाढतात तेव्हा त्यांचा उत्साह देखील वाढतो मग अशक्यप्राय कामे ते सहज साध्य करतात. पहिले शिवचरित्र लिहिणारा पोर्तुगीज प्रवासी कोसमी द ग्वार्र. महाराजांच्या दक्षिणेचे दिग्विजय मोहिमेचे बारकावे सांगणारा फ्रेंच अधिकारी मार्टिन. रायगड किल्ल्याचे अभेद्य गुणवैशिष्ट्ये सांगणारा इंग्रज व्यापारी थॉमस आणि सिंधू नदीपासून बंगालच्या प्रांतापर्यंत राज्य विस्ताराचे महत्वकांक्षा सांगणारा कॅरी.
हाती धरून मृत्यूला तिरडीवरती निजण्याची… महंत भाग्य हे भाळी ऐसे नीती लिहून गेली जणू मथुरेतल्या कृष्णा जागी ती जगदंबा अवतरली…. महाराजांना पालखीत बसवताना शिवा काशीद आपल्या सहकार्याने म्हणतो चिंता माझी सोडा सारे… हृदयावरती पत्थर ठेवा एकच मागणे तुम्हा माझे लाखांचा पोशिंदा जगवा..
महाराजांबद्दल किती व काय सांगावे. आज 350 वर्षांहून अधिक काळ लोटून गेला, तरीही सर्वसामान्य रयतेच्या मनामध्ये शिवाजी राजे अधिराज्य करीत आहेत. असं त्यांचं काय वेगळेपण होतं? किंवा आहे. की आधुनिक लोकशाहीमध्ये पण शिवाजी महाराजांचं कौतुक, उदोउदो होत आहे. त्या ‘राजा’ च्या विचारात, व्यवहारात आणि चरित्रात असे काय आहे की त्यामुळे लोकशाहीत सुद्धा त्यांचे स्मरण कायम स्फूर्तिदायक ठरत आहे.
तसे राजे खूप होऊन गेले परंतु सर्वच राजांची आठवण किंवा जयंती साजरी केली जात नाही पण शिवजयंती जितक्या विस्तृत प्रदेशात, जितक्या मोठ्या प्रमाणात आणि ज्या उत्साहाने, उमेदीने व स्फूर्तीने साजरी केली जाते तसे इतर कोणत्याही राजाच्या बाबतीत घडत नाही, असे का व्हावे ? याचा विचार केला पाहिजे.
सर्वात महत्त्वाचे म्हणजे वारस हक्काने राजे बनले नव्हते. त्यांनी राज्य ‘निर्माण’ केले आणि तेही रयतेचे राज्य. राज्यात राहणाऱ्या सर्वसामान्य माणसाला ‘रयतेला’ आपले राज्य वाटत होते हेच ठळक वेगळेपण महाराजांचं होतं. शिवाजी महाराजांचे कार्य हे आपले कार्य आहे असे रयतेला वाटत होते.
मोगल व आदिलशाहीने उध्वस्त झालेली गावे, शेतकरी शिवाजीराजांनी कौलनामे घेऊन पुन्हा बसवली. जमीन कसायला येणाऱ्यांना बी बियाणे देऊन मदत केली महसूल सुद्धा माफ केला. शेतकऱ्याच्या भाजीच्या देठालाही हात लावता कामा नये, असे सैन्याला सक्त आदेश देणारा राजा. शेतकऱ्यांची व त्यांच्या शेतीची काळजी वाहणाऱ्या राजासंबंधी रयतेला मग प्रेम का नाही वाटणार ? शिवाजींचे कार्य टिकले पाहिजे व वाढले पाहिजे असे का नाही वाटणार? त्या काळात स्त्रियांच्या अब्रूला विशेषता गोरगरिबांच्या स्त्रियांच्या अब्रूला किंमत नव्हती. केवळ उपभोगण्याच्या वस्तू होत्या. दिवसाढवळ्या कधीही अब्रू लुटली जात होती.
शिवाजी महाराज आणि रांझ्याच्या पाटलांची गोष्ट सर्वांनाच माहीत आहे. अशा इतरही कथा आहेत विजयी सेनापती सकुजी गायकवाड यांचे डोळे काढून जन्मभर तुरूंगात डांबले होते कारण बेळवाडीच्या किल्लेदार सावित्रीबाई देसाई या शत्रू असलेल्या स्त्रीवर बलात्कार केला म्हणून पण गय केली नाही. त्यानंतर स्त्रिया वरील अत्याचार थांबून परस्त्रीला मातेसमान मानू लागले.
पण आज वारसा सांगणारी आणि महाराजांच्या नावाचा जयघोष करणारे काय करतात? अत्याचार करणाऱ्याला शिक्षा होते का? हातपाय तोडायचे सोडा, कोर्टात केस तरी दाखल होते का ? आत्याचार करणारा जितका मोठा, मालदार तितका तो लवकर सुटतो.ज्या काळात गुलामांचाही व्यापार सर्रास होत होता तिथं व्यापार उद्योगास पाठबळ कसे मिळेल. रयत, व्यापारी यांना लुबाडले जात होते.
महाराजांनी अशा लोकांवर जरब घालून व्यापार उद्योगास संरक्षण दिले. महाराज धर्मश्रद्ध होते पण धर्मद्वेष्टा नव्हते. महाराजांची युद्धे ही कधीच धर्मयुद्ध नव्हते. सर्व धर्माची, सर्व जातीची लोकं महाराजांनी जोडली. थोडक्यात चारी वर्ण आपापल्या धर्माप्रमाणे चालवून त्यांचा संग्रह करून ठेवला. धर्म, धर्मनिष्ठा मुख्य नव्हती तर राज्य ,राज्यनिष्ठा व स्वामीनिष्ठ मुख्य होती.
महाराजांनी स्वतःच्या राज्यात प्रजेच्या धर्मावरून भेद, पक्षपातीपणा कधीच केला नाही. अस्पृश्यता, जात, धर्म, स्त्रीयांची गुलामी इत्यादींना स्वराज्यातून हद्दपार केले. शिवाजी महाराजांनी लोकभाषेत म्हणजे मराठीमधून आपला राज्यकारभार केला. महाराजांसाठी लोक मरण्यासाठी तयार झाले. काही लोकांनी शिवचरित्र हे अफजलखान, शाहिस्तेखान, दिलेरखान, औरंगजेबाच्या कैदेतून सुटका किंवा कथा, कादंबर्या, नाटकं, सिनेमांच्या माध्यमातून लोकांसमोर ठेवून थिटे करण्याचा प्रयत्न केला. परंतु कॉम्रेड गोविंद पानसरे आपल्या ‘शिवाजी कोण होता’ या पुस्तकात म्हणतात की, शिवाजीच्या राज्यासाठी लोक मरण्यासाठी तयार का झाले? याचे उत्तर ज्याला कळलं त्यालाच शिवचरित्र समजलं.
आज धर्माधर्माचे, जातीपातीच्या राजकारणामुळे जे शिवाजी महाराज देशाचे, महाराष्ट्राचे होते ते मात्र अनेक संघटना, पक्षाच्या माध्यमातून फक्त महाराष्ट्रातील हिंदूंचे केले. स्वतःच्या स्वार्थासाठी महाराजांचा उपयोग करून घेत आहेत. आज सर्व राजकीय पक्ष, पुढारी महाराजांचे स्मारक सागरात बांधण्यासाठी हाजारो कोटी खर्च करायची भाषा बोलतात. वर्षोनुवर्षे त्या गोष्टीवर राजकारण चालू आहे. हे रयतेला कधी कळणार. लक्षात ठेवा इस्टेटच्या लोभाने जे लढतात आणि मरतात त्यांची नोंद ठेवावी असं इतिहासाला वाटत नाही. काहीही झालं, कितीही इतिहासाची तोडमोड केली तरी शिवाजी महाराजांचे विचार जिवंतच राहतील.
“जय भवानी जय शिवाजी” अशी घोषणा कानांवर पडल्याबरोबर आपल्या हृदयाची स्पंदने आनंदाने आणि अभिमानाने उत्तेजित होतात. महाराजांनी हाती तलवार घेतली, पण निष्पापांच्या रक्ताने ती कधी रंगू दिली नाही. त्यामुळे त्यांच्या रणनीतीला रक्ताचा वास येत नाही तर मानवतेचा सुगंध येतो. ते आई भवानीला कौल मागण्याइतके धार्मिक जसे होते, तसेच पोर्तुगीजांना किल्लेबांधणीचे अन् इंग्रजांना बंदुका अन् तोफा चालवण्याचे तंत्र विचारणारे व्यवहारी अन् आधुनिकही होते. प्रजेचा सांभाळ पित्याप्रमाणे करणारे कनवाळू पिता होते, तसेच बंडखोर-फितुरांना देहदंडाची शिक्षा देणारे कर्तव्यकठोर, न्यायनिष्ठुर राजाही होते. शिवछत्रपती हे माणूस होते की नियतीला पडलेले पूर्णत्वाचे स्वप्न होते.
अनेक देशांना, देशातील लोकांना वेगवेगळ्या प्रदेशात घडलेल्या घटना, वेगवेगळी माणसं या सर्वांची प्रेरणा एकच छत्रपती शिवाजी महाराज. आज साडेतीनशे वर्षे झाली त्या प्रेरणेचा स्त्रोत चिरंतन आजही तसाच जळतोय…..
..प्रा. काटकर तात्यासाहेब शिवाजी. ९२२६१४४८३६अकलूज.(महाराष्ट्र शासनाचा आदर्श शिक्षक पुरस्कार प्राप्त शिक्षक असून शैक्षणिक व सामाजिक विषयावर लेखन करतात)







