अकलूजमध्ये ‘आय चॅम्प’ अबॅकस स्पर्धेचा भव्य पारितोषिक वितरण सोहळा उत्साहात संपन्न
अकलूज : (प्रतिनिधी )येथील स्मृतिभवन येथे नॅशनल लेव्हल ‘आय चॅम्प’ अबॅकस कॉम्पिटिशन अंतर्गत यशस्वी विद्यार्थ्यांचा भव्य पारितोषिक वितरण सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला.
या कार्यक्रमाचे आयोजन आय चॅम्प अबॅकसचे डायरेक्टर विशाल माने व स्नेहल माने यांनी केले होते.कार्यक्रमाची सुरुवात सहकार महर्षी शंकरराव मोहिते पाटील व रत्नप्रभा देवी मोहिते पाटील यांच्या प्रतिमेचे पूजन व दीपप्रज्वलन प्रमुख पाहुण्या स्वरूपाराणी मोहिते पाटील यांच्या हस्ते करण्यात आली.
या वेळी प्रमुख पाहुण्या म्हणून स्वरूपाराणी मोहिते पाटील, शितलदेवी मोहिते पाटील, अकलूज नगरपरिषद चे नगरसेवक सयाजी राजे मोहिते पाटील, महेंद्र वाकसे, गणपत शिवाजी मोरे, हेमंत बर्डे, जय फडतरे, वनिता कोरटकर, मनोरमा लावंड आदी मान्यवर उपस्थित होते.
या वेळी बोलताना स्वरूपाराणी मोहिते पाटील म्हणाल्या की,“आजच्या स्पर्धात्मक युगात केवळ पुस्तकी ज्ञान पुरेसे नाही, तर मेंदूची गती, अचूकता व आत्मविश्वास यांचा समतोल विकास होणे अत्यंत गरजेचे आहे. ‘आय चॅम्प’ अबॅकससारख्या उपक्रमांमुळे मुलांमध्ये गणिताची भीती दूर होऊन त्यांना आनंदाने शिकण्याची प्रेरणा मिळते. या स्पर्धेत सहभागी झालेल्या प्रत्येक विद्यार्थ्याचे मी मनापासून अभिनंदन करते. आयोजकांनी ग्रामीण भागातील मुलांना राष्ट्रीय स्तरावर आपली गुणवत्ता सिद्ध करण्याची संधी उपलब्ध करून दिली, ही अत्यंत कौतुकास्पद बाब आहे.
”या अनुषंगाने शितलदेवी मोहिते पाटील म्हणाल्या की,“अबॅकस शिक्षणामुळे मुलांची स्मरणशक्ती, एकाग्रता आणि निर्णयक्षमता अधिक प्रभावी होते. आज या स्पर्धेत विद्यार्थ्यांनी दाखवलेली चपळता आणि आत्मविश्वास पाहून खूप अभिमान वाटतो. अशा उपक्रमांमुळे मुलांच्या सर्वांगीण विकासाला चालना मिळते. ‘आय चॅम्प’ अबॅकसच्या माध्यमातून मुलांना उज्ज्वल भविष्यासाठी सक्षम घडवण्याचे कार्य सुरू आहे, हे खरोखरच प्रेरणादायी आहे.”
या स्पर्धेत विविध जिल्ह्यांतील ४५८ विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवून आपल्या गणिती कौशल्याचे प्रभावी प्रदर्शन केले. क्षणात अचूक उत्तरे देण्याची क्षमता, एकाग्रता व आत्मविश्वासामुळे विद्यार्थ्यांनी उपस्थितांची मने जिंकली.सर्व सहभागी विद्यार्थ्यांना ट्रॉफी, मेडल व प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले.
तसेच उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या विद्यार्थ्यांना सायकल, स्मार्टवॉच यांसारखी आकर्षक पारितोषिके मान्यवरांच्या हस्ते प्रदान करण्यात आली.
प्रमुख पाहुण्या स्वरूपाराणी मोहिते पाटील यांनी विद्यार्थ्यांचे कौतुक करत अबॅकस शिक्षणामुळे मुलांचा बौद्धिक विकास, एकाग्रता व आत्मविश्वास वाढतो, असे प्रतिपादन केले.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी शिक्षक, पालक व आयोजकांचे मोलाचे सहकार्य लाभले.
कार्यक्रमाचे प्रस्ताविक नूरजहाँ शेख यांनी केले, सूत्रसंचालन अभिनेत्री करिश्मा गावडे यांनी केले तर आभार सौ. स्नेहल माने यांनी मानले.







