जिल्हा परिषद, पंचायत समित्यांमध्ये ‘स्वीकृत सदस्य’ नियुक्त होणार महसूलमंत्री बावनकुळे यांचा मुख्यमंत्र्यांकडे प्रस्ताव
प्रतिनिधी | मुंबईमहानगरपालिका व नगरपालिकांप्रमाणेच आता जिल्हा परिषदा व पंचायत समित्यांमध्येही ‘स्वीकृत सदस्य’ नियुक्त करण्याचा प्रस्ताव राज्याचे महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे सादर केला आहे.
या प्रस्तावाला मुख्यमंत्र्यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला असून आगामी जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांनंतर संबंधित सभागृहांमध्ये स्वीकृत सदस्य दिसणार असल्याची माहिती बावनकुळे यांनी दिली.
ग्रामीण भागात अनेक तज्ज्ञ, अभ्यासू व अनुभवी व्यक्ती सामाजिक क्षेत्रात प्रभावी काम करत असतात. मात्र महिला, अनुसूचित जाती-जमाती आदी आरक्षणामुळे अनेकांना निवडणूक लढवता येत नाही. अशा व्यक्तींचा अनुभव व ज्ञान ग्रामीण विकासासाठी उपयोगात यावा, या उद्देशाने त्यांना ‘स्वीकृत सदस्य’ म्हणून संधी देण्याची आवश्यकता असल्याचे बावनकुळे यांनी स्पष्ट केले.
या प्रस्तावाबाबत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, अजित पवार तसेच ग्रामविकास मंत्र्यांशी चर्चा करण्यात आली असून लवकरच हा विषय मंत्रिमंडळ बैठकीत मांडण्यात येणार आहे.
त्यानंतर विधिमंडळात आवश्यक कायदेशीर दुरुस्ती मंजुरीसाठी सादर केली जाईल.दरम्यान, जिल्हा परिषद व पंचायत समित्यांमध्ये नियुक्त होणाऱ्या स्वीकृत सदस्यांना अंतर्गत निवडणुकांमध्ये उभे राहण्याचा तसेच मतदानाचा अधिकार द्यावा, अशी मागणीही पुढे येत आहे.
यासाठी महाराष्ट्र जिल्हा परिषद व पंचायत समिती अधिनियम, 1961 मध्ये दुरुस्ती करण्याचा विचार सुरू असल्याचे ग्रामविकास व पंचायत राजमंत्री जयकुमार गोरे यांनी सांगितले आहे
.पक्षीय बलाबलानुसार या स्वीकृत सदस्यांची नियुक्ती होणार असल्याने आगामी काळात जिल्हा परिषद व पंचायत समित्यांतील सदस्यसंख्या वाढण्याची शक्यता आहे.







