“केंद्रीय अर्थसंकल्प शेतकरी, युवक व ग्रामीण भारतासाठी निराशाजनक – खासदार धैर्यशील मोहिते पाटील”
अकलूज : केंद्रीय अर्थसंकल्प २०२६–२७ मध्ये शेतकरी, युवक आणि ग्रामीण भारताच्या अपेक्षांना न्याय मिळालेला नाही. महागाई, बेरोजगारी आणि शेतीतील वाढता खर्च या ज्वलंत प्रश्नांवर कोणतीही ठोस उपाययोजना या अर्थसंकल्पात दिसून येत नाही, अशी तीव्र टीका माढा लोकसभा मतदारसंघाचे खासदार धैर्यशील मोहिते पाटील यांनी केली आहे.
अर्थसंकल्पावर प्रतिक्रिया देताना मोहिते पाटील म्हणाले की, शेतकऱ्यांसाठी किमान आधारभूत किंमत (MSP) ला कायदेशीर हमी देण्याचा मुद्दा यंदाही सरकारने टाळला आहे. सिंचनासाठी राज्यनिहाय, विशेषतः महाराष्ट्रासाठी स्वतंत्र व ठोस निधीची घोषणा न झाल्यामुळे शेतकरी नाराज आहेत. खत, बियाणे, वीज व इंधनाच्या वाढत्या खर्चाच्या तुलनेत थेट आर्थिक मदत अपुरी असल्याचेही त्यांनी नमूद केले.
युवकांच्या प्रश्नावर बोलताना त्यांनी सांगितले की, मोठ्या प्रमाणावर रोजगारनिर्मिती करणाऱ्या ठोस योजना या अर्थसंकल्पात नाहीत. कौशल्य विकासाच्या नावाखाली प्रशिक्षण दिले जात असले तरी त्या प्रशिक्षणानंतर नोकरीची कोणतीही हमी दिली जात नाही. शिक्षण पूर्ण करून बाहेर पडणाऱ्या तरुणांच्या हाताला काम देण्याचे ठोस धोरण सरकारकडे नसल्याचे पुन्हा स्पष्ट झाले आहे, असे ते म्हणाले.
हा अर्थसंकल्प मोठ्या उद्योगपतींसाठी तयार करण्यात आल्याचा आरोप करत मोहिते पाटील यांनी सांगितले की, शेतकरी, कष्टकरी आणि युवकांच्या प्रश्नांवर हा अर्थसंकल्प पूर्णपणे अपुरा ठरलेला आहे.







