सातारा गॅझेट लागू होणार? मराठा आरक्षण वर निर्णय.जिल्हा परिषद निवडणुकांनंतर निर्णयाची शक्यता
मुंबई | प्रतिनिधी
मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर राज्य सरकारकडून हैदराबाद गॅझेटियरची अंमलबजावणी सुरू असताना आता सातारा गॅझेटियर लागू होण्याबाबत महत्त्वाची हालचाल सुरू झाली आहे.
मराठा आरक्षण उपसमितीची 27 जानेवारी रोजी मंत्रालयात बैठक पार पडली असून, या बैठकीत सातारा गॅझेटियरवर प्रामुख्याने चर्चा करण्यात आली.
उपसमितीचे अध्यक्ष व महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या बैठकीत हैदराबाद गॅझेटियरच्या अंमलबजावणीचा आढावा घेण्यात आला.
तसेच सातारा गॅझेटियर लागू करण्यासंदर्भात सविस्तर चर्चा झाली. जिल्हा परिषद निवडणुकांनंतर सातारा गॅझेटियर लागू करण्याचा निर्णय घेतला जाऊ शकतो, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे
.सातारा गॅझेटियर लागू झाल्यास सातारा जिल्ह्यासह पश्चिम महाराष्ट्रातील मराठा समाजाला त्याचा लाभ मिळणार असल्याने या निर्णयाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
मात्र, सध्या राज्यात जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांमुळे आचारसंहिता लागू असल्याने थेट लाभाचे निर्णय घेण्यात अडचणी येत असल्याचे सांगण्यात येत आहे
.दरम्यान, मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी मुंबईतील आझाद मैदानात केलेल्या उपोषणावेळी हैदराबाद आणि सातारा गॅझेट लागू करण्याच्या मागण्या सरकारने मान्य केल्या होत्या.
त्यावेळी उपसमितीचे अध्यक्ष राधाकृष्ण विखे पाटील आणि मंत्री उदय सामंत यांनी दिलेल्या आश्वासनानंतर जरांगे पाटील यांनी आपले उपोषण मागे घेतले होते.
हैदराबाद गॅझेटियर लागू झाल्यानंतर मराठवाड्यातील अनेक मराठा बांधवांना ओबीसी प्रवर्गातून आरक्षणाचा लाभ मिळू लागला आहे.
त्यामुळे आता सातारा गॅझेटियर कधी लागू होणार, याकडे संपूर्ण राज्यातील मराठा समाजाचे लक्ष लागले आहे.







