अकलूज नगर परिषदेच्या निवडणुकीमुळे अकलूजकरांची दिवाळीनंतर दिवाळी
अकलूज (प्रतिनिधी ) माळशिरस तालुक्यात कोणत्याही निवडणुकीसाठी आजपर्यंत पैशाचे वाटप होत नव्हते किंवा त्याची उघडपणे चर्चा होत नव्हती. या परंपरेला छेद देत नगर परिषद निवडणुकीत मात्र खुलेआम पैशाचे वाटप करण्यात आल्याची चर्चा होत असून,अकलूज करांनी दिवाळीनंतर दिवाळी साजरी केली.
विशेषतः लोकसभा, विधानसभा, जिल्हा परिषद, पंचायत समिती, विविध कार्यकारी सोसायटी, कृषि उत्पन्न बाजार समिती,ग्रामपंचायत निवडणुकीत तर कधीच पैसे वाटप झाले नाही. किंवा त्याबाबत चर्चा झाल्या नाहीत.
मात्र अकलूज नगर परिषदेच्या पहिल्याच निवडणुकीत शहरात पहिल्यांदाच पैसे वाटप झाल्याची खमंग चर्चा नागरिकांतून होत आहे.
अकलूज नगर परिषदेची निवडणूक मंगळवार (ता.२) रोजी पार पडली. निकाल लगेच बुधवार (ता.३) रोजी लागणार होता. परंतु, आता तो रविवार (ता.२१) रोजी लागणार आहे. यामुळे अनेक कार्यकर्ते एकमेकांत काही पैजा लावण्यात दंग आहेत. तर मतदार मात्र प्रचारादरम्यान झालेल्या आरोप प्रत्यारोप वर चर्चा करत असतानाच पैसे वाटपाबाबतही चर्चा करू लागले आहेत. आजपर्यंत माळशिरस तालुक्यात विकासकामाच्या मुद्यावर निवडणूक लढविली जात होती. परंतु या निवडणुकीत मात्र तसे होताना दिसलें नाही. काही उमेदवारांनी प्रामाणिकपणे त्यांनी आजपर्यंत केलेल्या कामाची पोहोच पावती म्हणून मते मागितली. परंतु काही उमेदवारांनी मात्र पैसे देऊन मते मागितली.
वास्तविक, कोणत्याही निवडणुकीत विविध आमिषे दाखविण्या बरोबरच मतदारांना पैसे वाटप होऊ नये यासाठी प्रशासन ठिकठिकाणी नाकेबंदी करत असते. त्याप्रमाणे अकलूज नगर परिषदेच्या वेळी नाकाबंदी करण्यात आली होती.
नगरपरिषदेची निवडणूक लागताच मतासाठी मोठया प्रमाणावर पैसे वाटप होणार असल्याची चर्चा दबक्या आवाजात चालू होती.परंतू,पैसे कधी व कोण देणार?याबद्दल साशंकता होती. मात्र निवडणुकीच्या आधी दोन दिवस पैसे वाटल्याची चर्चा आता होत आहे.
*पैसे वाटपाच्या अनोख्या रीती* :
या निवडणुकीत आपण पैसे दिले मात्र मतदार आपल्यालाच मते देईल का याची खात्री नसल्याने या निवडणुकीत पैसे वाटताना, मतदारांना त्यांच्या त्यांच्या धर्मग्रंथांची शपथ घ्यायला सांगितली. तर काहींना भंडारा हातात घ्यायला सांगितला. काही ठिकाणी आपल्या विरोधात मतदान करणार आहे.अशी खात्री असलेल्या मतदारांना, त्यांच्या मतदान केल्यानंतर ज्या बोटाला शाई लावतात त्या बोटावर काळ्या मार्करने खुणा करून तुमचे मतदान झाले असून, तुम्ही उद्या मतदानाला जाऊ नका.असे स्पष्टपणे सांगून मगच पैसे दिल्याची चर्चा चालू आहे. पैसे वाटताना मतदानाची स्लिप ग्राह्य धरली जात होती.एखादी व्यक्ती घरातील जेवढ्या मतदानाच्या स्लिपा घेऊन येईल त्या प्रमाणात त्याला पैसे दिले जात होते. काही ठिकाणच्या मतदारांनी अशा लोकांना चक्क हाकलून दिले तर काही लोकांनी मजबुरीने पैशांचा स्वीकार केला. एवढे करूनही मतदार कोणाला मत देतील. याबद्दल खात्री नसली तरी प्रत्येक जण आपल्या विजयाचा दावा करीत आहेत. मात्र मतदारांनी कोणाला मत दिले आहे व कोण विजयी होणार यासाठी निकाल लागेपर्यंत वाट पहावी लागणार आहे
.*प्रशासनाची भूमिका कोणती*?
आदर्श निवडणूक आचारसंहितेचे काटेकोरपणे पालन करणार असल्याचे प्रशासनाकडून वारंवार सांगण्यात येते.प्रत्येक निवडणुकीत जिल्हा नाकाबंदी तसेच गाव स्तरावर नाकाबंदी केली जाते ती केवळ मोठ्या प्रमाणात रोख रक्कम गावात आणून मतदारांना वाटली जाऊ नये यासाठीच, मात्र नाकाबंदी ही केवळ फार्सच असल्याचे दिसून येते आहे.कारण अकलूजमध्ये प्रत्येक मतदाराला तीन ते पाच हजार रुपये प्रमाणे वाटप झाल्याची चर्चा आहे. सुमारे पस्तीस हजार मतदारांची संख्या असून 3000 प्रत्येकी म्हटले तरी ही हा आकडा काही कोटींच्या घरात जातो.
अकलूजच्या या निवडणुकीत काही प्रभागात दोन, दोन, तीन उमेदवाराकडून पैसे वाटप झाल्याची चर्चा आहे.त्यामुळे हा आकडा अनेक कोटींच्या घरात जातो.एवढी मोठी रक्कम गावात आली कुठून? ही आणताना प्रशासनाचे लक्ष कसे गेले नाही? ज्यावेळी वाटप राजरोसपणे चालू होते.
त्यावेळी पोलीस व्हॅन रात्रभर पाळत ठेवत होत्या.तरीही पैसे मतदारांपर्यंत अत्यंत सुरक्षित रित्या कसे पोहोचले? पैसे वाटपात प्रशासनाची भूमिका कोणती? याबाबत अकलूजमध्ये एकही कारवाई का झाली नाही. असे विविध प्रश्न उपस्थित होत आहेत.







