*बहीण खरोखर लाडकी असेल तर अगोदर सुरक्षा द्या -सौ. तेजश्री स्वप्नील दुधाने.*
मनात एकच सारखा प्रश्न पडतोय, झोपेत दचकून जाग येते, रस्त्याने शेजारून जाणाऱ्या माणसांची भीती वाटते, भेडसावतो तो एकच प्रश्न तो म्हणजे सुरक्षितेचा…
आज प्रसंग चिमुकल्यांवर ओढवला,उद्या आमच्यावर ओढवणार नाही हे कशावरून… याची शाश्वती देईल का कोण? कळ्या उमलायच्या अगोदरच कोमेजून गेल्या, ज्या शाळेत गेल्यानंतर श्री गणेशा होतो संस्कारांचा, शिक्षणाचा, जी शाळा आपल्याला घडवण्यासाठी, आपल्या व्यक्तिमत्व विकासासाठी पाया रोवते त्याच शाळेत जिचं वय चार वर्षे ही नाही जिला काहीही कळत नाही, अशा चिमुकल्या जीवांवर असा प्रसंग ओढावा..
महाराष्ट्रातल्या प्रत्येक आईच्या पोटात हे ऐकून गोळा आला असेल. आज सरकार लाडकी बहीण योजना राबवतोय कशाला, राबवता योजना. तुमच्या लेकी-बाळी जर सुरक्षित नाही, तर योजना कुणासाठी आणि कशासाठी..?
हा प्रश्न जर प्रत्येक स्त्रीला पडला नसेल तर ती स्त्री नाही.. तिला आईचं काळीज नाही. या घटनेवर सगळे लोक स्वतःची भाकरी भाजून घेत आहे. मात्र आता असे वाटू लागले आहे की,जिजाऊंचे संस्कार कमी पडू लागलेत की काय?
महाराज आज तुम्ही हवे होता. स्त्री कडे वेगळ्या नजरेने पाहणाऱ्या नराधमाचा तुम्ही चौरंग केला होता, आज ती वेळ आली आहे. कायदे बनवणारा माणूसच पण ते कायदे त्याच्यासाठी नाहीत, तिच्या रक्षणासाठी नाहीत, तर कशासाठी, बनवलेत हा प्रश्न. एका रात्रीमध्ये सरकार बदलते,एका रात्रीमध्ये नोटाबंदी होते मग एका रात्रीत कायदा का बदलला जात नाही, याचा जाब विचारल्यावर उत्तर आहे का? तुमच्याकडे..
अशा नराधमाला ज्या ठिकाणी ही घटना घडली त्याच ठिकाणी फाशी द्यायला हवी, या फाशीचं लाईव्ह दाखवलं जाव. तेव्हा अशी कृती करण्याची हिंमत कोणी करणार नाही? आंदोलन करणारे आंदोलन करतील, लाठीमार सहन करतील, दुसरेच आपले पोळी भाजतील, अंन जीच्या वर अत्याचार झालाय ती शेवटी न्याय मागता, मागता स्वतःच स्वतःचा न्याय करून घेईल. कुणाला काही फरक पडणार नाही. आज वेळ तिच्यावर आली, उद्या जर वेळ आपल्यावर, आपल्या लेकीवर आली की आम्ही जाग्या होऊ… बस्स.. इतकच…
जेव्हा समाज म्हणजेच आपलं घर असं समजून जर बदल घडवायचा प्रयत्न केला, तरच तो घडेल नाहीतर भविष्यातील कळ्या उमलण्याआधीच गळून जातील…. गळून जातील…
.सौ. तेजश्री दुधाणे, पुणे tejshrees_thoughts

..सौ तेजश्री स्वप्नील दुधाणे, कर्वेनगर, पुणे.@tejshrees_thoughts







