अवास्तव निधी आणण्याच्या खोट्या घोषणांनी मतदार नाराज
माढ्याचा गड राखण्यात भाजपला अपयश येणार
अकलूज: (प्रतिनिधी )स्वतःला पाणीदार खासदार म्हणून बिरूद लावून फिरणारे रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी वळविलेले पाणी, अब्जावधी रुपयाचाआणलेला निधी, मतदारसंघात केलेली कामे दिसतच नसल्याने खोटे बोल पण …. बोल प्रमाणे नीती अवलंबलेल्या खासदारांना मतदार पुन्हा निवडून देतील काय? असा प्रश्न माढा मतदार संघातून उपस्थित केला जात आहे.
पूर्वी खासदार निधीतून अब्जावधी रुपयाचा निधी मतदार संघात आणला एवढेच बोलून खासदार निवडून येत होते. मतदारसंघ अनेक तालुक्यांचा असल्याने आपल्या नाही परंतु दुसऱ्या तालुक्यात काम केले असावे असे ग्राह्य धरून मतदार पुन्हा त्यांना मत देत होता. परंतु हल्ली मतदार जागृत झाला असून सामाजिक माध्यमातून सर्व माहिती आकडेसह उपलब्ध होत असते हे माहीत असूनही केवळ खोटे बोला परंतु रेटून बोला ही त्यांच्या वरिष्ठ नेत्यांची पद्धत ते मतदारसंघात राबवित आहेत.
निरा देवधरचे पाणी, पंढरपूर फलटण रेल्वे, कृष्णा भीमा स्थीरीकरणासाठी निधी असा विविध निधी आणला. असे म्हणणाऱ्या खासदारांनी सदरचा निधी कोठे खर्च केला याबाबत नागरिकात चर्चा चालू असून निधी आणला मात्र त्याचे काम झालेले दिसत नाही. मग हा निधी कोणाच्या घरात गेला असेल याबद्दलही तर्कवितर्क लावलें जात आहेत.
वास्तविक खासदार नाईक निंबाळकर राजकारणात येण्याआधी पासून निरा देवधर कालवा अस्तित्वात आहे. उजव्या कालव्यास समांतर पाईपलाईन व्हावी. यासाठी मोहिते पाटील कुटुंब सतत प्रयत्न करीत आहेत. निरा देवधर अंतर्गत कालव्यास राज्य सरकारने निधी दिला असेल तर त्या निधीचा खासदारांचा काय संबंध ? असा प्रश्न सोशल मीडियावरून विचारला जात आहे.
तसेच कृष्णा भीमा स्थिरीकरण ही योजना मुळातच माजी खासदार विजयसिंह मोहिते पाटील यांनी तयार केली आहे. ते स्वतः उपमुख्यमंत्री असताना त्या योजनेस प्रशासकीय मंजुरी त्यांनी घेतली होती.परंतु त्यात राजकारण आल्यामुळे हा प्रकल्प राहिला. दुष्काळी सात जिल्हे व 31 तालुक्यातील शेतकऱ्यांच्या फायद्यासाठी हा प्रकल्प अत्यंत गरजेचा असल्याने हा प्रकल्प व्हावा यासाठीच आ. रणजितसिंह मोहिते पाटील यांनी भाजपमध्ये प्रवेश केला.
याची रास्त जाणीव ठेवून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस यांनी जागतिक बँकेकडे वेगळ्या पद्धतीने हा प्रकल्पासाठीच्या निधीस मंजुरी आणली. यामध्ये खासदारांचे योगदान नाही, शिवाय आपल्या तालूक्याकडूनच या योजनेस पूर्वी विरोध करण्यात आला होता हेही सोयीस्कर विसरून निधी आणल्याच्या वल्गना कशा करतात.असा प्रश्न मतदार विचारत आहेत.
एकंदर दुसऱ्यांनी केलेली कामे आपणच केली असे दाखवून मते मागणाऱ्या खासदारांना मतदार पुन्हा मतदान करण्याच्या मनस्थितीत नसल्याचे दिसून येत आहे.
दरम्यान माढा लोकसभा मतदार संघात भाजपा च्या वतीने रणजितसिंह निंबाळकर, राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार गट )यांचेकडून धैर्यशील मोहिते पाटील यांचेसह 32उमेदवार रिंगणात आहेत. परंतु खरी लढत ही भाजपा आणि राष्ट्रवादी यांचेत होत आहे.
एकूणच माढा लोकसभा मतदार संघात 2019ला मोहिते पाटील यांच्या सहकार्यामुळे निवडून आलेले खासदार 2024ला पुन्हा निवडून येणार का? असा प्रश्न निर्माण झाला आहे.







