माढा लोकसभा मतदारसंघात भाजपा कोणाला देणार संधी?
अकलूज (प्रतिनिधी )माढा लोकसभा मतदारसंघ हा पश्चिम महाराष्ट्रातील एक महत्त्वाचा मतदारसंघ आहे.माढा हा महाराष्ट्रातील ४८ लोकसभा संसद मतदारसंघांपैकी एक आहे. २००८ साली निर्माण करण्यात आलेल्या ह्या मतदारसंघामध्ये सध्या सोलापूर जिल्ह्यामधील ४ आणि सातारा जिल्ह्यामधील २ असे एकूण ६ विधानसभा मतदारसंघ समाविष्ट केले गेले आहेत.
हा मतदारसंघ म्हणजे शरद पवारांचा बालेकिल्ला असं मानलं जात होतं. मात्र, 2019 च्या लोकसभा निवडणुकीत भाजपनं राष्ट्रवादी काँग्रेसच्या बालेकिल्ल्याला खिंडार पाडलं. 2019 ला भाजपचे रणजितसिंह नाईक निबांळकर हे विजयी झाले. त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या पाठिंब्यावर अपक्ष उभे राहिलेल्या संजय मामा शिंदे यांचा पराभव केला होता. 2024 च्या लोकसभेसाठी या मतदारसंघातून अनेकजण इच्छूक आहेत. राज्याचे माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते पाटील यांचे पुतणे धैर्यशील मोहिते पाटील हे या मतदारसंघातून निवडणूक लढवण्यास इच्छूक आहेत. त्यामुळे भाजप समोर मोठा पेच उभा राहिला आहे.
माढा लोकसभा मतदारसंघावर कायम शरद पवार यांचे वर्चस्व राहिले होते. परंतु 2019 च्या लोकसभेत या मतदारसंघात भाजपने दणदणीत विजय मिळविला. फलटण च्या रणजितसिंह निंबाळकरांनी अकलूजच्या मोहिते पाटलांच्या साथीनं माढ्याचा गड सर केला.
आजमितीला मात्र या दोघांमध्ये सख्य नसल्याने त्यामुळं या मतदारसंघात भाजपमधून कोणाला उमेदवारी मिळणार? हा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे.
सध्या भाजपा चे सोलापूर जिल्हा संघटन सरचिटणीस धैर्यशील मोहिते पाटील हे दररोज 300किलोमीटर प्रवास करीत गावोगावी दौरे करत आहेत,मतदार संघातील सर्वं तालुक्यात कार्यकर्त्यांच्या कार्यक्रम ला आवर्जून उपस्थित राहत आहेत. नागरिकांच्या सुख -दुःखात सहभागी होत आहेत. त्यांना प्रतिसाद देखील मोठया प्रमाणावर मिळताना दिसत आहे. धैर्यशील मोहिते पाटील यांनी आजपर्यंत अनेक सामाजिक उपक्रम राबविले आहेत.एव्हढेच नव्हे तर शासन आपल्या दारी, या योजनेच्या माध्यमातून अनेकांना शासनाच्या योजना समजावून सांगून त्या योजनेचा लाभ देखील मिळवून दिला आहे. ठिकठिकाणी आयुष्यमान भारत कार्ड चे शिबीर घेऊन त्याचा लाभ मिळवून दिला आहे. पंतप्रधान स्व निधी चा देखील अनेक व्यापाऱ्यांना लाभ मिळवून दिला आहे. शासनाच्या सर्वं कल्याणकारी योजना घरोघरी पोहचवून अनेकांना लाभ मिळवून दिला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सर्वं योजना घरोघरी पोहचवील्या आहेत.शिवरत्न शिक्षण संस्था, व शिवामृत दूध संस्थेचे अध्यक्ष धैर्यशील मोहिते पाटील यांचे कार्य पाहून त्यांना सोलापूर जिल्हा संघटन सरचिटणीस केले. त्यांनी मोठया प्रमाणावर भाजप वाढीसाठी प्रयत्न केले आहेत. त्यामुळे सोशल मीडियावर आमचं आता ठरलंय धैर्यशील मोहिते पाटील हेच खासदार अशी चर्चा सुरु आहे.त्यामुळे नागरिकांमधून समाधान व्यक्त केले जात आहे.
तर विद्यमान खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकरांनी देखील पुन्हा मिच असं म्हणत गाठी भेटी सुरु केल्या आहेत. वेगवेगळ्या कामासाठी निधी उपलब्ध करून देत आहेत. नागरिकांच्या सुख दुःखात आवर्जून वेळ काढून सहभागी होत आहेत.त्यामुळे आता पुन्हा एकदा त्यांनाच उमेदवारी मिळेल. असे त्यांचे समर्थक सांगत आहेत.
माढा लोकसभा मतदारसंघात सोलापूर जिल्ह्यातील काही तालुके आणि सातारा जिल्ह्यातील काही तालुक्यांचा समावेश करण्यात आला आहे.सोलापूर जिल्ह्यातील माळशिरस, करमाळा, सांगोला आणि माढा हे चार विधानसभा मतदारसंघ येतात. तर सातारा जिल्ह्यातील माण-खटाव आणि फलटण हे दोन विधानसभा मतदारसंघ माढा लोकसभा मतदारसंघात येतात. त्यामुळं हा मतदासंघ तुलनेने मोठा आहे.
या मतदार संघातून सध्या माढा – बबनदादा शिंदे (राष्ट्रवादी काँग्रेस, अजित पवार गट)करमाळा – संजय मामा शिंदे (अपक्ष, अजित पवार गटाला पाठिंबा)सांगोला – शहाजीबापू पाटील (शिवसेना, शिंदे गट)माळशिरस – राम सातपुते (भाजप)माण-खटाव – जयकुमार गोरे (भाजप)फलटण – दिपक चव्हाण (राष्ट्रवादी काँग्रेस, अजित पवार गट)असे आमदार आहेत.या सहा आमदारांची काय भूमिका आहे. हे पाहणे देखील महत्वाचे ठरणार आहे.
त्याचप्रमाणे जनतेचा कौल काय आहे. हे पाहणे देखील महत्वाचे आहे. शेवटी मतदार हा राजा असून तो कोणाच्या पारड्यात आपली मते टाकणार. यावर माढा लोकसभा मतदार संघाचा खासदार ठरणार आहे.
2019 नंतर माढा लोकसभा मतदारसंघात बरेच बदल झाले आहेत. या मतदारसंघात भाजपची ताकद वाढल्याचे चित्र स्पष्टपणे दिसत आहे. तसेच राष्ट्रवादी काँग्रेसचीही या मतदारसंघात मोठी ताकद आहे. पण सध्या शिवसेनेत आणि राष्ट्रवादीत फूट पडल्यामुळं नेतेमंडळींची विभागणी झाली आहे. राष्ट्रवादीच्या अनेक नेत्यांनी अजित पवार गटाला साथ दिली आहे. सध्या अजित पवार भाजपसोबत गेल्यानं या मतदारसंघात महायुतीची ताकद वाढली आहे. पण या मतदारसंघात महायुतीकडून कोणाला तिकीट मिळणार? यावर बरीच राजकीय गणित ठरणार आहेत.
माढा लोकसभा मतदारसंघात 2009 च्या निवडणूक राष्ट्रवादी काँग्रसचे अध्यक्ष शरद पवार यांनी लाढवली होते. त्यांनी 3 लाखाहून अधिक मताधिक्क्य घेत भाजपचे उमेदवार सुभाष देशमुख यांचा पराभव केला होता. त्यानंतर 2014 च्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसकडून राज्याचे माजी मुख्यमंत्री विजयसिंह मोहिते पाटील यांनी निवडणूक लढवली होती. त्यांच्या विरोधात स्वाभिमानी शेतकरी संघटनेकडून सदाभाऊ खोत यांनी निवडणूक लढवली होती. या निवडणुकीत अटितटीच्या लढतीत विजयसिंह मोहिते पाटील यांनी विजय मिळवला होता. 25 हजार मताच्या फरकाने विजयसिंह मोहिते पाटील निवडून आले होते.2019 च्या लोकसभा निवडणुकीपूर्वी माढा मतदासंघातील सर्व वातावरण बदलले. विजयसिंह मोहिते पाटील यांचे चिरंजीव रणजितसिंह मोहिते पाटील यांनी भाजपमध्ये प्रवेश केल्यानं या मतदारसंघात भाजपची ताकद वाढली. त्यामुळं 2019 च्या निवडणुकीत मोहिते पाटलांनी भाजपचा उमेदवार रणजितसिंह निंबाळकर यांच्या विजयात सिंहाचा वाटा उचलला होता. त्यामुळे ही निवडणूक भाजपा साठी सोपी ठरली.या निवडणुकीत निंबाळकरांनी राष्ट्रावादी काँग्रेसच्या पाठिंब्यावर उभे असलेल्या अपक्ष उमेदवार संजय मामा शिंदे यांचा मोठया फरकाने पराभव केला होता.
2024 च्या लोकसभेसाठी भाजप नेमकी कोणाला उमेदवारी देणार हे देखील महत्वाचे ठरणार आहे.. कारण रणजितसिंह निंबाळकरांनी आपण पुन्हा निवडणुकीच्या मैदानात उतरणार असल्याचे सांगितले आहे. तर भाजपमधूनच धैर्यशील मोहिते पाटील हेदेखील इच्छुक आहेत. त्यामुळं भाजप या दोघांपैकी कोणाला उमेदवारी देणार? की दोघांच्या वादात तिसऱ्याचा लाभ असे काही होईल का ?दरम्यान, भाजपने जर रणजितसिंह निंबाळकरांना पुन्हा तिकीट दिले तर धैर्यशील मोहिते पाटील यांची भूमिका काय राहणार?त्यामुळं भाजप पुढे मोठा प्रश्न निर्माण झाला आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना मानणारा वर्ग देखील या माढा लोकसभा मतदारसंघात आहे. कारण 2009 साली खुद्द शरद पवारांनी या मतदारसंघात निवडणूक लढवली होती. मोठ्या फरकाने शरद पवार या मतदारसंघातून विजयी झाले होते. त्यामुळं या मतदारसंघात पवारांचे मोठे जाळे आहे. मोहिते पाटील भाजपमध्ये जाण्यापूर्वी शरद पवार यांचे निकटवर्ती होते. तसेच सध्या अजित पवार गटात सामील झालेले आमदार बबनदादा शिंदे आणि आमदार संजयमामा शिंदे हेदेखील शरद पवार यांचे विश्वासू समजले जात होते. मोहिते पाटलांची देखील मोठी ताकद या मतदारसंघात आहे.
त्यामुळं आता शरद पवार यांच्या मनात नेमकं काय चालू आहे.का ते पुन्हा निवडणूक लढविणार याबाबत तर्क -वितर्क चालू आहेत.काही महिन्यापूर्वी शरद पवार यांनी विजयसिंह मोहिते पाटील यांची भेट घेतली होती. विजयसिंह मोहिते पाटील यांच्या तब्बेतीची विचारपूस करण्यासाठी ही भेट घेतली होती. पण या भेटीत काही राजकीय चर्चा झाली का? हा देखील प्रश्न उपस्थित केला जातोय.
तसेच दुसरीकडे फलटणचे रामराजे नाईक निंबाकर यांनी देखील मोहिते पाटलांची भेट घेतली होती. त्यामुळं भाजपनं जर रणजितसिंह निंबाळकरांना पुन्हा भाजपचे तिकीट दिले तर धैर्यशील मोहिते पाटील यांना शरद पवार ताकद देऊ शकतात अशी माहिती राजकीय विश्लेषकांनी दिली आहे. महायुती असली तरी रामराजे नाईक निंबाळकर आणि रणजितसिंह निंबाळकर यांचे राजकीय वैर सर्वश्रूत आहे. त्यामुळं रामराजे नाईक निंबाळकर रणजितसिंह निंबाळकर यांचे काम करतील असे कोणालाच वाटत नाही
.त्यामुळं पवारांच्या पाठिंब्यावर मोहिते पाटलांनी निवडणूक लढवली तर नवल वाटायला नको अशी चर्चा मतदारसंघात सुरु आहे. याबरोबर पवार अन्य कोणी उमेदवार उभा करतात का हेसुद्धा पाहणं महत्वाचं ठरणार आहे.
माण, सांगोला हे परंपरागत दुष्काळी तालुके या मतदारसंघात आहेत. येथे पाणीटंचाई खूप आहे. सिंचनाची कामे होत असली तरी त्याचा वेग कमी आहे. माढा मतदारसंघात साखर कारखानदारी असली तरी ती सध्या आर्थिक अडचणीत आहेत. काही कारखाने ऊसाला चांगला दर देत आहेत. अन्य कृषीमालाचे दर कमी आहेत. सुशिक्षित बेरोजगारी मोठी आहे. त्यामानाने कृषी अधारित अन्य व्यवसाय व उद्योग येथे आले नाहीत. सहकारी संस्था अडचणीत असल्याने आता नोकर्यांची संख्या कमी आहे. मोठ्या शिक्षणाच्या सुविधा मतदारसंघात नाहीत. तसेच मतदारसंघात अनेक ठिकाणी रस्त्यांची अवस्था चांगली नाही. अनेक ठिकाणी वैद्यकीय सुविधांचा अभाव असल्याची माहिती स्थानिकांनी दिली आहे. माढा तालुक्यातील काही भाग, तसेच करमाळा तालुक्यातील काही भागात अद्यापही पाण्याच्या समस्या आहेत.
त्यामुळे या मतदार संघातील नागरिकांच्या अपेक्षा वाढल्या आहेत. अद्याप अनेक समस्या प्रलंबित असल्यामुळे या मतदार संघातील जवळपास 19लाख मतदार नेमके कोणाला निवडून देतील. हे मात्र सांगता येणार नाही. उमेदवार कोणीही असो. मतदार कोणाला निवडून देतात. हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.







