राज्याच्या राजकारणातील सुसंस्कृत व संवेदनशील नेता हर्षवर्धन पाटील यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.
सध्या राज्याच्या राजकारणामध्ये सुसंस्कृत व संवेदनशील व्यक्तिमत्व असलेले जे काही मोजके नेते आहेत, त्यामध्ये राज्य भाजपचे नेते व इंदापूर तालुक्याचे सुपुत्र मा.हर्षवर्धन पाटील यांचे नाव अग्रक्रमाने घेतले जाते. सन 1995 पासून राज्याच्या राजकारणात सक्रियपणे कार्यरत असलेले हर्षवर्धन पाटील यांच्याकडे राज्यातील राजकारणामधील एक अभ्यासू व्यक्तिमत्व म्हणून आदराने पाहिले जाते. पक्षीय राजकारणापलीकडे सर्वच पक्षांमध्ये मित्रपरिवार असणाऱ्या मोजक्या नेत्यांमध्ये हर्षवर्धन पाटील यांचा समावेश होतो.
महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये ‘ हर्षवर्धन पाटील ‘ नावाचे ‘ वलय ‘ गेली 27 वर्षापासून कायम आहे. आगामी काळात हे वलय आणखी विस्तारित जाणार यात शंका नाही. विकासाची जाण असलेले राज्यातील कार्यक्षम नेतृत्व इंदापूर तालुक्याला लाभले आहे. हर्षवर्धन पाटील साहेबांबरोबर चर्चा म्हणजे नवीन माहितीची, सकारात्मक ऊर्जेची पर्वणीच असते. गेली 30 वर्षातील राजकारणाची इत्यभूत माहिती असणारे हर्षवर्धन पाटील म्हणजे एक राजकीय विद्यापीठ आहे. त्यांच्याकडे राजकारणाबरोबर विविध क्षेत्रातील माहितीचा प्रचंड खजिना असल्याचा प्रत्यय येतो. अभ्यासाचा प्रचंड व्यासंग हे त्यांचे वैशिष्ट्य आहे. अनेक विषयांची अभ्यासू माहिती त्यांच्याकडे असल्याने नवीन विचारांची देवाण-घेवाण करणारे व्यासपीठ म्हणजे हर्षवर्धन पाटील होत.
बावडा (ता.इंदापूर) येथे 21 ऑगस्ट 1963 रोजी हर्षवर्धन पाटील यांचा जन्म झाला. बावड्याचे पाटील घराणे हे स्वातंत्र्यकाळापासून तालुक्यातील नावाजलेले घराणे. हर्षवर्धन पाटील यांचे आजोबा बाजीराव पाटील हे तालुक्यातील बडे प्रस्थ. स्वातंत्र्याच्या काळात अनेक स्वातंत्रसैनिकांची ये-जा बावड्याच्या पाटील वाड्यात होती. अशा नावाजलेल्या पाटील घराण्यात हर्षवर्धन पाटील यांचा जन्म झाला. त्यांना वडील शहाजीराव बाजीराव पाटील व मातोश्री रत्नप्रभादेवी पाटील यांचे संस्कार लाभले तर चुलते शंकरराव बाजीराव पाटील यांच्याकडून राजकारणाचे बाळकडू मिळाले. शंकररावजी पाटील राज्याचे राजकारणात मंत्री म्हणून सक्रिय होते तर शहाजीराव पाटील तालुक्याचे राजकारण सांभाळत होते.
हर्षवर्धन पाटील यांचे शालेय शिक्षण पुण्यातील शिवाजी पीप्रेटरी मिलिटरी स्कूल या इंग्लिश मीडियमच्या शाळेत झाले. त्यानंतर सन 1979 मध्ये वडील शहाजीराव पाटील यांच्या निधनामुळे हर्षवर्धन पाटील यांनी महाविद्यालयीन शिक्षण इंदापूर येथे इंग्रजी माध्यमातून घेतले. तर आयएलएस लॉ कॉलेज पुणे येथून वकिलीची पदवी संपादन केली. राज्यातील राजकारणात व प्रशासनात यशस्वी होण्यास हर्षवर्धन पाटील यांना इंग्रजी भाषेवरील कमालीचे प्रभुत्व उपयोगी ठरल्याचे दिसून येते. कॉलेजमध्ये शिकत असताना हर्षवर्धन पाटील हे सन 1986 मध्ये वयाच्या 22 व्या वर्षी अकलूज येथील शिवामृत दूध उत्पादक सहकारी संघाचे संचालक झाले. त्यानंतर सन 1989 मध्ये अकलूज येथील सहकार महर्षी शंकरराव मोहिते पाटील सहकारी साखर कारखान्याच्या संचालक मंडळावर पंचवार्षिक निवडणूक संचालक म्हणून बिनविरोध निवडून आले. त्यानंतर सन 1990 मध्ये हर्षवर्धन पाटील यांचा भाग्यश्री पाटील यांचेशी विवाह झाला. राजकारण, समाजकारण करीत असताना चुलते शंकररावजी पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली हर्षवर्धन पाटील यांची राजकारणातील दमदार वाटचाल चालू होती. त्यानंतर सन 1992 मध्ये हर्षवर्धन पाटील हे पुणे जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघावर ( कात्रज डेअरी) इंदापूर तालुक्याचे संचालक म्हणून प्रचंड मताने निवडून आले. त्यानंतर पुढे त्याच वर्षी सन 1992 मध्येच झालेल्या जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत बावडा-नीरा नरसिंहपुर जि.प.गटातून ते मोठ्या मताधिक्क्याने विजयी झाले. हर्षवर्धन पाटील यांच्या राजकीय प्रगतीचा आलेख उंचावत चालला होता. त्यात सन 1995 हे वर्षे हर्षवर्धन पाटील यांच्या राजकीय प्रगतीसाठी अतिशय महत्वाचे ठरले. सन 1995 च्या विधानसभा निवडणुकीत शंकररावजी पाटील यांचे मार्गदर्शनाखाली हर्षवर्धन पाटील यांनी इंदापूर विधानसभा मतदारसंघात अपक्ष म्हणून निवडणूक लढवीत दैदिप्यमान असा विजय संपादित केला. या विजयानंतर हर्षवर्धन पाटील यांनी आमदारकीची शपथ घेण्यापूर्वीच मुख्यमंत्री मनोहर जोशी यांच्या मंत्रीमंडळात राज्यमंत्री पदाची शपथ घेतली. मुख्यमंत्री मनोहर जोशी (14 मार्च 95 ते 31 जाने.99) यांच्या मंत्रीमंडळात कृषी, जलसंधारण, फलोत्पादन खात्याचे मंत्री व सातारा जिल्ह्याचे पालकमंत्री म्हणून हर्षवर्धन पाटील यांनी आपल्या कार्याचा राज्यात अल्प वयातच ठसा उमटविला. त्यानंतर महाविकास आघाडी सरकारमध्ये पंधरा वर्षे ते कॅबिनेट मंत्री राहिले. सहकार व संसदीय कार्य मंत्री म्हणून त्यांनी आपल्या कामाचा ठसा उठवला. त्यांना तत्कालीन राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील यांच्या हस्ते विधिमंडळातील उत्कृष्ट कामकाजाबद्दल विकासरत्न या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. राज्यातील सहकार क्षेत्रातील तज्ञ म्हणून हर्षवर्धन पाटील यांची ओळख आहे. अशा आदर्श नेतृत्वास वाढदिवसानिमित्त हार्दिक शुभेच्छा!








